२५०० वर्षापूर्वी शाक्यांचे गणराज्य हिमालयाच्या पायथ्याशी (आताचे तीलौराकोट – नेपाळ ) होते. गेल्या अडीज हजार वर्षात हा शाक्य समाज उत्तर भारतात अनेक ठिकाणी विखुरला गेला व स्वतःची संस्कृती देखील विसरून गेला. अगदी अलीकडे म्हणजे ५० वर्षांपूर्वी देखील उत्तर भारतातील शाक्य समाज बौद्ध संस्कृतीबाबत अनभिज्ञ होता. आपल्या जमातीचे आणि भगवान बुद्धांचे कुळ एकच आहे याची जाणीव थोड्याच लोकांना होती. या शाक्य जमातीचे एक सदस्य सुरेशजी १९८५ मध्ये आग्रा विद्यापिठात शिकत असताना त्यांची गाठ श्रीलंकाचे भिक्खू प्रज्ञानंद महास्थवीर यांच्याशी पडली. त्यांनी सुरेश यांचे धम्माबाबत बौद्धिक घेतले. पण सुरेश यांना शाक्य समाज आणि बुद्धांचे कुळ या बाबत विशेष माहिती नव्हती. आणि मग श्रीलंकेचे भिक्खू यांनी शाक्य समाज आणि शाक्यमुनी यांची माहिती विशद करून सांगितली, तेव्हा ते अचंबित झाले.
आपला शाक्य समाज बुद्धांच्या कुळाचा आहे आणि आजपर्यंत आपण काय करत होतो याचा त्यांना विषाद वाटला. बुद्धांच्या विचाराने त्यांना झपाटून टाकले. केंव्हा एकदा घरी जाऊन आपल्या कुटुंबाशी आणि संकिसा मधील आपल्या इतर बांधवांशी या बाबत बोलतो असे त्यांना झाले. मोठी प्रेरणा त्यांना मिळाली. १९८६ मध्ये त्यांनी संकिसा येथे Youth Buddhist Society (YBS) स्थापन केली. शाक्य कुळातील अनेक तरुणांना घेऊन त्यांनी भिक्खू प्रज्ञानंद यांच्या उत्तर प्रदेशमधील श्रावस्ती जिल्ह्यातील विहारात बौद्ध धम्माच्या अध्ययनासाठी मुक्काम ठोकला. लवकरच भिक्खू प्रज्ञानंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धम्माचे अध्ययन पूर्ण केले. अशा तऱ्हेने पहिल्या शाक्य भिक्खुंची तुकडी श्रीलंकेचे भिक्खू प्रज्ञानंद यांच्या हाताखाली १९९२ मध्ये श्रावस्ती येथे तयार झाली.
जेंव्हा या धीरगंभीर भिक्खुंची तुकडी परत आपल्या गावी आली तेव्हा त्यांचे तेज पाहून सर्वच नतमस्तक झाले. अशा तऱ्हेने “चलो बुध्द कि ओर..” चा कारवा शाक्य समाजात सुरू झाला. या तुकडीतील वरिष्ठ भिक्खू उपानंद यांनी आता Ph.D पूर्ण केली असून ते बौद्ध तत्त्वज्ञान आणि पालि भाषेचा प्रसार तेथील समाजात करीत आहेत. तसेच लखनऊ विद्यापीठात इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धीष्ट स्टडीजच्या विद्यार्थ्यांना ते शिकवितात. YBS चे ते जनरल सेक्रेटरी आहेत. पूर्वी धम्म सुलभ हिंदी भाषेतून शिकविण्यासाठी तरबेज असलेल्या शिक्षकांची वानवा असायची. यासाठी YBS ने अनेक इच्छुक मुला-मुलींना इतर देशातील थेरवादी विहारात तसेच चीन व तिबेटच्या विहारात श्रामणेर होण्यासाठी धाडले. अशातऱ्हेने २०१५ मध्ये शाक्य समाजाचे १५० श्रामणेर भारत, नेपाळ व थायलंड मध्ये धम्माचे प्रशिक्षण घेत होते. संकिसा परिसरातील अनेक वयस्कर भिक्खू साठी शिबीर आयोजित करणे, पालि सूत्रांचे पठण करणे, दैनिक व्यवहारात बुद्ध उपदेशाचे पालन करणे याबाबत YBS ने अनेक कार्यशाळा घेतल्या. त्याचप्रमाणे आरोग्य शिबीर, महिलांचे सबलीकरण, कॉम्पुटर शिक्षण असे कार्यक्रम राबविले. मागासलेल्या भागात विहार व बुद्धमूर्ती उभारण्यासाठी निधी प्राप्त करून दिला.
एक काळ असा होता की शाक्य समाजातील स्त्रियांना सांस्कृतिक कार्यक्रम, धम्मप्रवचन, ध्यानसाधना शिबिर यात प्रवेश घेता येत नव्हता. पण आज सर्व चित्र पालटले असून मुली आणी महिला वर्ग बौद्ध कार्यक्रमात हिरिरीने भाग घेताना दिसतो. अशा तऱ्हेने YBS ने लावलेल्या बीजाचा आज मोठा वृक्ष झाला आहे. शाक्य समाजातील अनेक व्यावसायिक विहार बांधकामासाठी जमीन दान करीत आहेत. बुद्धमूर्ती उभारीत आहेत. सध्या चुनार दगडातील ३५ बुद्धमूर्ती उभारण्याचे काम बिहार आणि उत्तरप्रदेशात चालू आहे. तसेच दरवर्षी संकिसा येथे शाक्यांचा मेळा भरतो. बहुतेकांनी आपली आडनावे बदलून ‘शाक्य’ ठेवली आहेत. शाक्य समाजाची प्रगती पाहून कुशवाह, मौर्य, काची आणि सैनी समाजात देखील वेगाने परिवर्तन होत आहे. बुद्धांप्रती सर्वांची वाढत चाललेली श्रद्धा पाहून इतर समाज देखील बौद्ध संस्कृतीच्या कार्यक्रमाला, ध्यानसाधना शिबिराला उपस्थित रहात आहे.
आपल्या महाराष्ट्रात देखील अनेक तरुण धम्माच्या धेय्याने भारावून काम करीत आहेत. सुगत त्या सर्वांचे पाठबळ वाढविणे हे आपले कर्तव्य समजले पाहिजे. एकमेकांना सहाय्य केल्यानेच धम्म अजून उजळणार आहे. त्यांच्या कार्यशाळेत पालकांनी मुलांना धाडले पाहिजे. त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांना अनुमोदन दिले पाहिजे. उत्तर भारतात शाक्य समाज प्रगती करू शकतो मग आपण मागे का आहोत ? सचोटी, प्रामाणिकपणा ज्याच्या अंगी आहे, त्याच्या पाठी केव्हाही उभे रहावे. धम्माचे पाठबळ सुपंथावर चालणाऱ्या सर्व बांधवांना प्राप्त होवो अशी मी प्रार्थना करतो.
—संजय सावंत
युथ बुद्धीष्ट सोसायटीच्या संकेत स्थळाचा पत्ता –
https://ybsindia.org
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
शाक्य समाजाची प्रगतीकडे घोडदौड The Shakya Clan in India : Rediscovered Heritage
More Stories
काश्मीरचा हरवलेला बौद्ध वारसा पुनरुज्जीवित करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरने पहिले-वहिले एकत्रित पुरातत्व अभियान सुरू केले
नवीन दलाई लामा कसे निवडले जातील आणि त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल ?
महाबोधी मंदिराचे एकमेव नियंत्रण बौद्धांना देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली