बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग पहिला – जन्म ते प्रव्रज्या.
🌼 १७. निरोपाचे शब्द 🌼
१. सिद्धार्थ गौतम संघ सभा समाप्तीनंतर राजवाड्यात पोहोचण्यापूर्वीच संघसभेत जे घडले त्याची वार्ता राजवाड्यात पोहोचली होती.
२. सिद्धार्थ गौतम घरी पोहोचला तेव्हा त्याचे मातापिता दुःखातिशयाने अश्रू गाळताना त्याला दिसले.
३. शुद्धोदन म्हणाला, “आम्ही युद्धाच्या दुष्परिणामांची चर्चा करीत होतो. पण तू अशी टोकाची भूमिका स्वीकारशील याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता.”
४. सिद्धार्थ उत्तरला, “परिस्थिती असे वळण घेईल याचा मी सुद्धा विचार केला नव्हता. मला अशी अपेक्षा होती की, शांती स्थापनेसाठी मी माझ्या युक्तिवादाने शाक्यांचे मन वळवू शकेन.
५. “दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्यांनी लोकांच्या भावना एवढया उत्तेजित केल्या की, त्यांच्यावर माझ्या युक्तिवादाचा कोणताही परिणाम झाला नाही.
६. “परंतु परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी मी सतत प्रयत्नशील होतो व त्यात मी यशस्वीही झालो. याची जाणीव आपणास आहेच. मी सत्य आणि न्यायाच्या तत्त्वापासून विचलितही झालो नाही. सत्य आणि न्यायाच्या तत्त्वांच्या रक्षणासाठी जी शिक्षा भोगावी लागेल ती व्यक्तिशः माझ्याच वाट्याला यावी यातही मी यशस्वी झालो आहे.”
७. याने शुद्धोदनाचे समाधान झाले नाही. ‘आमचे काय होईल याचा तू विचार केला नाहीस.’ शुद्धोदन म्हणाला, ‘परंतु याच कारणास्तव मी परिव्राजक व्हावयाचा निर्णय घेतला’ सिद्धार्थ उत्तरला. शाक्यांनी जर तुमची भूमी अधिग्रहित (जप्त) करण्याचा आदेश दिला तर काय होईल याचाच मी विचार केला’
८. ‘परंतु तुझ्याशिवाय या भूमीचा आम्हाला काय उपयोग ?’ शुद्धोदन दुःखाने विलाप करू लागला “आपण सर्वच कुटुंबीय शाक्याचा हा देश सोडून तुझ्यासोबत विजनवासात का जाऊ नये ?”
९. प्रजापती गौतमी अश्रू गाळीतच शुद्धोदनाबरोबर संभाषणात सहभागी झाली. ती म्हणाली, “मी तुझ्या पित्याशी सहमत आहे. आम्हाला असे सोडून तू एकटा कसा जाऊ शकतोस ?”
१० सिद्धार्थ म्हणाला, ‘माते, तू क्षत्रिय माता आहेस तर त्याला साजेसे शौर्य धैर्य तू दाखविले पाहिजे. असे दुःखी होणे तुला शोभत नाही. जर मी युद्धक्षेत्रात गेलो असतो व मला वीरगती प्राप्त झाली असती तर तू काय केले असते ? तू असाच शोक व्यक्त केला असता काय ?’
११. ‘नाही.’ गौतमी उत्तरली. ते क्षत्रियाला साजेसेच ठरले असते. परंतु तू आता लोकांपासून दूर वनश्वापदांच्या सहवासात राहण्यासाठी वनात जात आहेस. तेव्हा आम्ही येथे सुखात कसे राहू
शकतो ? माझे तुला सांगणे आहे की तू आम्हालाही सोबत न्यावे.’
१२. ‘मी तुम्हा सर्वांना माझ्यासोबत कसे नेऊ शकतो ? नंद तर अजून बालकच आहे. माझा पुत्र राहुल तर नुकताच जन्मला आहे. माते, त्यांना सोडून तू येऊ शकतेस काय ?” सिद्धार्थाने विचारले.
१३. गौतमीचे समाधान झाले नाही. ती आर्जवे करू लागली व म्हणाली, “आम्ही सर्व शाक्यांचा देश सोडून कोशलांच्या देशाला कोशल नरेशाच्या आश्रयाला जाऊ आणि हे शक्य आहे.”
१४. “परंतु माते शाक्य आम्हाला काय म्हणतील ?” सिद्धार्थाने विचारले. “ते याला देशद्रोह मानणार नाहीत काय ? याशिवायही मी वाणी आणि कृतीने असे काहीही करणार नाही की, ज्यामुळे
कोशल नरेशाला माझ्या प्रव्रज्येचे खरे कारण कळेल. कारण तसे मी शाक्यांना वचन दिले आहे.
१५. “हे खरे आहे की मला वनात एकटेच राहावे लागेल पण काय अधिक योग्य आहे ? वनात एकटे राहणे की लोकांच्या संहारात सहभागी होणे.”
१६. “परंतु इतकी घाई का ?” शुद्धोदनाने विचारले, “शाक्य संघाने काही काळापुरते युद्ध
स्थगित केले आहेच.
१७. कदाचित युद्ध होणारच नाही. तू आपली प्रव्रज्या स्थगित का करीत नाहीस? कदाचित
शाक्य समूहात तुला राहण्याची अनुमतीही प्राप्त होईल.”
१८. सिद्धार्थाला हा विचार मुळीच रुचला नाही “भी प्रवज्या स्वीकारण्याचे मान्य केल्यामुळेस संघाने कोलीयांशी त्वरित युद्ध आरंभ करण्याचा विचार स्थगित केला” सिद्धार्थ म्हणाला.
१९.मी प्रव्रज्या घेतल्यानंतर युद्धघोषणा मागे घेण्याविषयी कदाचित संघाचे मतपरिवर्तनही होईल. परंतु हे सर्वप्रथम माझ्या प्रव्रज्या घेण्यावर अवलंबून आहे.
२०. मी अभिवचन दिले आहे आणि मी ते पाळलेच पाहिजे. माझ्या वचनभंगाचे परिणाम आप्पा सर्वाकरता आणि शांती स्थापनेच्या उद्देशाकरिता असे दोहोकरिताही भयानक होऊ शकतात.
२१. “माते, आता तू माझ्या मार्गात येऊ नये. तू मला तुझी अनुमती आणि आशीर्वाद द्यावेत जे काही होईल ते सर्वाच्या कल्याणाचेच असेल”
२२. गौतमी आणि शुद्धोदन अबोल झाले.
२३. त्यानंतर सिद्धार्थाने यशोधरेच्या महालाकडे प्रयाण केले. तिला पाहून तो स्तव्य राहिला. काय बोलावे आणि कसे बोलावे हे त्याला कळेचना ! तिनेच शांततेचा भंग केला. ती म्हणाली, ‘कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा संपूर्ण वृत्तांत मला समजला आहे.’
२४. त्याने तिला विचारले, “यशोधरे, प्रव्रज्या घेण्याच्या माझ्या निर्णयाविषयी तुला काय वाटते ते
मला सांग”
२५. हे ऐकून ती मूर्च्छित होईल अशी त्याची अपेक्षा होती पण असे काहीच घडले नाही.
२६. आपल्या भावनांवर पूर्ण नियंत्रण ठेवून ती उत्तरली, “मी तुमच्या स्थानी असते तर मी तरी दुसरे काय केले असते ? मी कोलीया विरुद्धच्या युद्धात निश्चितच भागीदार झाले नसते.
२७. “तुमचा निर्णय योग्य आहे. त्याला माझी संमती आणि पूर्ण सहकार्य आहे. मी सुद्धा तुमच्या सोबतच प्रव्रज्या स्वीकारली असती. परंतु मी तसे करू शकणार नाही. कारण मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे.
२८. “असे होऊ नये अशी माझी अपेक्षा होती. परंतु आम्ही धैर्याने आणि शौर्याने परिस्थितीशी सामना केला पाहिजे. तुम्ही तुमच्या माता पित्याची आणि पुत्राची मुळीच चिंता करू नये. जिवंत असेपर्यंत मी त्यांची काळजी घेईन.
२९. “माझी एकच इच्छा आहे. तुम्ही आप्त स्वजनापासून स्वकीयांपासून दूर जाणार त्यांना मागे ठेवून तुम्ही परिव्राजक होणार तुम्हाला जीवनाचा नवीन मार्ग सापडेल. तो मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग असेल.”
३०. सिद्धार्थ गौतम खूपच प्रभावित झाला यशोधरा एवढी धैर्यवान, शौर्यवान व उदारमनाची असेल याची त्याला यापूर्वी कधीच जाणीव झाली नव्हती. यशोधरेसारखी भार्या मिळाल्याबद्दल तो स्वतःलाच धन्य समजू लागला आणि आता नियती त्यांना पृथक करीत आहे असाही विचार त्याच्या मनात आला. त्याने तिला राहुलला घेऊन येण्यास सांगितले. त्याने पित्याच्या वात्सल्यपूर्ण नजरेने राहुलला न्याहाळले आणि निरोप घेतला.
More Stories
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग पाचवा – १. बुद्ध आणि वैदिक ऋषी.
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग चवथा – ४. बोधिसत्व असलेले गौतम सम्यक् सम्बोधी प्राप्त झाल्यावर बुद्ध झाले.
बुद्ध आणि त्यांचा धम्म -भाग चवथा – ३. नव्या धम्माचा आविष्कार