November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

माझी सहचारिणी गीताची अखेरची इच्छा – समाजभुषण सयाजी वाघमारे

दलित पॅंथरचे मंथरलेले दिवस, संपूर्ण महाराष्ट्राभर बौद्ध तरुण भारावल्या सारखे घरदार, कामधंदा, शाळा , कॉलेज सोडून रस्त्यावर उतरले होते. जणूकाही खदखदणारा लाव्हारस धरणीच्या पोटातून रस्त्या रस्त्यात पसरत चालला होता . त्याच्या नुसत्या धगीने जातीयवादी शक्ती भयभीत झाली होती . प्रत्येक दिवसाला गावां मागून गावे शहरा मागून शहरात बौद्ध तरुण दलित पॅंथरच्या झेंड्याखाली एकवटले जात होते. एकवटलेल्या शक्तीची लढ्याच्या दिशेने उभारणी करण्याचे घडत आहे. तोच , कुठे अशुभाची पाळ चुकचकल्या प्रमाणे वातावरणात मळभ दाटल्या सारखे वाटू लागले . छावण्या छावण्या मधून ,पॅंथर कार्यकर्त्यांच्यात दबक्या सुरात पॅंथरचे शीर्ष स्थानी असलेले दोन नेते ढाले – ढसाळ या दोघांमध्ये बिनसले असल्याची कुजबुज सुरू झाली होती.

ढाळे ढसाल या दोघांत बिनसल्याच्या वार्तेने वाळलेल्या गवतावर पेटलेली काडी पडताच आग पसरावावी तशी बिनसल्याची वार्ता प्रत्येक पॅंथरच्या कानोकानी पोहचली. रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीमुळे बौद्ध समाज पोरका झाला होता . आणि तोच प्रकार दलित पॅंथर संघटनेत होणार, ही कल्पनाच पेटून उठलेळ्या बौद्ध तरुणांना सहन होणार नव्हती . दलित पॅंथर मध्ये दोन गट होता कामा नये . नेते गटबाजी मिटवणार नसतील, तर पँथर कार्यकर्ते आपली एकजूट कायम राखतील हा विचार करून , ह्या भूमिकेवर पॅंथर संघटना मजबूत करण्यासाठी मी स्वतः, जगदीश रामटेके , तानसेन ननावरे , चंद्रकांत कसबे , भिमराव गवांदे , यशवंत खाडे, बाबुराव शेजवळ इत्यादी कार्यकर्ते मिळून दलित पॅंथर संपर्क समितीच्या बॅनरखाली संघटना ऐक्य अभिमान अभियान सुरु केले . रिपब्लिकन पक्षात गट झाले . तसे पॅंथर मध्ये गट होऊ द्यायचे नाही. ही आमची भूमिका होती . या भूमिकेला सर्वत्र पाठिंबा मिळू लागला. सी.रा.जाधव , अशोक तांबे, प्रल्हाद गडये, संतोष भोईर, विष्णू कदम, हेमंत मोकल , रमेश शेजवल सुदाम पवार या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबरच काकासाहेब खंबाळकर त्या वेळचे भालेराव , मच्छिंद्र कांबळे , धूरंदर मिठबावकर ठाणे जिल्ह्यातील *श्याम गायकवाड , रमेश जाधव नाशिकचे रंजन जगताप , शंकर काकलिज मधुकर ( मध्या) शेजवळ हे समितीत सहभागी झाले.

संपर्क समीतिचे सर्वच कार्यकर्ते, संघटना कार्याची जाण असलेले अभ्यासू आणि जबाबदार होते. त्यामुळे ह्या चंबुला एक वेगळेच वलय प्राप्त झाले होते . कार्यकर्ते मिशन म्हणून काम करीत होते. त्यामुळे सर्वांचा आपसात जीव्हाला आणि खेळीमेळीचे वातावरण तयार झाले होते . मुंबई ठाणे शहरानंतर पुणे शहरात भेट देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला. सर्व कार्यकर्ते गोलाकार बसले असताना पैश्याचा प्रश्न उभा राहिला . सर्वजण एकमेकाकडे पाहू लागले. थोड्याच वेळात एकमेकांमध्ये नेत्रपल्लवी होऊन दोघा तिघांच्या नजरा चंद्रकांत कसबे च्या बोटामध्ये असलेल्या सोन्याच्या अंगठीवर खिलल्या जास्त वेल धीर धरवेना म्हणून यशवंत खाडेने सरल बोलणे केले चंदू तुझी अंगठी दे , आपण गहाण ठेवू .

चंदूला अंगठी द्यायचे जीवावर आले . परंतु पुण्याला जान्याची त्यालापण हाऊस होती. त्याने अंगठी काढून माझ्या हातात दिली. लग्न झाल्यानंतर माझी पत्नीनी सोन्याच्या बांगड्या चैन आणि एक अंगठी घेऊन आली होती. प्रत्येक महिना अखेरीला पत्नीची अंगठी गहाण ठेवून पगार झाल्यावर ती सोडवून आणायची हा माझा दर महिन्याचा कार्यक्रम ठरलेला होता . ह्या महिन्याला कसबेची अंगठी सोडवू. तुझी राहू दे , हे माझे म्हणणे पत्नीने हसून मान्य केले . पुढच्या महिन्याला माझी दुसरीच अडचण निघाली. ती अंगठी अशीच गेली. ज्या संघटनेसाठी आमची धडपड होती. ती संघटना १९७२ स्थापना आणि १९७४ मध्ये दोन गट होऊन दलित पॅंथर ची वाताहत झाली.

दलित पॅंथरच्या फुटीनंतर मी गव्हर्नमेंट कॉलनी ,बांद्रा येथे प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र , त्रिरत्न बुद्ध विहार संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो . त्याच दरम्यान चळवळीतील कार्यकर्ते माझे मित्र हेमंत मोकल ह्यानि ब्यलिस्टर राजाभाऊ खोब्रागडे ह्यांचे तिसऱ्या क्रमांकाचे भाऊ गिरीश खोब्रागडे ह्यांची भेट घडविली . रिपब्लिकन पक्षाचे सेक्रेटरी होते. पक्षाला मुंबईमध्ये जनाधार मिळविण्याकामी आणि फुलटाइम पक्षाचे काम करण्यासाठी मी नोकरी सोडावी, ही सूचना त्यांनी माझ्या पत्नी गीतापुढे मांडली. क्षणाचाही विचार न करता संमती देत . माझ्या पगारात आम्ही चटणी – मीठ करून घर चालवू म्हणून तिचे बोलणे ऐकताच मी तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिलो.
माझ्या आईच्या शोकसभेत चंद्रकांत कसबे जे नगरसेवक होऊन बाजार समितीचे अध्यक्ष झाले होते. ते भाषणात म्हणाले ही मातोश्री किती भाग्यवान होती. जिच्या सूनबाई म्हणजे आमच्या गीता वहिनी ज्या ज्या वेळेला आम्हा कार्यकर्त्यांना पैश्याची अडचण आली. त्यावेळेला त्यांनी हातातील एखादी सोन्याची बांगडी, गहाण ठेवण्यास कधीही मागे पुढे पाहिले नाही . चंद्रकांत कसबेच्या भाषणामुळे सर्वांच्या नजरा माझ्या पत्नी गीताकडे वळल्या होत्या. त्या दिवसानंतर आमच्या कॉलनीतल्या तिला ओळखणाऱ्या स्त्रिया नेहमी तिला त्या भाषणाविषयी विचारत असत. तिला ते फार अवघडल्या सारखे वाटत असे. तेव्हा ती मला गंमतीने म्हणत असे . माझी शोक सभा वगैरे घेण्याच्या भानगडीत पडू नका म्हणून सांगून ठेवते.

आपली जाण्याची वेळ झाली आहे. हे जणू काही तिला समजले होते . म्हणून तिने पुन्हा मला बजावले, माझी शोक सभा वगैरे घेण्याच्या भानगडीत पडू नका . मला अवघडल्या सारखे होईल

तिच्या आखेरच्या इच्छेला मी बांधील राहणार आहे.
🪴🪴🪴🌷🍁🍁🍁🌷🪴🪴🪴

🍁🎋🍁🎋🌷🌷🍁🎋🍁🎋
✒️
समाज भुषण
सयाजी वाघमारे
📞70 39 48 34 38
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀