April 7, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्धविचार रुजविण्याची नितांत गरज – ॲड. जी. डी. घोक्षे

भारतात स्त्रियांवर, तरुणींवर व बालिकांवर बलात्कार करून त्यांचे खून करण्याचे सत्र सुरू आहे. अलीकडे तर त्या गुन्ह्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये, पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारीची पद्धती सर्वत्र सारखी आहे. त्यामुळे या गुन्हेगारीमागे एखादी शक्ती कार्यरत आहे की काय, अशी शंका येते. या मागील शक्तीचा शोध घेणे गरजेचे वाटते. हैद्राबादमध्ये डॉक्टर रेड्डीवर बलात्कार करून तिचा जाळून खून करण्यात आला. भारतभर असंतोषाची लाट उसळली. पोलिसांनी ४ गुन्हेगारांना पकडले व चकमकीत त्यांचा खात्मा केला. अशी प्रकरणे जलदगती न्यायालयात जलदगतीने चालवून जलदगतीने निर्णय व्हावा. गुन्हेगाराला योग्य व कठोर सजा व्हायला हवी. अन्याय-अत्याचारातही जातीयवाद भारतात आढळतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी पब्लिक काॅन्शिक्युस महत्त्वाचे आहे.’
कुणावरही अन्याय झाला तर त्याविरुद्ध भारतीयांनी आवाज उठविला पाहिजे. पण भारतात बऱ्याच वेळा तसे घडत नाही. बौद्ध, एससी, एसटी, भटके विमुक्त यांच्यावर अत्याचार झाल्यास बऱ्याच लोकांना त्याविषयी संताप येत नाही. त्याविरुद्ध लढावेसे वाटत नाही. उच्चवर्णियांवर अत्याचार झाल्यावर उच्चवर्णीय महिला मैदानात उतरतात. मागासवर्गीय महिलांवर उच्चवर्णीय महिलांच्या डोळ्यासमोर बलात्कार झाले, तरी त्याविरुद्ध त्या महिला लढत नाहीत. हे अत्यंत खेदजनक आहे.
महाराष्ट्रातील शिरसगांव (औरंगाबाद-आता जालना) या गांवात बौद्ध महिलांची नग्न धिंड काढण्यात आली, अत्याचार करण्यात आले. न्यायासाठी आरपीआय व मागासवर्गीयांनीच मोर्चे काढले. खैरलांजी प्रकरणात दिवसाढवळ्या बौद्ध महिलांवर उघड्यावर बलात्कार करण्यात आले. त्याविरुद्ध आरपीआय लढली.
दिल्लीत सात वर्षांपूर्वी निर्भयावर बलात्कार झाला खून झाला, दिल्लीतील लोक पेटून उठले, त्यात महिलांचा सहभाग जास्त होता. त्यात सर्वधर्मांचे, जातीचे लोक सामील होते. हैद्राबादमध्ये असंतोष उसळला, भारतात असंतोष निर्माण झाला. व्हायलाच पाहिजे.
शिरसगाव (जि. औरंगाबाद-आता जालना), खैरलांजीत मानवतेला काळीमा फासणारे अत्याचार झाले. त्यावेळी बौद्ध, आरपीआय मागासवर्गीय सोडून उच्चवर्णीय हिंदू महिला, इतर धर्मीय यांचा पब्लिक काॅन्शिक्यूस कूठे गेला होता ? सर्व भारतीयांनी सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून अन्यायाच्या विरुद्ध लढणे गरजेचे आहे.
अनेक गुन्हेगारांना शासन झाले आहे. एक हजारांच्यावर जलदगती न्यायालये स्थापण्यात आली आहेत. जलदगतीने न्यायदान होईल. अशा गुन्हेगारी वृत्तीला आळा बसेल. कायद्याचा धाक निर्माण होईल. योग्य न्यायदान होईलच, पण सदाचारी समाज होणे तेवढेच आवश्यक आहे. त्यासाठी नीततीमत्तेची शिकवण समाजात पोहचविणे, तिचे अनुकरण करायला प्रवृत्त करणे गरजेचे आहे.
बुद्धांचे विचार व डॉ. बाबासाहेबांची नीतीमत्ता याचे आचरण व अनुकरण केले, तर भारतातील स्त्रियांवरील बलात्कार, खून निश्चितपणे कमी होतील, सुसंस्कृत समाज बनेल. बुद्धधम्म विचार रुजविणे अत्यंत गरजेचे आहे.
◼️◼️◼️

लेखक – ॲड. जी. डी. घोक्षे
मो. ९३२३७६४२५०

संकलन : एन.‌पी. जाधव