July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

“जागतिक वारसा सप्ताह”

१९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा संपूर्ण जगभर युनेस्को “जागतिक वारसा सप्ताह” म्हणून साजरा करते. याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व लोकांना विशेषतः तरुणांना आपल्या देशातील सर्व प्राचीन वारसा बद्दल जनजागृती करणे तसेच या सर्व वारसास्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणे होय. भारतातही या सप्ताहात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वारसास्थळां बद्दल जनजागृती अभियान व इतर कार्यक्रम घेतले जाणार आहेत. म्हणजेच या सप्ताहात, भारतातील सर्वात प्राचीन वास्तूंबद्दल जनजागृती करणे, त्या वास्तूंच्या संवर्धन आणि संरक्षण करण्याची प्रतिज्ञा करणे.
मात्र प्राचीन वारसास्थळे कोणाला म्हणायची? पुरातत्त्वीय निकषानुसार जी वास्तू १०० वर्षांपेक्षा जुनी आहे ती “प्राचीन” आणि मग अनेक निकषांमुळे तिचा काळ आणखीन मागे जाऊ शकतो. म्हणजे एखादी उपलब्ध वास्तू शंभर वर्षांपासून ते हजारों वर्षे इतकी जुनी असू शकते. जगातील सर्वात प्राचीन पुरातत्त्वीय निकषांनुसार बांधलेली वास्तूं मध्ये भारतातील दोन प्रमुख स्थळे आहेत आणि त्या दोन्ही मौर्यकालीन आहेत! सांची येथील स्तूप आणि सारनाथ येथील धम्मेक स्तूप या त्या दोन वास्तू आहेत ज्या सम्राट अशोकांनी बांधलेल्या आहेत!! भारतातील सर्वात प्राचीन दगडातील कोरीव लेणीं देखील सम्राट अशोकांनी कोरली आहे – नागार्जुनी आणि बाराबार डोंगरातील लेणीं! भारतातील सर्वात प्राचीन लिखित पुरावा देखील सम्राट अशोकांचे शिलालेख आहेत…
महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावर सातवाहन राजांनी कोरलेली बुद्ध लेणीं या महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन दगडातील कोरीव वास्तू आहेत तर नाला सोपारा येथील स्तूप हे सम्राट अशोकांनी बांधलेली सर्वात प्राचीन वास्तू आहे. महाराष्ट्रातील या सर्व बुद्ध लेणीं येथील प्रदेशाच्या सर्वात प्राचीन कोरीव वास्तू आहेत. यातील शिलालेख हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लिखित पुरावा आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अथवा महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाला मात्र या सर्वात प्राचीन वास्तूंचा विसर पडलेला दिसतोय…आणि ते साहजिकच आहे!!! महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्यातील पुरातत्त्व विभागाने अथवा इतिहासतज्ञांनी अथवा पुरातत्त्व तज्ज्ञांनी या लेणींना आपल्या जागतिक वारसा सप्ताहात “जागा” दिलेली नाही. का बरे महाराष्ट्रातील (विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील) एकाही जिल्ह्याने या प्राचीन बुद्ध लेणींवर जनजागृतीचा कार्यक्रम ठेवला नाही, किंवा या बुद्ध लेणींविषयी कार्यशाळा ठेवली नाही किंवा त्यांच्या पत्रकात या लेणींचा साधा उल्लेख देखील केला नाही? हा त्यांचा कोतेपणा कि समजून उमजून दाखवलेली अनास्था? मुळातच त्यांच्या डोळ्यांदेखत या सर्व बुद्ध लेणींवर चाललेले अतिक्रमण हे “त्यांच्याच” आशीर्वादाने चालले आहे असे म्हणायला खरं तर काय हरकत आहे? असो…
मित्रांनो, भारतातील सर्वात प्राचीन वारसा म्हणजे या बुद्ध लेणीं, बुद्ध स्तूप आणि या लेणींतील शिलालेख आणि शिल्प….चला, त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची आपण प्रतिज्ञा करू यात. हा वारसा आपल्यालाच प्राणपणाने जपायचा आहे. तुम्हीं एकटे असा अथवा एका ग्रुपचे….जबाबदारी ही आपलीच आहे आणि राहणार….
अतुल भोसेकर
९५४५२७७४१०
“World Heritage Week”