July 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्ध विचार – अतुल भोसेकर

भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्ध विचार ( ७३व्या भारतीय संविधान दिन निमित्त )

राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना २९ ऑगस्ट १९४७ साली झाली व पहिली बैठक ३० ऑगस्ट रोजी पार पडली व सलग २ वर्षे, ११ महिने आणि १७ दिवसांनंतर म्हणजेच २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सादर करण्यात आली. येत्या २६ नोव्हेंबरला, त्या ऐतिहासिक घटनेला, ७३ वर्षे पूर्ण होतायत. राज्यघटनेच्या preamble (प्रस्तावना) मधील सुरुवातीच्या ओळींमध्ये म्हटल्या प्रमाणे, भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून ओळखले जाणार असे म्हटले आहे.

लोकशाहीची व्याख्या आणि व्याप्ती स्पष्ट करताना बाबासाहेब म्हणतात,”लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात, जिच्याद्वारा रक्तपाताशिवाय मूलगामी क्रांतिकारक बदल घडवून आणता येतात अशी शासनाची घडण आणि पद्धती म्हणजेच लोकशाही होय”. म्हणजेच या देशातील प्रत्येक व्यक्तीला राजकीय, आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीच्या माध्यमातून स्वतःचा उत्कर्ष करण्याचे स्वातंत्र्य असेल. मात्र ते निक्षून सांगतात कि,”राजकीय लोकशाहीने आपण संतुष्ट राहता कामा नये कारण याचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत झाले पाहिजे”. कारण आर्थिक आणि सामाजिक लोकशाही जर नसेल तर राजकीय लोकशाहीला अर्थ उरत नाही आणि मग तिची वाटचाल हुकूमशाही कडे सुरु होते. लोकशाही ही फक्त स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या अखंड आणि अभंग अशा त्रयींवर टिकून आहे.

सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला सर्वात मोठा अडथळा येथील जाती व्यवस्थेचा आहे हे देखील बाबासाहेब जाणून होते. कारण जातीनिष्ठ समाज, व्यक्तीला स्वउन्नतीचे शिक्षण किंवा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य नाकारते. त्यामुळे लोकशाही रुजविण्यासाठी जातिभेदाविरुद्ध लढा देणे गरजेचे आहे. बाबासाहेबांचा लढा हा विशिष्ट जाती विरुद्ध मर्यादित नव्हता तर तो लढा उच्चनीचभेदाला होता. ‘बहिष्कृत भारतच्या १ जुलै १९२७च्या अंकात बाबासाहेब लिहितात, “ब्राम्हण लोक आमचे वैरी नसून ब्राम्हण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत असे आम्ही मानतो”. ब्राम्हण्याची व्याख्या करताना मनमाड येथील भाषणात बाबासाहेब म्हणतात,”स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना नकार म्हणजेच ब्राम्हण्य होय”

बुद्ध विचारातील दुःख या अरिय सत्याला बाबासाहेबांनी सामाजिक दृष्ट्या शोषणाचे स्वरूप दिले आणि सदोष समाज रचना हे या शोषणाचे मूळ कारण आहे असे नमूद केले. या मानवी दुःखाचे निवारण करायचे झाल्यास, मूठभर लोकांना मिळणारा लाभ सामाजिक लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना मिळावा असे त्यांना वाटे. जात व वर्ग हे शोषणाचे दोन मार्ग असून त्यांचे उच्चाटन झाल्याशिवाय समाजात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता नांदणार नाही हे ही बाबासाहेब स्पष्ट करतात. ते पुढे म्हणतात कि लोकशाहीच्या मूल्यांनुसार धर्माची चिकित्सा करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयींवर आधारित धर्माची बांधणी असावी असा बाबासाहेबांचा आग्रह होता.

Annihilation of Castes मध्ये बाबासाहेब म्हणतात, “मला विचाराल तर माझा आदर्श समाज म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता वर आधारित समाज असेल”. बाबासाहेब या तिन्हींवर जोर देतात त्याचे कारण म्हणजे या तिन्हीं पैकी एक जरी नसेल तरी समाजस्वास्थ्य बिघडू शकेल. याचे महत्त्वाचे कारण या त्रयींचे आपसातील संबंध. समतेशिवाय स्वातंत्र्य आणि बंधुताला अर्थ नाही, बंधुताशिवाय स्वातंत्र्य आणि समतेला अर्थ नाही तर समता आणि बंधुता शिवाय मनुष्याच्या स्वातंत्र्याला स्वार्थीपणा येतो. या तिन्हींचे सहअस्तित्व गरजेचे आहे तरच समाज सुदृढ होऊ शकेल. बुद्धांनी सांगितलेल्या मार्गात या तिन्हींचे सहअस्तित्व आहे असेही बाबासाहेब नमूद करतात.

२५ नोव्हेंबर १९४९ मध्ये घटना समितीच्या शेवटच्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, “लोकशाही ही प्राचीन भारताची ओळख होती. संसदीय प्रक्रिया ही बुद्धांच्या भिक्खू संघाला लागू होती”. म्हणजेच आजच्या लोकशाहीची मूल्ये ही प्राचीन बुद्ध विचारांची बीजे आहेत. लोकशाहीची मूल्ये जपली नाही तर त्या जागी हुकूमशाही राजवट येईल आणि देश पुन्हा पारतंत्र्यात जाऊ शकेल ही बाबासाहेबांची भीती होती. यासाठी लोकशाहीने प्रदान केलेले स्वातंत्र्य प्राणपणाने जपले पाहिजे असेही आवाहन ते करतात.

स्वातंत्र्यावर गदा दोन कारणांनी येऊ शकते: जर लोकांनी पक्षाचे हित राष्ट्रहितापेक्षा मोठे मानले तर आणि दुसरे कारण म्हणजे जर लोकांनी विभूतिपूजेला जास्त महत्त्व दिले तर. यावर बोलताना बाबासाहेब म्हणतात,”माणूस कितीही मोठा असला तरी आपले स्वातंत्र्य त्याच्या पायावर अर्पण करू नये; असे केल्याने त्याच्या हातात संपूर्ण सत्ता दिल्यासारखे होईल आणि अशी व्यक्ती लोकशाही संस्था नाश करू शकेल एवढी सामर्थ्यवान होऊ शकेल. आजची परिस्थिती पाहता बाबासाहेब किती दूरदृष्टी होते हे लक्षात येईल.

लोकशाही आणि त्यायोगे प्रत्येक भारतीयाला मिळालेले स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर बाबासाहेब तीन मार्ग सांगतात:

१. राष्ट्रहिता पेक्षा कोणालाही अथवा कोणत्याही गोष्टीला श्रेष्ठ मानू नये.
२. राजकारणातील विभूतिपूजा ही राष्ट्राला अधोगतीकडे नेणारी असून, हुकूमशाही राजवटीचा पाया आहे. त्यामुळे राजकारणातील विभूतिपूजा प्रत्येकाने नाकारावी.
३. राजकारणातील लोकशाहीचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत जितक्या लवकर करता येईल ते केले पाहिजे.

याचाच अर्थ, जातिविरहित, समतावादी, मूल्याधिष्ठित समाज व्यवस्था हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी लोकशाही मूल्य आणि बुद्ध विचार ही त्यांची साधने होती. २६ ऑक्टोबर १९५१ मध्ये जालंधर येथील दयानंद कॉलेज मध्ये व्याख्यान देताना बाबासाहेब म्हणाले, “संसदीय लोकशाही भारताला नवीन नाही. महापरिनिर्वाण सुत्तात त्याचे पुरावे आढळतात. आर्थिक, सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य हे बौद्ध धम्माचे सार आहे. लोकशाहीचा प्रणेता म्हणून भ. बुद्धांची नोंद इतिहासात आहे. म्हणून माणसाला खरे स्वातंत्र्य बुद्ध विचारातच आढळेल”. मग नेमका बुद्ध विचार आपल्याला लोकशाहीची मूल्ये कशा प्रकारे सांगतो?

प्रत्येक मनुष्याला, कुठल्याही जाती, धर्म अथवा पंथाचे निकष न लावता उत्कर्षापर्यंत पोहचविणे हे बुद्धविचारांचे ध्येय आहे. बुद्धांनी आपल्या संघात लोकशाहीची मूल्य पुरेपूर रुजवल्याचे दिसते. प्रत्येकाला बुद्ध विचार जाणून घेण्याचे व ते पटल्यास आचरण करण्याचा पूर्ण अधिकार होता. त्याच बरोबर ज्यांना पटले नाही त्यांना ते नाकारण्याचाही अधिकार होता. म्हणजेच बुद्धांनी कोणावरही जबरदस्ती केली नाही. प्रत्येकला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. बुद्धांनी स्वतःला कुठेही मुक्तिदाता अथवा मोक्षदाता म्हणून संबोधले नाही. कालाम सुत्तात बुद्ध म्हणतात कि मी म्हणतोय म्हणून ग्राह्य धरू नका, कुठे लिहिले आहे म्हणून ग्राह्य धरू नका, कोणी बळजबरी करतंय म्हणून मान्य करू नका, तर स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला विचारून निर्णय घ्या. म्हणजेच बुद्धांनी प्रत्येकाला विचार करण्याचे व त्यायोगे स्वतः निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते. भिक्खूसंघामध्ये बुद्धांनी सर्वांना मुक्त प्रवेश दिला.“एही पस्सिको” म्हणजे या आणि पहा म्हणत त्यांनी नवागतांना संघामध्ये विना दीक्षा राहण्याची परवानगी दिली आणि योग्य वाटल्यास संघामध्ये दीक्षा घ्या हे सांगितले. एवढेच नव्हे तर समजा एखाद्या भिक्खूला संघ त्याग करायचा असेल तर त्याला ते स्वातंत्र्य होते. म्हणजेच संघात आल्यानंतरही कोणावरही जबरदस्ती नव्हती.

बुद्धांच्या भिक्खू भिक्खुणी संघात अनेक राजपुत्र, व्यापारी, धनिक व सामान्य लोक होते, मात्र सर्वांना नियम सारखाच होता. बुद्धांची देशना ही सर्वांना समान होती व त्यात कुठेही आचार्यामुष्टि हा प्रकार नव्हता. म्हणजेच संघा मध्ये समता होती. स्त्री पुरुष, उच्च नीच, गरीब श्रीमंत, राजा प्रजा असा भेद न करता बुद्धांनी सर्वांना संघात प्रवेश दिला आणि सर्वांना एकाच पद्धतीने, उत्कर्षापर्यंत पोहचण्याची संधी दिली. संघाचे प्रत्येक आचरण समतावादी होते. भिक्खू भिक्खुणी संघात दान म्हणून आलेल्या प्रत्येक वस्तूवर संघाचा अधिकार होता. येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर संघ एकत्रित येऊन काम करत होता. आजारपणात भिक्खुच एकमेकांची काळजी घेत. एवढेच नव्हे तर आजारी भिक्खूसाठी इतर भिक्खू भिक्षाटन करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करत. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी भिक्खू भिक्खुणींची परिषद बोलावली जात व सर्व सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेतला जात. बुद्धांच्या संघात समता आणि बंधुता रुजवली गेली होती. दुःखमुक्ती हा मानव कल्याणाचा मार्ग कळल्याने अनेक भिक्खू भिक्खुणी सर्वसामान्यांना त्या ज्ञानाचा प्रसार करीत. हे करताना भिक्खुंमध्ये सर्वसामान्यांप्रती करुणा आणि बंधुतेची भावना होती हे लक्षात घेतले पाहिजे.

आज धार्मिक कर्मकांडाच्या माध्यमातून आपल्या देशातील लोकांना सर्रासपणे भुलविले जाते व लोकशाहीच्या मूल्यांपासून दूर नेले जाते. हा एक महत्त्वाचा शोषणाचा मार्ग आहे.

अडीच हजार वर्षांपूर्वी लोकशाहीची मूल्ये राबविल्यामुळेच बाबासाहेबांनी बुद्धांना लोकशाहीचा प्रणेता म्हटले आहे. बुद्धांच्या प्रत्येक विचारात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वे पाहायला मिळतात. यामुळेच बाबासाहेबांनी जाहीरपणे सांगितले कि राज्यघटनेचा मूळ पाया असलेली तत्वे, ही बुद्ध विचारातून घेतली आहेत.
आज आजूबाजूला असलेल्या विघातक शक्ती हे मूलमंत्र बिघडून टाकण्याचे काम करताना दिसतात. म्हणूनच स्वातंत्र्यापासून पारतंत्र्याकडे नेणारा प्रत्येक राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक विचार आणि ते राबविणारे विविध माध्यमे, समतेकडून जाती, धर्म आणि उच्च नीच भेदभावाकडे नेणारा असमतेचा विचार आणि या योगे भारतीयांमध्ये बंधुता नष्ट करण्याचा प्रयत्न्न, यांचा आम्ही प्रखर विरोध केला पाहिजे तरच या देशात लोकशाहीची मूल्ये अबाधित राहतील.

एडमंड बर्क म्हणतो, “वाईट विचारांच्या लोकांचा विजय तेव्हाच होतो जेव्हा चांगल्या विचारांची लोके शांत बसतात”.

लोकशाही मूल्यांच्या संदर्भात हे बोलायचे झाल्यास लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी लोकशाही मूल्ये जपणाऱ्यांनी आता एकजूट करायला पाहिजे. ही काळाची गरज नव्हे, तुमच्या आमच्या स्वातंत्र्याची परीक्षा आहे. ही स्वातंत्र्याची परीक्षा आपण सर्वजण चांगल्या मार्कांनी पास होऊ यासाठी प्रयत्न करू यात.

भारतीय राज्यघटना स्वीकार दिन म्हणजेच “भारतीय संविधान दिवसाचे हे ७३वे वर्ष आहे. हे संविधान आणि त्यातील मूल्ये प्राणपणाने जपणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे!

अतुल भोसेकर
9545277410

Values of Indian Democracy and Buddhist Thought – Atul Bhosekar | Buddhism | Buddhist Bharat