बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग पहिला – जन्म ते प्रव्रज्या.
🌼 १८. गृहत्याग 🌼
१. सिद्धार्थाने विचार केला की, कपिलवस्तूतच आश्रम असलेल्या भारद्वाजाकडे जाऊन प्रवृज्या घ्यावी. त्यानुसार तो दुसऱ्या दिवशी प्रात:काळी उठला, त्याने आपल्या आवडत्या कन्थक घोड्यावर स्वार होऊन आपला सेवक छन्न याला सोबत घेऊन आश्रमाकडे प्रयाण केले.
२. जसा तो आश्रमाजवळ आला तसा स्त्री-पुरुषांचा मोठा समुदाय आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याच्या स्वागतासाठी उभा असल्याचे त्याला दिसले. समुदाय जणू काही नवागत नववधूचे स्वागत करीत आहे असे भासत होते.
३. जेव्हा तो जनसमुदायानिकट पोहोचला तेव्हा जनसमुदायाचे नेत्र आश्चर्याने विस्फारले. न उमललेल्या कमलासमान दोन्ही कर जोडून समुदायाने त्याच्या स्वागताचे आपले कर्तव्य पार पाडले.
४. समुदाय त्याला चहुबाजूंनी वेढून उभा राहिला त्यांची हृदये भावनांनी उचंबळून आल्याचे जाणवत होते. समुदाय जणू स्थिर पण प्रेमासक्त नेत्रांनी त्याचे प्राशन करून त्याला आत्मसात करू इच्छित होता.
५. तो आपल्या दिव्य लक्षणांनी युक्त आणि जन्मजात अलंकारांनी अलंकृत असल्याने काही युवतींना तो कामदेवाचे प्रतिरूपच वाटला.
६. काहींना त्याचे राजबिंडे रूप पाहून आपल्या अमृतमय किरणांची वर्षा करीत चंद्रमाच पृथ्वीवर अवतरला आहे असे वाटले.
७. काही ललना त्याच्या सौंदर्याने वशीभूत होऊन अशा आविर्भावात उभ्या होत्या की त्याला आपल्यात सामावून घेतील. त्या एक दुसरीकडे कटाक्ष टाकून दीर्घ श्वास घेत होत्या.
८. अशाप्रकारे त्या कोमलांगी स्थिर पण भावपूर्ण नेत्रांनी त्याचे प्राशन करीत होत्या. त्या अबोल अस्मित उभ्या होत्या आणि त्याच्या प्रव्रज्या घेण्याच्या निर्णयाचा दिग्भांत होऊन विचार करीत होत्या
९. परिश्रमपूर्वक त्याने त्या समुदायातून मार्ग काढला आणि प्रवेशद्वारातून आश्रमात प्रवेश केला.
१०. शुद्धोदन आणि प्रजापतीची त्याच्या प्रव्रज्याप्रसंगी उपस्थिती सिद्धार्थाला आवडली नाही. त्याला जाणवत होते की हा दुःखभार त्यांना सहन होणार नाही. परंतु त्याला माहीत होण्यापूर्वीच ते आश्रमात पोहोचले होते.
११. आश्रम परिसरात प्रवेश केल्याबरोबर जनसमुदायात त्याला आपल्या मातापित्याचे दर्शन झाले.
१२. मातापित्याला पाहिल्यावर प्रथम तो त्यांच्याकडे गेला आणि त्याला आशीर्वाद द्यावेत अशी त्याने त्यांना विनंती केली. ते दुःखभावनांनी एवढे अभिभूत झाले होते की, त्यांच्या मुखातून शब्द फुटत नव्हते. ते विलाप आणि विलापच करीत राहिले. त्यांनी त्याला आपल्या हृदयाशी घट्ट आलिंगन दिले आणि त्याच्यावर आपल्या अश्रूचा अभिषेक केला.
१३. छत्राने कन्थकाला आश्रम परिसरातील एका वृक्षाला बांधले आणि तो उभा राहिला. शुद्धोदन आणि प्रजापती यांच्या अश्रुपूर्ण मुखमुद्रा पाहून त्यालाही आपल्या भावना आवरणे कठीण झाले. तोही विलाप करू लागला.
१४. महत्प्रयासाने सिद्धार्थाने स्वतःला मातापित्याच्या प्रेमपाशातून मुक्त केले. तो छन्न ज्याठिकाणी उभा होता तेथे गेला. त्याने आपले अलंकार व वस्त्रप्रावरणे परत नेण्यासाठी छन्नाच्या स्वाधीन केली.
१५. नंतर त्याने आपले मुंडन केले. प्रव्रज्येकरिता आवश्यक अशी वस्त्रे व भिक्षापात्र त्याचा चुलतभाऊ महानाम याने सिद्धार्थाला प्रदान केली. सिद्धार्थाने ती धारण केली.
१६. अशा प्रकारे स्वतःला पारिव्राजकाच्या जीवनासाठी सिद्ध केल्यानंतर तो भारद्वाजाकडे गेला आणि त्यांनी त्याला विधिवत् प्रव्रजित करावे अशी विनंती त्याने केली.
१७. भारद्वाजाने आपल्या शिष्यासहित प्रव्रज्येकरिता आवश्यक विधी पार पाडले आणि सिद्धार्थ गौतम विधीवत् परिव्राजक झाल्याचे घोषित केले.
१८. सिद्धार्थाने शाक्य संघाला दोन अभिवचने दिली होती. एक म्हणजे प्रव्रज्या स्वीकारणे आणि दुसरे म्हणजे अविलंब देशत्याग करणे. या दोन्ही अभिवचनाची त्याला आठवण होती. म्हणून सिद्धार्थ गौतमाने प्रव्रज्याविधीचा सोहळा संपल्यावर अविलंब देशत्यागासाठी प्रवास आरंभिला
१९. आश्रमात एकत्रित झालेला जनसमुदाय खूप मोठा होता. कारण गौतमाच्या प्रव्रज्येला निमित्त ठरलेली परिस्थितीच असामान्य होती. राजपुत्राने आश्रमाबाहेर पाऊल ठेवले तसा जनसमुदाय त्याचा अनुगामी झाला.
२०. त्याने कपिलवस्तूचा निरोप घेतला आणि अनोमा नदीच्या दिशेने वाटचाल आरंभिली. मागे वळून पाहता त्याला असे दिसले की, जनसमुदाय त्याच्या मागोमाग येतोच आहे.
२१. तो थांबला आणि जनसमुदायाला उद्देशून म्हणाला, “बंधू आणि भगिनींनो, माझे अनुगामी होऊन काहीही लाभ नाही. मी शाक्य आणि कोलीय यांच्यातील वाद मिटविण्यात असफल ठरलो आहे. जर तुम्ही दोन्ही पक्षातील विवाद मिटविण्यासाठी जनमत जागृत करू शकलात तर कदाचित हा वाद मिटविण्यात तुम्हाला यशही येईल. म्हणून तुम्ही माघारी वळणेच योग्य होईल.” त्याची प्रार्थना ऐकून जनसमुदाय परत फिरला.
२२. शुद्धोदन आणि गौतमी सुद्धा आपल्या राजप्रासादात परत आले.
२३. गौतमीला सिद्धार्थाने त्यागलेले वस्त्रालंकार पाहणेही दुष्कर झाले. त्या वस्त्रालंकारांना तिने पद्मसरोवरात विसर्जित केले.
२४. सिद्धार्थ गौतमाने प्रव्रज्या ग्रहण केली तेव्हा तो फक्त एकोणतीस वर्षाचा होता.
२५. लोकांनी त्याची प्रशंसा केली आणि त्याच्याविषयी हळहळही व्यक्त केली. लोक म्हणत, “तो शाक्य पहा. तो श्रेष्ठ कुलोत्पन्न आहे. तो श्रेष्ठ मातापित्याचा पुत्र आहे. तो धनधान्य संपन्न आहे. तो ऐन यौवनाच्या भरात आहे. तो शील, सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा मूर्तिमंत आदर्श आहे. तो वैभवात वाढला आहे. त्याने पृथ्वीतलावर शांतता नांदावी यासाठी, मानवाच्या कल्याणासाठी आपल्या बांधवाशी संघर्ष केला.”
२६. तो पहा शाक्य कुमार त्याने बहुमतापुढे समर्पणाऐवजी स्वेच्छेने दंड भोगण्याची सिद्धता केली. हा दंड म्हणजे वैभवातून दारिद्र्यात पदार्पण सुखसंपन्नतेऐवजी भिक्षेवर जीवनयापन गृहस्थाऐवजी गृहविहीन अवस्था. अशा प्रकारे ज्याची काळजी घेणारे कोणीही नाही असा तो एकटाच निघाला. या जगात असे काहीही नाही ज्याला तो आपले म्हणू शकेल.
२७. त्याची कृती म्हणजे स्वेच्छेने केलेला महानतम त्याग होय. त्याची ही कृती शौर्य व धैर्याचे प्रतीक होय. त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही म्हणून तो शाक्य मुनी किंवा शाक्य सिंह या संज्ञेस पात्र आहे.
२८. शाक्य कुमारी क्रिषा गौतमीचे शब्द किती खरे आहेत, सिद्धार्थाच्या संदर्भात ती म्हणते, ‘खरेच धन्य ती माता, धन्य तो पिता ज्याच्या पोटी असा पुत्र जन्माला आला. खरेच धन्य ती भार्या जिला असा पती लाभला.’
More Stories
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग पाचवा – १. बुद्ध आणि वैदिक ऋषी.
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग चवथा – ४. बोधिसत्व असलेले गौतम सम्यक् सम्बोधी प्राप्त झाल्यावर बुद्ध झाले.
बुद्ध आणि त्यांचा धम्म -भाग चवथा – ३. नव्या धम्माचा आविष्कार