November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

विपश्यना काय आहे ? What is Vipassana ?

विपश्यना काय आहे:

  • ही दुःखमुक्तिची साधना आहे.
  • ही मनाला निर्मळ करणारी अशी साधना आहे, ज्यामुळे साधक जीवनांतील चढ-उतारांचा सामना शांतिपूर्वक तसेच संतुलित राहून करु शकेल.
  • ही जीवन जगण्याची कला आहे ज्यापासून साधक एका स्वस्थ समाजाच्या निर्मितीमध्ये सहयोगी होतो.

 

विपश्यना साधनेचे उच्चतम आध्यात्मिक लक्ष्य विकारांपासून संपूर्ण मुक्ती आणि बोधि प्राप्त करणे आहे. साधनेचा उद्देश केवळ शारिरीक दुःखांपासून मुक्ती नाही. परंतु, चित्तशुद्धीमुळे कित्येक मनोशारीरिक (सायकोसोमॅटिक) आजार आपोआप दूर होतात. वस्तुतः विपश्यना ही दुःखाची मूळ तीन कारणे – मोह, द्वेष तसेच अविद्या दूर करते. तर जो कुणी ह्या साधनेचा नियमित अभ्यास करत राहिला तर एकेक पाऊल पुढे जात राहून आपल्या मानसिक विकारांपासून पूर्ण मुक्त होऊन नितांत विमुक्त अवस्थेचा साक्षात्कार करू शकतो.

विपश्यना साधना गौतम बुद्धांनी शोधून काढली असली, तरी ह्या साधनेचा अभ्यास बौद्धजनांपर्यंत मर्यादित नाही. कोणत्याही पार्श्वभूमीची व्यक्ती ही करू शकते आणि ह्याचा लाभ घेऊ शकते. विपश्यना शिबीरे अशा व्यक्तिंसाठी खुली आहेत की जे प्रामाणिकपणे ही विधी शिकू इच्छितात. ह्यामध्ये कुल, जाति, धर्म किंवा राष्ट्रियता आड येत नाही. जगभरातील हिन्दु, मुस्लीम, शीख, बौद्ध, ईसाई, यहुदी तसेच अनेक अन्य संप्रदायातील व्यक्तींनी अत्यंत यशस्वीततेने विपश्यना साधनेचे लाभ अनुभवले आहेत कारण रोग सार्वजनीन आहे म्हणूनच इलाजदेखील सार्वजनीन व्हायला पाहिजे.

साधना तसेच स्वयंशासन

आत्मनिरिक्षणाद्वारे आत्मशुद्धिची साधना निश्चितच सोपी नाही – साधकांना खूप परिश्रम करावे लागतात. स्वतःच्या प्रयत्नाने साधक स्वानुभवातून आपली प्रज्ञा जागृत करतात; दुसरी कुणी व्यक्ती त्याच्यासाठी हे काम करू शकत नाही. म्हणूनच, स्वेच्छेने गंभीरपणे आणि स्वयंशासन पाळणाऱ्या व्यक्तीना ही साधना उपयुक्त होइल, जी साधकाच्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी आहे व शिबीराची अनुशासन संहिता ही साधनेचेच एक अंग आहे.

अंतरमनात खोलवर जाऊन तिथे साचलेल्या संस्कारांचे निर्मुलन करण्याची साधना शिकण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी निश्चितच खूप कमी आहे. एकांतामध्ये अभ्यासाची निरंतरता ठेवणे हीच ह्या साधनेतील यशाची गुरुकिल्ली आहे. हा दृष्टिकोन लक्षात ठेऊनच नियमावली आणि समय-सारिणी बनवलेली आहे. ती आचार्य अथवा व्यवस्थापनाच्या सुविधेसाठी नाही. तसेच ते कुठल्याही परंपरेचे अंधानुकरण नाही किंवा कोणतीही अंधश्रध्दा नाही. ह्यामागे हजारो साधकांच्या वर्षानुवर्षांच्या अनुभवाचा वैज्ञानिक तसेच तर्कसंगत आधार आहे. नियमांचे पालन केल्याने साधनेसाठी अनुकूल वातावरण तयार होते; नियम तोडल्याने हे वातावरण दूषित होते.

शिबीरार्थीना शिबीराच्या संपूर्ण ११ दिवसाच्या कालावधीत शिबीरस्थळी राहाणे बंधनकारक आहे. येथील नियमावलीतील अन्य नियमदेखील काळजीपूर्वक वाचावे. जे ह्या नियमावलीचे निष्ठेने तसेच गंभीरतेने पालन करू शकतात त्यांनीच शिबीरामध्ये प्रवेशासाठी आवेदन करावे. जे निर्धारित प्रयत्न करण्यास अनुकूल नाहीत ते त्यांचा स्वतःचा वेळ तर वाया घालवतीलच, तसेच गंभीरतापूर्वक काम करू इच्छिणाऱ्याना बाधा निर्माण करतील. नियमावली कठिण वाटल्याने शिबीर सोडून जाणे हे हानिकारक तसेच अनुचित आहे हे आवेदकाने समजून घ्यावे. तसेच वेळोवेळी समजावूनसुद्धा शिबीरार्थी नियमावलीचे पालन करत नसल्यास त्यांना शिबीर सोडून जायला सांगणे हे अधिक दुर्भाग्यपूर्ण असेल.

मानसिक रोगांच्या पीडित लोकांसाठी

गंभीर मानसिक रोगाने पीडीत व्यक्ती कधीकधी ह्या आशेने विपश्यना शिबीराला येतात की ही साधना त्यांचे सर्व मानसिक रोग दूर करेल. अस्थिर मन विविध उपचारांमुळे व काही गंभीर मानसिक आजारांमुळे अशा व्यक्तीना लाभ मिळणे दुरच पण कित्येकदा दहा दिवसांचे शिबीर पूर्ण करणे त्यांना कठीण होऊ शकते. नॉन-प्रोफेशनल स्वयंसेवी संघटनेच्या रूपातील आमची क्षमता अशा पार्श्वभूमीच्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी असमर्थ आहे. जरी विपश्यना साधना बहुतेकांसाठी लाभदायक असली, तरी ही साधना औषधोपचार तसेच मानसोपचारांच्या ऐवजी नाही. तसेच गंभीर मानसिक रूग्णांना आम्ही ह्या साधनेची शिफारस करीत नाही.

अनुशासन संहिता

शील (sīla) अर्थात नैतिक वर्तणुक हा साधनेचा पाया आहे. समाधीच्या (samādhi)म्हणजे मनाच्या एकाग्रतेच्या विकासासाठी शील हाच पाया आहे; आणि मनाची शुध्दता प्रज्ञेव्दारे(paññā) होते — आंतरिक ज्ञान.

 

सर्व शिबीरार्थीना शिबीरादरम्यान पांच शीलांचे पालन करणे अनिवार्य आहे:

  1. कोणत्याही प्राण्याची हत्या न करणे;
  2. चोरी न करणे.
  3. अब्रह्मचर्य(मैथुन) पासून दूर राहणे
  4. खोटे बोलण्यापासून दूर राहणे.
  5. नशा करणाऱ्या वस्तूपासून दूर राहणे.

 

जुने साधक, अर्थात असे साधक की ज्यांनी आचार्य गोयन्काजी किंवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर दहा दिवशीय शिबीर पूर्ण केले आहे त्याना आणखी तीन शीलांचे शीलांचे पालन करावे लागेल:

  1. दुपारनंतर भोजन वर्ज करणे.
  2. शॄंगार-प्रसाधन तसेच मनोरंजन वर्ज करणे
  3. ऊंच किंवा आरामदेही शय्या वर्ज करणे.

 

जुने साधक सायंकाळी ५ वाजता लिंबू पाणी घेऊन सहावे शील पाळतील, परंतु नवे साधक दुधासहित चहा आणि फळे घेऊ शकतील. आजारी किंवा विशिष्ट परिस्थितीत जुन्या साधकांना फलाहाराची सूट अचार्यांच्या अनुमतीने घेता येते. सातवे आणि आठवे शील सर्वांना बंधनकारक आहे.