September 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग चवथा – १. नूतन- प्रकाश प्राप्तीसाठी ध्यानसाधना !

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड : भाग चवथा – नवीन मार्गाचे दर्शन आणि बोधिलाभ

🌼 १. नूतन- प्रकाश प्राप्तीसाठी ध्यानसाधना ! 🌼

१. अन्त्रग्रहण करून गौतम प्रफुल्लित झाला. तो अंतर्मुख होऊन आपल्या पूर्वानुभवावर विचार करू लागला. त्याला अनुभूती झाली की प्रचलित, प्रस्थापित सर्व मार्ग असफल झाले आहेत.

२. हे अपयश एवढे मोठे होते की त्यामुळे कोणालाही वैफल्य येणे स्वाभाविक होते. गौतमाला निश्चितच या अपयशाने खेद वाटला. पण वैफल्याचा त्याला स्पर्शही झाला नाही.

३. मार्गाच्या शोधाप्रति तो निरंतर आशावादी होता. त्याचा आशावाद एवढा दांडगा होता की, ज्या दिवशी त्याने सुजाताने दिलेले अन्न ग्रहण केले त्याच रात्री त्याला पाच स्वप्ने पडली. जागा झाल्यावर त्याने त्या स्वप्नांची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला “आपणास बुद्धत्व प्राप्त होणार व” याची त्याला अनुभूती झाली.

४. त्याने आपले भवितव्य जाणून घेण्याचाही प्रयास केला. सुजाताच्या सेविकेने आणलेले अन्नपात्र त्याने असे म्हणून निरंजना नदीत समर्पित केले की, “मला जर बुद्धत्व प्राप्त होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने वाहत जाईल. अन्यथा प्रवाहाच्या खालच्या दिशेने जाईल.” ते पात्र खरोखरच प्रवाहाच्या वरच्या दिशेने वाहत गेले. शेवटी ते पात्र नागराजा काळ याच्या प्रासादाशेजारी नदीत विसर्जन पावले.

५. आशा आणि दृढसंकल्पाने युक्त होऊन त्याने उरुवेला सोडली. महामार्गावरून मार्गक्रमण करीत संध्यासमयी तो गयेला पोहोचला. तेथे त्याला एक पिंपळ वृक्ष दिसला. त्याने त्या पिंपळ वृक्षाखाली ध्यानस्थ होण्याचा निर्धार केला. या आशेने की त्याला नूतन ( नवीन ) प्रकाश प्राप्त होईल. त्याला असा मार्ग सापडेल की ज्या मार्गाने त्याच्या समस्येचे समाधान होईल.

६. चारही दिशांचे अवलोकन करून त्याने पूर्व दिशा निवडली. चित्तमल, क्लेष, दुःख यांच्या क्षयानिमित्त थोर ऋषी मुनींनी याच दिशेचे चयन केले होते.

७. त्या पिंपळ वृक्षाखाली ताठ देहाने तो पद्मासन घालून बसला. बुद्धत्व प्राप्त करण्याचा संकल्प करून तो स्वतःशीच बोलला, “देहाचे रक्त आणि मांस वाळले तरी चालेल. देहात त्वचा, मज्जा आणि अस्थीच उरल्या तरी चालेल. पण बुद्धत्व प्राप्त झाल्याशिवाय मी हे स्थान त्यागणार नाही.”

८. नंतर काळ तो नागांचा राजा, हत्तींच्या राजासम तेज:पुंज असा राजा आणि त्याची भार्या सुवर्णप्रभा दोघेही पिंपळ वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतमाच्या स्वप्न दर्शनाने जागे झाले आणि हा निश्चितच बुद्धत्वास प्राप्त होईल या विश्वासाने त्यांनी त्याची स्तुती केली. ते म्हणाले,

९. “हे मुनिवर, तुमच्या पावलांनी दबलेली धरणी पुन:पुन्हा प्रतिध्वनी करते की, तुम्ही सूर्यासारखे तेजोमय आहात. तुम्हाला तुमचे इच्छित फल प्राप्त होईलच यात शंका नाही.”

१०. “हे कमलनयना, आकाशात विहार करणारे पक्षीही तुम्हाला प्रणिपात (वंदन) करीत आहेत. आसमंतात मंदमंद पवन वाहतो आहे. हे सर्व हेच ध्वनित करतात की, तुम्हाला निश्चितच तुमचे इप्सित साध्य होईल.”

११. तो ध्यानस्थ बसला असताना दुष्ट विचार आणि दुष्ट कामनांनी समुहाने त्याच्या चित्तावर आक्रमण केले. या दुष्ट विचारांना आणि दुष्ट कामनांना पौराणिक कथातून माराची संतती म्हणून उल्लेखिले आहे.

१२. गौतम भयभीत झाला. त्याला असे वाटले की हे दुष्ट विचार आणि दुष्ट कामना त्याच्यावर विजय प्राप्त करतील. त्याचा हेतू असफल होईल.

१३. दुष्ट विचार आणि दुष्ट कामना यांच्या विरुद्धच्या युद्धात अनेक ऋषी आणि ब्राह्मणांना
पराजित व्हावे लागले याची त्याला जाणीव होती.

१४. म्हणून त्याने आपले सर्व धैर्य एकवटले. तो माराला म्हणाला, “माझ्यात श्रद्धा आहे. माझ्यात वीर्य आहे. माझ्यात प्रज्ञा आहे. अशा स्थितीत तुझ्यासारख्या दुष्ट कामना मला कशा पराजित करू शकतील ?” “हे वाऱ्याचे झोत नदीचा प्रवाह कोरडा करू शकतात. परंतु माझा संकल्प एवढा दृढ आहे की तू तो तोडण्यात कदापिही यशस्वी होणार नाहीस. या युद्धात मला मृत्यूला सामोरे जावे लागले तरी चालेल. पण जिवंतपणी पराजय शक्यच नाही.”

१५. काक (कावळे) जसे मृदु मधुर भक्ष्य मिळेल या आशेने पत्थराला स्निग्धांश युक्त मांसाचा तुकडा (चरबीचा) समजून त्यावर तुटून पडतात तसेच दुष्ट वासनांनी गौतमाच्या चित्तावर आक्रमण केले.

१६. पत्थरावर आक्रमण करून काहीही मृदु मधुर भक्ष्य मिळत नाही असे पाहून काक जसे उडून जातात तद्वतच निराश, हताश होऊन दुष्ट वासनांनी-गौतमा विरुद्धचे आपले आक्रमण परत घेतले.

१. नूतन – प्रकाश प्राप्तीसाठी ध्यानसाधना ! ( समाप्त )….