बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग पहिला – जन्म ते प्रव्रज्या.
🌼 २१. कुटुंबाचा विलाप 🌼
१. शुद्धोदनाचे कुटुंबीय छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. स्वगृही परत येण्यासाठी
छन्न गौतमाचे मन निश्चितच वळवू शकेल अशी त्यांना आशा होती.
२. राजाच्या अश्वशाळेत प्रवेश केल्यानंतर कन्थक मोठ्याने खिकाळला. कदाचित त्या माध्यमातून तो आपले दुख राजकुटुंबातील लोकांपर्यंत पोहोचवू इच्छित असावा
३. राजाच्या अंतःपुरवासियांना असे वाटले की, जेव्हा कन्थक खिकाळतो आहे तेव्हा राजपुत्र निश्चितच परत आला असावा.
४. आणि दुःखातिरेकाने शुद्ध हरवलेल्या स्त्रियांच्या नजरा आता आनंदाने राजपुत्राच्या शोधासाठी भिरभिरू लागल्या. राजपुत्राचे दर्शन होईल या आशेने त्यांनी राजवाड्याबाहेर धाव घेतली. परंतु सर्वांच्या पदरी निराशाच आली. तेथे कन्थक होता पण राजपुत्र मात्र नव्हता.
५. गौतमीच्या दुःखाचे सर्व बांध फुटले. है. तिचे स्वत:वरील नियंत्रण संपले. ती मोठमोठ्याने विलाप करू लागली तिला मूर्च्छा आली. अश्रुपूर्ण नयन आणि दुःखी वदनाने ती वदली,
६. “ज्याचे बाहू लांब आहेत, चाल सिंहासारखी आहे, नेत्र वृषभासम आहेत. कांती सुवर्णाची आहे, वक्षस्थल रुंद आहे आणि स्वर मेघगर्जनेसम आहे. अशा वीर पुरुषाचे आश्रमात वास्तव्य योग्य आहे काय ?
७. “त्याच्यासारखा गुणांची खाण असलेला कर्मयोद्धाच आम्हाला सोडून गेल्याने आता ही वसुंधराच आमच्या वास्तव्यासाठी योग्य नाही असे वाटते.
८. “आणि त्याची ती सुंदर पाऊले. पाऊलांच्या बोटातील सुंदर जाळे आणि नीलकमलपुष्पाच्छादित त्याच्या पाऊलांच्या टांचा, आणि पाऊलांच्या मध्ये अंकित चक्रचिन्ह- अशी पाऊले वनातील कठोर भूमीवर कशी चालतील ?
९. “आणि तो देह, राजमहालात वास्तव्यासाठी आणि राजशय्येवर निद्रा घेण्यासाठीच योग्य असा तो देह, उंची वस्त्रप्रावरणांनी आच्छादित असा तो देह, चंदनादी सुगंधित गंधांनी युक्त असा तो देह, असा पौरुषयुक्त देह उन्न, वारा, पाऊस यापासून अरक्षित अशा वनात कसा निवास करू शकेल ?
१०. ज्याला आपले कूळ, शील, वीर्य, ऊर्जा, विद्या, सौंदर्य आणि यौवनाचा अभिमान आहे, जो सतत सर्वस्वाचे दान करण्यातच धन्यता मानतो, ज्याने कधीही कोणालाही काहीही मागितले नाही, तो आता भिक्षा कशी मागेल ?
११. “जो स्वच्छ सोनेरी शय्येवरच निद्राधीन होत असे, ज्याला मधुर वाद्य संगीतानेच जाग येत असे असा तो माझा तपस्वी पुत्र आता केवळ एक वस्त्र आंथरुण उघड्या धरणीवर कसा निद्राधीन होईल ?”
१२. तिचा तो दुःखद विलाप ऐकून उपस्थित स्त्रियांही दुःखी झाल्या त्या एक दुसरीला बाहूत
घेऊन विलाप करू लागल्या. एखाद्या पुष्पांनी बहरलेल्या वेलीला हलवल्यावर पुष्पातून मधु स्रवावा तसे त्यांच्या नेत्रातून अश्रू गळू लागले.
१३. नंतर यशोधरा तिनेच त्याला गृहत्यागाची अनुमती दिली हे विसरून दुःखी होऊन धरणीवर लोळण घेत विलाप करू लागली.
१४. “मी त्याची विधीवत् भार्या असताना त्याने माझा त्याग केलाच कसा?” त्याने मला विधवा म्हणून कसे सोडून दिले ?” “आपल्या भार्येला आपल्या नूतन जीवनाची भागीदार म्हणून त्याला सहज स्वीकारता आले नसते काय ? असे प्रश्न ती विचारू लागली.
१५. “मला स्वर्गाची अपेक्षा नव्हती. माझ्या प्रियकराने मला या जगी तर नाहीच नाही परंतु दुसऱ्या जगातही मला सोडून जाऊ नये एवढीच माझी इच्छा होती.
१६. “मी कदाचित त्या विशालाक्ष, तेजस्वी स्मित वदनाकडे पाहण्यायोग्य नसेनही पण बिचाऱ्या राहुलचा काय दोष ? आपल्या पित्याच्या मांडीवर खेळायचा त्याला अधिकार नाही काय ?
१७. “अरेरे, त्या वीर पुरुषाचे सौंदर्य जरी कोमल भासत असले तरी हृदय मात्र वज्रासम कठीण
आहे. तो पराकोटीचा निर्दयी आहे. अन्यथा जो आपल्या बोबड्या बोलाने शत्रूलाही जिंकू शकेल, अशा आपल्या पुत्राला सोडून कोण जाऊ शकेल ?
१८. “माझे हृदयही कठोर कठीणच असावे, ते पाषाणाचे बनले असावे किंवा लोहाचे तरी बनले
असावे. म्हणूनच माझे स्वामी मला सोडून वनात गेले तरी ते भंग पावले नाही. माझे स्वामी आपले
राजवैभव त्यागून मला अनाथ करून गेले असतानाही ते भंग पावले नाही. परंतु मी तरी आता काय करू ? माझे दुःख एवढे विशाल आहे की ते आता माझ्याने सहन होत नाही.”
१९. यशोधरेने दुःखाने आपला संयम गमावला. ती मोठ्याने विलाप करू लागली. तशी ती स्वभावतःच आत्मसंयमी होती. परंतु दुःखच एवढे मोठे होते की तिला आपला संयम कायम राखता आला नाही.
२०. यशोधरेला भूमीवर लोळण घेताना, मोठ्याने आक्रोश करताना, विलाप करताना आणि दुखोद्गार व्यक्त करताना पाहून उपस्थित स्त्रियाही विलाप करू लागल्या, कमलपुष्पांना मुसळधार पावसाने झोडपून काढावे तसा त्यांच्या नेत्रातून अश्रूचा पूर वाहू लागला
२१. छत्र आणि कन्धक परत आले हे पाहून आणि आपल्या पुत्राचा दृढसंकल्प ऐकून शुद्धोदनाच्या हृदयावर मोठा आघात झाला.
२२. पुत्रवियोगाच्या दुःखाने विचलित झालेल्या शुद्धोदनाने आपल्या सेवकांच्या सहाय्याने आपल्या अश्रुपूरित नेत्रांनी क्षणभर अश्वाला निरखून पाहिले आणि भूमीवर लोळण घेऊन विलाप करू लागला.
२३. त्यानंतर शुद्धोदन उठला. मंदिरात गेला. प्रार्थना केली. धर्मविधी पार पाडले आणि पुत्र सकुशल परत यावा यासाठी नवस केला.
२४. अशा प्रकारे शुद्धोदन, गौतमी आणि यशोधरा यांचा जीवनक्रम सुरू राहिला. ते एक दुसऱ्याला विचारीत, “किती दिवस, हे देवा किती दिवस ? आम्ही त्याला पुन्हा पाहू शकू काय ?”
भाग १ समाप्त…
More Stories
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग पाचवा – १. बुद्ध आणि वैदिक ऋषी.
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग चवथा – ४. बोधिसत्व असलेले गौतम सम्यक् सम्बोधी प्राप्त झाल्यावर बुद्ध झाले.
बुद्ध आणि त्यांचा धम्म -भाग चवथा – ३. नव्या धम्माचा आविष्कार