August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्धधम्मात भिक्खूंचे स्थान – आर. डी. झगडे

तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आमच्यासाठी जर कोणी आदर्श व्यक्ती असेल, तर तो तथागत बुद्धांच्या श्रावकसंघातील भिक्खू आहे. बुद्धधम्मात कोणाचे स्थान जर भक्कम असेल, तर ते भिक्खूंचे आहे. अर्थात ते असायलाही हवे. कारण मनुष्य जीवनाचा उद्धार करण्याचा त्यांचा मानस असतो. अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. संसारात प्रत्येक मनुष्याने सुखाने, आनंदाने आपले आयुष्य दुःखमुक्त होऊन जगावे, अशी त्यांची इच्छा असते. तथागत बुद्धांचे तत्त्वज्ञान अपार कष्ट करून आत्मसात केलेले असते. त्या ज्ञानाचा प्रसार संसारातील प्रत्येक मनुष्यापर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे उद्दिष्ट असते.
भिक्खूंच्या जीवनाची अशी एक स्थिती असते की, ज्यात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कौटुंबिक बंधनांचा आणि ऐहिक सुखाचा त्याग करून, केवळ तथागत बुद्धांच्या श्रावक संघाची नियम बंधने स्वीकारून आयुष्याचा प्रवास सरळ वाटेने करायचा असतो. त्यांना संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक शक्तीचा खर्च एका ठराविक लक्ष्यावर करावा लागतो. या मार्गावर चालण्याचे धाडस प्रत्येक जनसामान्यांत नसते. कारण सरळ आहे. मोह, माया, कुटुंब, नाते, सुख, वैभव या सर्वस्वाला ठोकर मारून तो प्रवास एकट्याने करावयाचा असतो. अंतर्मुख होण्याची ती वेळ असते. धम्मज्ञानार्जन शक्ती वाढविणे आणि लोककल्याणासाठी चारही दिशांना चारिका करीत करीत ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ अशा धम्मज्ञानाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी धम्मरुपी रथावर आरूढ होण्यासाठी ती आत्मशक्ती निर्माण करावी लागते. त्या शक्तीला त्रिवार वंदन करावेसे वाटते.
एकवेळ भिक्खू जीवन ग्रहण करून त्या मार्गावर चालण्यास सुरुवात केल्यानंतर तेथून परत संसाराकडे वळण्याचे सर्वच मार्ग कायमचेच बंद होतात म्हणून तो मार्ग कठीण आहे. त्या मार्गावर भिक्खूच प्रवास करू शकतात. सामान्य माणसाला तसे जगणे कदापि शक्य होणार नाही, म्हणूनच बौद्ध संस्कृतीत भिक्खूंचं स्थान मोठे सन्मानाचे असते. आदरणीय असते. वंदनीय असते. तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघाला म्हणतात की, ‘आपण वीरपुरुष आहोत. आपण प्रज्ञेसाठी, शीलासाठी आणि करुणेसाठी युद्ध करतो. भिक्खूंनो ! शील जर धोक्यात असेल, तर आपण युद्धासाठी तयार राहावे.’
तथागत बुद्धांनी संघाला २२७ नियम घालून दिले आहेत. त्याचबरोबर त्रिशरण गमन आणि दशशीलाचे पालन करणे, हे अत्यंत गरजेचे असते. भिक्खूंचं जीवन अतिशय खडतर असते. भिक्खूंच्या आणि उपासकांच्या विनयाविषयी तथागत बुद्धांच्या विनयपिटकामध्ये समाविष्ट केलेले आहे. भंतेंनी कसे राहावे ? कोणत्यावेळी भोजन करावे ? कोणत्या वस्तू संग्रही ठेवाव्यात ? कोणते वस्त्र परिधान करावे ? त्यांची दिनचर्या कशी असायला हवी ? या सर्व बाबींचे मार्गदर्शन “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथात सविस्तर माहिती सापडते.
एखादा उपासक, उपासिकेने एक वेळ भिक्खू जीवन ग्रहण केल्यानंतर त्यांचे मूळ नाव, त्यांचे गाव, त्याचे वेतन, त्यांचे नातलग, त्यांची पत्नी, मुले, त्यांचे वय, त्यांची प्रॉपर्टी, त्यांचे कुटुंब, सर्वस्वी संपुष्टात येते, म्हणजेच तथागत बुद्धांच्या तत्त्वाने हाच खरा पुनर्जन्म आहे. यात संघातील भिक्खूंची दुसरी एक अशी स्थिती असते, ज्यामध्ये केवळ स्वतःचे चित्तमल परिशुद्धी करणे, अष्टांग मार्गाचे पालन करून निब्बाण प्राप्त करून घेणे आणि सर्व इंद्रियांवर आणि मनावर नियंत्रण मिळविणे वगैरे वगैरे. या स्थिती आदरणीय आहेत, म्हणूनच त्यांच्या प्रती सदैव कृतज्ञ असावे. भिक्खूंचा सदैव मान-सन्मान करावा. त्यांच्या प्रती आदर असावा. त्यांची उपेक्षा करू नये.
बौद्ध राष्ट्रांत धम्माचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून धन संपत्तीबरोबरच आपला एक पुत्र संघाला दान करतात. सम्राट अशोकाने आपल्या सर्व संपत्तीबरोबरच आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा या दोघांना संघाला दान करून धम्माच्या प्रचाराला गती आणली. तथागत बुद्धांच्या कारकिर्दीत राजा बिंबीसाराने तथागत बुद्ध आणि त्यांच्या संघाला भोजनदानास पाचारण करून वेळूवन दान केले. नंतर विहार बांधून निवासाची व्यवस्थाही केली.
अनाथपिंडकाने प्रसेनजीत राजाचा राजपुत्र राजकुमारच्या अतिप्रिय असलेल्या उद्यानाच्या जागेवर सुवर्णमुद्रा पसरून ती जागा विकत घेतली आणि तथागत बुद्ध आणि त्यांच्या संघाला दान दिले.
सर्व दानाहून श्रेष्ठ दान म्हणजे तथागत बुद्धांचे. त्यांनी आपल्या धम्माचे दान देऊन साऱ्या विश्वाला अज्ञान, अंधकारातून मुक्त केले. त्याच धम्माचे तत्त्वज्ञान देण्यासाठी भिक्खू संघ सदैव तत्पर असतो, म्हणूनच धम्मामध्ये दानाला खूप महत्त्व असते.
समाजात भिक्खूंच्या प्रती असलेले अज्ञानी लोकांचे अज्ञान आणि गैरसमज पाहावयास मिळतात. भिक्खूंना विनाकारण दान द्यावे लागते की काय म्हणून त्यांना टाळले जाते. तेच भंते पंचांग, राशीभविष्य पाहणारे असतील, ते लुबाडणारे, फसविणारे असतील, तर त्यांचेकडे आकर्षित झाले असते. भिक्खू जनतेला फसवित नसतात किंवा चमत्कारही करीत नसतात, पण समाजातील अज्ञानी व्यक्तींचे अज्ञान नक्कीच दूर करतात. समजा एखाद्या भिक्खूने धम्मदान मागितलेच, तर ते विनाकारण नसते. चैन, मजा, मौज, धनसंग्रह यासाठी तर मुळीच नाही. विहारांची निर्मिती, मूर्तीप्रतिष्ठापना, धम्मं संमेलने, शिबीरे यांच्यासाठी धम्मदान हवे असते. आपल्या दानावरच त्यांना धम्म वाढवायचा असतो.
हजारो भिकारी चौका-चौकांत पाहावयास मिळतात. पण बुद्ध धम्मातील एकही भिकारी शोधूनही सापडणार नाही. एकेकाळी आमचीही भिकाऱ्यापेक्षाही बिकट अवस्था होती. भिकाऱ्याला भीक घालायचे, पण आम्हाला तुच्छ प्राणी म्हणून हुसकावून लावायचे. याच तुच्छ प्राण्यांच्या सावलीचाही त्यांना स्पर्श नको होता. डॉ. बाबासाहेबांच्या उपकारांमुळेच आमची प्रगती झाली. आम्ही ते विसरायला नको.
साधू, संत, बाबा, बुवा इत्यादी आपल्या वाईट आचरणामुळे जेलमध्ये सडताना दिसतात. पण बुद्धधम्माचा एकही भिक्खू गैरवर्तनामुळे जेलमध्ये शोधूनही सापडणार नाही.
धर्माच्या नावाखाली चालत असलेल्या भोंदूगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
अनेक भोंदू साधू, भोंदू महाराज भोळ्याभाबड्या जनतेला चमत्काराच्या, तंत्रमंत्राच्या नावावर, अध्यात्माच्या, धनप्राप्तीच्या नावावर, मूलबाळ होत नाही, कुंडली जुळत नाही, शनीचा प्रवेश वगैरेंच्या नावावर लूट करताना आपण पाहात आलो आहोत. अशा लोकांना ओळखण्याची शक्ती प्रत्येकाकडे असायला हवी. त्यासाठी आपल्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करावा लागेल. एखाद्या भिक्खूच्या गैरवर्तनामुळे सर्वच भिक्खूंना अपराधी ठरविणे कितपत योग्य ठरेल? भिक्खूंनीही लक्षात ठेवायला हवे की, समाज आपले कर्तव्य सोडून आपले बारकाईने निरीक्षण करतो आहे आणि आपण त्यांच्या आलोचनेस पात्र ठरता कामा नये.
भंतेंच्या कधीच संपर्कात न आलेले, त्यांना कधीच दान न दिलेले, आपल्या घरी आमंत्रण देऊन भोजनदान न दिलेले महाभाग ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून वल्गना करतात. ते कितपत योग्य आहे ? अशा वर्तणुकीमुळे समाजात भिक्खूंच्या प्रती गैरसमज निर्माण होतात. भिक्खूंनी पण आपल्या कर्तव्यांशी तत्पर असायला हवे. आपली नीतीमूल्ये ज्यामुळे कुचकामी ठरतील अशी कृती करता कामा नये. आपण एक आदर्श पूरुष आहोत, याचे भान असायला हवे.
तथागत बुद्धांच्या काळापासून ते १९५६ पर्यंतचा काळ जर पाहिला, तर असे दिसून येते की, उपासकाला संघप्रवेशाबरोबरच धम्मप्रवेश एकाचवेळी असायचा. जर एखाद्या उपासकाला संघात प्रवेश नको असेल, आणि धम्मात प्रवेश घ्यावयाचा असेल, तर धम्मात प्रवेश मिळत नव्हता. फक्त संघातील व्यक्तीने धम्माचा प्रचार, प्रसार करायचा होता. पण डॉ. बाबासाहेबांनी आम्हा तमाम अस्पृश्यांना १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी नाग नदीच्या काठी नागलोकांच्या भूमीत नागपूर या ठिकाणी धम्मदीक्षा देऊन दुसरे जागतिक महान धम्मचक्र परिवर्तन घडवून आम्हाला धम्मात सम्मिलित करून धम्म प्रचाराची धुरा आमच्याही खांद्यावर दिली. दरेकाने दरेकाला धम्म देण्याची सुरुवात झाली. तथागत बुद्धांचा आठ पुरुषांनी युक्त असलेला (श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी व अर्हन्त) अशा चार फळांची प्राप्ती केलेला हा श्रावक संघ होता. पण १९५६ च्या धम्मचक्र परिवर्तनानंतर तथागत बुद्धांच्या श्रावक संघातील आठ पुरुषांत उपासकांतील पुरुषाने आपले स्थान पटकाविले आहे. पण आमच्या दरेकाला, पंचशीलाचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. धम्म समजून घ्यावा लागणार आहे. २२ प्रतिज्ञांचे पालन करावे लागणार आहे, तरच धम्मरथ गतीमान होईल.
तथागत बुद्धांचा हाच श्रावक संघ सुमार्गावर आरुढ आहे. समतेच्या मार्गावर आरुढ आहे. मानवता आणि बंधुभाव या सरळ मार्गावर आरुढ आहे. उत्तम मार्गावर आरुढ आहे.
असा प्रज्ञावान श्रावक संघ निमंत्रणास पात्र आहे. पाहुणचारास पात्र आहे. दान देण्यास पात्र आहे. हात जोडून प्रणाम करण्यास पात्र आहे. विश्वासाला पात्र आहे, तसेच सर्व प्रकारच्या लोकांसाठी तो सर्वोत्तम पुण्य क्षेत्र आहे. भिक्खू संघाचा आदर, सत्कार करून पुण्य करता येते. अशा गुणसंपन्न तथागत बुद्धांच्या श्रावक संघाला मी जिवंत असेपर्यंत शरण जातो, अनुसरतो.
*समाजाने अशा चालत्या, बोलत्या धम्माचा प्रचार, प्रसार करणाऱ्या संघाला पाचारण करून भोजनदान, चिवरदान दिले पाहिजे, जे कोणते शुभकार्य असतील, ते भिक्खूंकडून करून घेतले पाहिजे. त्यांच्या अंगावरील काषाय वस्त्र हे तथागत बुद्धांचे चिवर आहे, त्या चिवराचा मान राखायला पाहिजे, तरच धम्म गतीमान होण्यास मदत होईल.
◼️◼️

 

✒️ बुद्धधम्मात भिक्खूंचे स्थान

लेखक : आर. डी. झगडे

संकलन : एन. पी. जाधव :  ८७९३८३९४८८

दैनिक “सम्राट” मंगळवार, दि. १ जून २०२१ च्या अंकात प्रकाशित लेख

https://www.dainiksamrat.com/