February 22, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

जयभिम चे जनक ! बाबू हरदास

जय भीम’ या घोषणेचे चे जनक … – बाबू हरदास….

हरदास लक्ष्मणराव नगराळे उर्फ बाबू हरदास…. `जय भीम’ या घोषणेचे चे जनक …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगभरात साजरी होणारी जयंती असो की, चैत्यभूमीवर लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीत महापरिनिर्वाणदिन असो, नाही तर नागपुरातील दीक्षाभूमीवरील धम्म सोहळा असो या सर्व ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या मुखातून एकच आवाज निनादला जातो तो म्हणजे `जय भीम’. हिंदू धर्मातून बाहेर पडल्यानंतर बौद्ध धम्माची स्वतंत्र वाटचाल अंगिकारल्यानंतर बौद्धांना नवी ओळख प्राप्त व्हावी यासाठी `जय भीम’ हा शब्द मोठय़ा आदरभावाने संबोधला जातो.

आंबेडकरी समाजातील राजकारणात अनेक गट-तट असो किंवा आंबेडकरी समाजातील नेते इतर पक्षात स्थिरावलेले असो त्यांच्या मुखातून वेळोवेळी आपसूकपणे `जय भीम’ हे शब्द बाहेर पडतात. मात्र, कोणत्याही आंबेडकरी नेत्यांना `जय भीम’ चे जनक बाबू हरदास यांची जयंती साजरी करावी असे वाटले नाही किंबहूना समाजही त्यांच्याबाबतीत अज्ञानी असल्याने बाबू हरदास अद्यापही दुर्लक्षितच राहिले असल्याचे दिसत आहे.

हरदास लक्ष्मणराव नगराळे उर्फ बाबू हरदास यांचा जन्म ६  जानेवारी १९०४ रोजी नागपुरातील कामठी येथे एका गरीब दलित कुटूंबात झाला. त्यांचे वडील लक्ष्मणराव नगराळे हे रेल्वे खात्यामध्ये कारकून म्हणून कार्यरत होते. बाबू हरदास यांचे मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा संस्कृतवरही मोठा प्रभाव होता. अवघ्या १७  व्या वर्षी `महारथ’ नावाचे साप्ताहिक सुरू करून त्यांनी सामाजिक चळवळीत भाग घेतला. १९२७ ला त्यांनी दलित समाजातील मुला-मुलीसाठी कामठी येथे रात्र शाळाही चालवली. त्यात ८६  मुले आणि २२  मुली शिकून बाहेर पडल्या. संत चोखामेळा यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.

१९२८  साली हरदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली. देशात दलितांचा नेता कोण? असा प्रश्न विचारला जात होता त्यावेळी बाबू हरदास यांनी १९३०- ३१  साली दुसरी गोलमेज परिषद भरली त्या सुमारास रॅमसे मॅक्डोनाल्ड यांना यासंबंधी पत्रव्यवहार करून स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, देशात एकमेव दलित नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. त्यांनी यासंबंधी मॅकडोनाल्ड यांच्याशी जवळपास ३२  वेळा पत्रव्यवहार केला होता. `ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन’ च्या पदावर संयुक्त सचिव आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९२४  साली त्यांनी `मंडल महात्मे’ हा ग्रंथ लिहिला. `वीर बालक’ नावाचे नाटकही त्यांनी लिहिले. बाबासाहेबांच्या `जनता’ वृत्तपत्रातही त्यांनी लेखन केले.

बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या सचिवपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 1937 साली नागपूर-कामठी या मतदारसंघातून ते निवडून आले होते. बाबू हरदास यांचे दलित चळवळीत खूप मोठे योगदान असून त्यांनी दिलेला `जय भीम’ शब्द हा अजरामर असाच आहे. म्हणूनच आज ते `जय भीम’चे जनक म्हणून ओळखले जातात.

बाबू हरदास यांचे १२ जानेवारी १९३९  साली अवघ्या ३५  व्या वर्षी निधन झाले. दलित समाजात राहून चळवळीला योगदान देणारे बाबू हरदास हे आज दुर्लक्षितच राहिले आहे. आंबेडकरी समाजाला स्वतंत्र बाण्याचा `जय भीम’ सारखा शब्द देऊनही त्यांची फारशी कुणी दखल घेतल्याचे जाणवत नाही. त्यांची जयंती साजरी झाल्याचेही दृष्टीक्षेपात दिसत नाही.

आज निवडणुकीच्या रणधुमाळीत आंबेडकरी समाजाची मते मिळविण्यासाठी गल्ली-बोळात, वाडय़ा-तांडय़ावर, शहरा-शहरात दलित नेत्यांसह इतर नेतेही `जय भीम’चा जयघोष करताना दिसतील. पण ६ जानेवारी रोजी `जय भीम’ चे जनक बाबू हरदास यांची जयंती आहे, याची आठवण किती जणांना राहील ही शंकाच आहे. त्यांच्या जयंती दिनाचे महत्वही या चुरशीच्या भाऊगर्दीत दरवर्षीप्रमाणे हरवून जाईल असे म्हटले तर नक्कीच चुकीचे ठरणार नाही.

हरदास लक्ष्मणराव नगराळे उर्फ बाबू हरदास यांच्या कार्याला मुजरा आणि मानाचा जय भीम !!!!!