आयुष्यामान चुंद यांनी बनविलेल्या सुकर मद्दव या भोजनाविषयी अतिशय विसंगत व संभ्रम निर्माण करणारी माहिती व लेख लिहिले जातात. ह्या संदर्भात अनेक लेखक व ईतिहासाकार आपआपल्या सोयीनुसार वेगवेगळी मते मांडतांना दिसतात. काही विद्वान लेखक तर म्हणतात की, सुकर मद्दव हे भोजन डुकराचे मांसापासुन बनविण्यात आले होते तर काहीं लेखकांच्या मते दुध व तांदूळापासुन बनविलेला औषधी रसायन विधी होता. काहींच्या मते सुकर मद्दव हे औषधी मशरुम होते. आयुष्यामान चुंद यांच्या व्यक्तीगत, सामाजिक व आध्यात्मिक जीवनाचा ऐतिहासिक अभ्यास केल्यास तर्क व परिस्थिती जन्य पुराव्याच्या आधारे सुकर मद्दव काय असावे याची यथाभुत माहिती मिळण्यास मदत होते.
तथागताच्या अंतिम भोजनाचा अभ्यास करण्यासाठी आपण खालील पैकी पाच गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजेत.
1)अन्नदानाची परिस्थिती व घटनाक्रम.
2)आयुष्यामान चुंद कोण आहेत ?
3)सुकर मद्दव हे मांसाहारी भोजन असु शकते काय ?
4)तथागताचे परिनिर्वाण सुकर मद्दव मुळे झाले असावे काय ?
5)आयुष्यामान चुंद यांच्या विषयी तथागताचे अंतिम वचन
1)अन्नदानाची परिस्थिती व घटनाक्रम….
पावानगरीमधे भगवान बुद्ध व त्यांचे 500 भिक्षु यांचे आगमन झाले, त्यावेळी तथागत पावानगरीमधील गंधकुटीमधे विहार करत होते. सायंकाळी आयुष्यामान चुंद यांनी सहपरिवार येऊन भगवान बुद्धाची भेट घेतली व त्यांना भोजनासाठी निमंत्रित करून तथागताची स्वीकृती मिळवली.
सकाळी आयुष्यामान चुंद यांनी पुष्कळसे पक्वान्न व सुकर मद्दव तयार केले. यानंतर या अन्नपदार्थाचे भोजन तथागत व भिक्षुसंघास आदरपुर्वक जेवायला वाढले. या भोजनामुळे तथागताची प्रकृती फारच खराब होत गेली, त्यामुळे त्यांना पावानगरी ते कुशीनारा मधील 3 कोस अंतर जाण्यासाठी रस्त्यात अनेक वेळा विश्रांती घ्यावी लागली. यानंतर भगवान बुद्धाचे कुशीनाराच्या मल्लांच्या शालवनामधे परिनिर्वाण झाले.
2)आयुष्यामान चुंद कोन आहे?
आयुष्यमान कर्मांर पुत्र चुंद हे लोहार होते.
त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्यावर प्रसन्न होऊन त्यांना नगराचे राजे व मल्लश्रेष्ठीं यांनी ‘नगरश्रेष्ठी’ पदाचा सन्मान बहाल केला होता. चुंद यांच्या परिवारामधे पत्नी महादानी, मुलगी सुभागी, मुलगा नागीत व पुत्रवधु अर्धांगीणी हे सर्वच भगवान बुद्धाचे शिलसंपन्न, श्रद्धावान उपासक आहेत. हे सर्वच तथागताच्या भिक्षुंसंघात दिक्षीत झाले आहेत. आयुष्यमान चुंद यांनी पावा नगरीमधे पिण्याच्या पाण्यासाठी अनेक विहिरी खोदल्या आहेत, तसेच प्रवाश्यांच्या सोईसाठी ‘कुक्कुथा’ नदीवर अनेक सेतु देखिल बांधले आहेत. पावानगरीच्या आम्रवनात ‘जातीवन’ विहार बांधुन भिक्षुसंघास दान दिला आहे. स्वतःचे राहते घर सुद्धा भिक्षुसंघास दान दिले आहे. आयुष्यामान चुंद हे भिक्षुसंघासाठी शयनासन व श्रमण सारुप्य चिवर यांची नियमित व्यवस्था करत असत. भिक्षुसंघास औषधपाणी करणे व अन्नदान देणे हे तर त्यांचे रोजचेच काम होते. आयुष्यामान चुंद हे बुद्ध, धम्म व संघाला शरण आलेले शिलसंपन्न उपासक आहेत. पावानगरीच्या मल्ल वासीयांना भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर अस्थी-धातुंचा आठपैकी एक भाग मिळवला होता. त्या अस्थी धातुंवर आयुष्यामान चुंद यांच्या देखरेखीखाली भव्य असा स्तुप बांधण्यात आला होता. भगवान बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणाच्या दुसर्या वर्षी आयुष्यामान चुंद यांचे सुद्धा परिनिर्वाण वैशाखी पोर्णीमेला संध्याकाळी झाले होते.
3)सुकर मद्दव हे मांसाहारी भोजन असु शकते का ?
सुकर मद्दव हे मांसाहारी भोजन अजिबात असु शकत नाही याची काही कारणे आहेत, ती पुढीलप्रमाणे….
1)भगवान बुद्ध सहा महिन्यांपासून आजारी आहेत व त्यांना अतिसार नावाचा पोटाचा आजार झाला आहे, याची आयुष्यामान चुंद यांना अगोदरच माहिती होती.
2)भगवान बुद्ध आजारी असताना त्यांना भोजनदान देण्यासाठी आयुष्यामान चुंद यांनी राजवैद्य जीवक यांचेकडुन भगवान बुद्धाच्या प्रकृतीस सुकर व पोषक अन्न काय बनवावे याविषयी माहिती अगोदरच घेतली होती.
3)मांसाहारी जेवणं पचण्यास जड अन्न असते व तथागत बुद्ध पोटाच्या आजाराने त्रस्त असुन त्यांना रक्ताचे जुलाब होत आहे. मांसाहारी अन्न भगवान बुद्धाच्या प्रकृतीस पोषक ठरणार नाही, याची चुंद यांना जाणीव होती.
4)तथागताच्या भिक्षुसंघामधे असलेल्या श्रेष्ठ महापुरूषांच्या चार जोड्या आहेत त्यापैकी चुंद यांना ‘अनागामी’ फळप्राप्ती झालेली आहे, त्यामुळे पशु किंवा प्राण्याची हत्या करून किंवा दुसर्याकडुन हत्या करवून घेउन भिक्षुंसंघास मांसाहारी भोजन देणे चुंद यांच्या विनयाच्या नियमामधे अजिबात बसत नाही.
5) मांस कुठूनही आणलं तरी मांसासाठी प्राण्याची हत्या झालेली असते. या हत्येसाठी उपासक चुंद हे अप्रत्यक्ष जवाबदार राहतील व त्यामुळे त्यांचे पहिले शिल पाणातीपाता वेरमणी भंग होईल याची आयुष्यामान चुंदला जाणीव आहे.
6) प्राण्याची हत्या केल्याशिवाय मांस मिळत नाही, व मासांहार सेवना बद्दल भगवान बुद्धांनी विनयाचे नियम कडक बनविले आहेत हे पण चुंद जाणुन होते.
7) आयुष्यामान चुंद व त्यांचा संपूर्ण परिवार भगवान बुद्धाचे श्रद्धावान शिलसंपन्न उपासक आहेत. ते सर्व शाकाहारी असुन कोणत्याही प्राण्याची हत्या करुन तथागतास मांसाहारी भोजन बनवुच शकत नाही….
आता आपण जाणून घेऊ की सुकर मद्दव काय असावे.
भगवान बुद्धांनी भोजनदानासाठी स्वीकृती दिल्यावर आयुष्यामान चुंद यांनी राजवैद्य जीवक यांसोबत चर्चा करून तथागताच्या प्रकृतीस सुकर व पोषक असे अन्न सुकर मद्दव व ईतर पक्वान्न बनविण्याचे ठरविले. सुकर मद्दव हा जो शब्द आहे त्याविषयी पुर्वीपासुनच वाद चालत आलेला आहे. त्यामुळे सुकर मद्दव या शब्दाचा गैरअर्थ करुन विरोधक सुकर मद्दव हे डुकराचे मांस असल्याची टिका करतात. पण या संदर्भात अनेक लेखक व ईतिहासाकार मोठ्या जबाबदारीने लिहितात की चांगल्या बारीक तांदूळाला पाच गाईंच्या दुधात शिजविल्यावर जो खीरी प्रमाणे पातळ पदार्थ तयार होतो तोच सुकर मद्दव असावा. सुकर मद्दव हा तथागताच्या प्रकृतीस पोषक असा विशेष औषधी रसायन विधी आहे, जो राजवैद्य जीवक यांच्या सल्ल्यानुसार बनविला गेला होता.
काहींच्या मते सुकर मद्दव औषधी हा मशरुमपासुन बनवण्यात आला होता. त्यामधील काही मशरुम विषारी असल्याचे भगवान बुद्धाने ओळखले व भोजन आपल्या पात्रात वाढण्याचे सांगून उर्वरित अन्न खड्डा करून पुरुन टाकण्यास सांगितले. कारण त्या भोजनास भगवान बुद्ध सोडुन दुसरा कुणीही पचवू शकत नव्हते.
4) भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण सुकर मद्दव मुळे झाले असावे का?
हे खरं आहे की, आयुष्यमान चुंद यांचे अन्नदान ग्रहण केल्यानंतर
तथागताची तब्येत फारच खराब होत गेली, त्यामुळे त्यांना पावानगर ते कुशीनारा तीन कोस अंतर जाण्यासाठी रस्त्यात पंचवीस वेळा विश्रांती घ्यावी लागली. अंत्यत दुर्बल व अशक्त अवस्थेत तथागत कुशीनाराच्या शालवनात आले व यमक शाल वृक्षांच्या मधे ठेवलेल्या मंचकावर डोके ठेवून, उजव्या कुशीवर पायावर पाय ठेवून, स्मृती संप्रजन्य राहुन, सिंहशय्या करुन झोपले.
यानंतर भगवान बुद्धानी प्रथम ते चतुर्थ ध्यानाला प्राप्त करून आकाशन्यायतन, विज्ञानन्यायतन, अकिंचन्यायतन, व नैवसंज्ञायतन निरोध समाधीस प्राप्त करून भगवान बुद्ध महापरिनिर्वाणास प्राप्त झाले….
5) आयुष्यामान चुंद यांच्या विषयी तथागताचे अंतिम वचन.
भगवान बुद्धानी महास्थवीर आनंदास म्हटले की, आयुष्यामान चुंद यांच्या भोजन दानामुळे तथागत निर्वाणास प्राप्त झाले असा विचार करून लोक चुंदला दोष देतील, त्यामुळे चुंदला दुःख होईल. आयुष्यामान चुंदला जावुन सांगा, आवुस चुंद, तुम्हांला महालाभ प्राप्त झाला आहे. सुलाभ मिळवणारे तुम्ही भाग्यवान आहात. तथागताने तुमचा पिंडपात ग्रहण करुन महापरिनिर्वाण पद प्राप्त केले आहे. सुजाता व चुंद दोघांचेही अन्नदान समान फलदायी आहे.
आयुष्यामान चुंद
यांच्या अस्थीवर पावानगरीचे मल्लश्रेष्टी यांनी भव्य असा स्तुप बांधला होता, जो आजही उत्तरप्रदेश मधील देवरीया जिल्ह्यात उत्खनन होऊन चुंद यांच्याविषयी साक्ष देण्यास तयार आहे.
You are in Dhamma
✍️ राहुल खरे नाशिक
9960999363
More Stories
पुढील पिढी बौद्ध का घडत नाही ?
बुध्द विहार आचारसंहिता… Adv Shankar Sagore.
मानवी समाजाला उपयुक्त ठरणारी मैत्री भावना – डॉ. बालाजी गव्हाळे