डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत.
- मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
- मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
- मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
- देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
- गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
- मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
- मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
- मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
- सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
- मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
- मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
- तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
- मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
- मी चोरी करणार नाही.
- मी व्याभिचार करणार नाही.
- मी खोटे बोलणार नाही.
- मी दारू पिणार नाही.
- ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
- माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
- तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
- आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
- इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
या २२ प्रतिज्ञा मानवता व बौद्ध धर्मात महत्त्वाच्या आहेत. सामान्यतः सर्व नवयानी बौद्ध या २२ प्रतिज्ञा पाळतात. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्यासाठी आहेत.
या बावीस अटी बाबासाहेबांनी केलेल्या आज्ञा नाहीत. बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारख्या आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत.
बावीस प्रतिज्ञांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी’चे तत्कालीन अध्यक्ष आणि बिहार व केरळचे माजी राज्यपाल रा.सु. गवई तसेच संस्थेचे सचिव सदानंद फुलझेले यांनी दीक्षाभूमीवर या बावीस प्रतिज्ञा प्रशस्त संगमरवरी दगडावर कोरून तो स्तंभ स्तूपाच्या प्रथमदर्शनी ठेवला आहे. वर्धा येथील बुद्ध विहारातही डॉ. म.ल. कासारे यांच्या नेतृत्वाखाली अशाच स्वरूपाचा भव्य स्तंभ उभारण्यात आला आहे.
More Stories
🔵 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञा – एक ऐतिहासिक, धार्मिक व सामाजिक क्रांती
‘सम्यक वाचा’ अनुसरा आणि गोड बोला Mindful Communication is Sweet talk
परित्राण पाठ मराठी मध्ये Paritran Path in Marathi