February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

लेणी महाराष्ट्राची

बुद्धांकडे चमत्कारिक किव्वा दैवी दृष्टिकोनातून बघू नका
बोधी प्राप्त झाल्यानंतरही तथागत मानवच
तथागत बुद्ध झाले, म्हणजे मानव राहिले नाहीत अथवा मानवापेक्षा काही तरी आणि कोणी तरी वेगळे झाले, असे म्हणता येत नाही. त्यांनी विकार जिंकले आणि त्या अर्थाने ते सर्वसामान्य माणसांपेक्षा उन्नत झाले, हे कितीही खरे असले, तरी या घटनेने त्यांचे निसर्गदत्त मानवत्व संपले, असे होत नाही. ते जन्मापासून गृहत्याग करेपर्यंत मानवच होते, ही बाब तर कोणालाच नाकारता येणार नाही, गृहत्यागानंतर बोधी प्राप्त होईपर्यंत अन्न वगैरे घेण्याच्या – न घेण्याच्या बाबतीत त्यांनी जे प्रयोग केले, ते त्या वेळी त्यांचे शरीर मानवी असल्याचेच स्पष्ट करतात. बोधी प्राप्त झाल्यानंतर परिनिब्बान प्राप्त होईपर्यंत ते मानवी शरीराने वावरले. याबाबतीतही कोणी शंका घेऊ शकत नाही. बोधिराजकुमार, पसेनदीची राणी मल्लिका इ. व्यक्ती आपल्या दूतांना त्यांच्याकडे पाठवितात, तेव्हा त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला सांगतात, त्यांना काही पीडा नाही ना हे विचारायला सांगतात, याचे कारण त्या काळातही त्यांचे शरीर मानवी होते, हेच आहे. हे सगळे अधिक स्पष्ट व्हावे म्हणून त्यांच्या आजारपण वगैरेंचे काही माहिती येथे घेणे उचित ठरेल.
 त्यांच्या मानवी शरीराला निसर्गाच्या मर्यादा
तिपिटकाकडे पाहिले, तरी ते एक मनुष्य म्हणूनच आपल्यापुढे येतात. तथागत थकले आहेत, आजारी पडले आहेत, वृद्ध झाले आहेत इ. अर्थाचे बरेच निर्देश तिपिटकात आढळतात. हे निर्देश बोधी प्राप्त झाल्यानंतरच्या काळातील आहेत, हेही लक्षणीय आहे. आपण येथे त्यांचे थकणे, आजारी पडणे आणि वृद्ध होणे, या क्रमाने काही उदाहरणांचे विवेचन करू या.
सर्वसामान्य माणसांप्रमाणे तेकधीकधी थकत असत
एकदा ते नळकपान येथील पलाशवनात विहार करीत होते. एके दिवशी रात्री उशिरापर्यंत त्यांनी भिक्खूना धम्माचा उपदेश केला. तरीही भिक्खुसंघ शांत ( अधिक ऐकण्यास उत्सुक ) होता. तेव्हा ते सारिपुत्तांना म्हणाले, ” सारिपुत्ता, भिक्खुसंघ आळस आणि तंद्रा यांनी रहित आहे. भिक्खूंशी धम्मसंवाद साधणे तुला आवडेल. माझी पाठ दुखत आहे. तर मी आडवा होतो. ” सारिपुत्तांनी त्यांच्या म्हणण्याला होकार दिला आणि भिक्खूंशी धम्मसंवाद साधला. एकदा ते कपिलवस्तूमध्ये गेले असता महानाम शाक्याने त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था भरण्डुकालामाच्या आश्रमात केली. ते थकलेले असल्यामुळे तो त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी रात्री त्यांच्याजवळ थांबला नाही. ती रात्रसंपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे येऊन त्याने त्यांना आपल्या मनातील शंका विचारल्या. ते आयुष्याच्या अखेरीस कुसीनारामध्ये गेले, तेव्हाही त्यांचे शरीर थकल्याचा निर्देश आला आहे. ते कुसीनारामध्ये मल्लांच्या सालवनात पोचल्यानंतर आनंदाना म्हणाले, ” आनंदा , तू दोन सालवृक्षांच्या मधे उत्तरेकडे डोके करून माझ्यासाठी मंचक ठेव. मी थकलो आहे.
त्यांचे आजारपण
ते एकदा कपिलवस्तूमधील न्यग्रोधारामात विहार करीत होते. त्या वेळी ते नुकतेच आजारातून उठलेले होते. एके दिवशी महानाम शाक्य त्यांच्याकडे आला. संमोदन करून झाल्यावर’ समाधी आधी की ज्ञान आधी’ या अर्थाचा प्रश्न त्याने त्यांना विचारला. ते नुकतेच आजारातून उठले आहेत आणि महानाम त्यांना गंभीर प्रश्न विचारत आहे, हे ध्यानात घेऊन आयुष्मान आनंदांनी त्याच्या दंडाला धरून त्याला बाजूला नेले आणि स्वत:च त्याचे शंकासमाधान केले. त्यांचे आजारपण हे त्यांच्या मानवत्वाचे द्योतक आहे, हे तर या प्रसंगावरून कळतेच, पण आनंद तथागतांची किती काळजी घेत असत, हेही यावरून स्पष्ट होते. ते श्रावस्तीमध्ये असताना एकदा त्यांना वाताची पीडा झाली. त्या वेळी उपवाण हा त्यांच्या सेवेत उपस्थित होता. त्यांनी त्याला गरम पाणी आणण्यास सांगितले. तो देवहित ब्राह्मणाच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. त्याने ‘काय हवे’ असे विचारल्यावर वातपीडा झालेल्या तथागतांसाठी गरम पाणी हवे असल्याचे त्याने सांगितले. मग त्या ब्राह्मणाने त्याला गरम पाणी आणि गुळाचा खडा दिला. त्याने परत येऊन त्यांना गरम पाण्याने स्नान घातले आणि थोड्या गरम पाण्यात गूळ मिसळून त्यांना ते पाणी प्यायला दिले. त्यामुळे त्यांना बरे वाटले. पुढे तो ब्राह्मण त्यांचा शरणागत उपासक बनला. एकदा ते राजगृहातील कलंदकनिवापात विहार करीत होते. त्या वेळी ते फार आजारी होते. एके दिवशी महाचुंद तेथे आले आणि अभिवादन करून बाजूला बसले. त्या वेळी तथागतांनी त्यांना बोध्यंगांविषयी बोलायला सांगितले. मग महाचुंदांनी तथागतांच्या उपदेशानुसार सात बोध्यंगांचे स्वरूप स्पष्ट केले. ते ऐकून तथागत समाधानी झाले. ते त्या आजारातून उठले. त्यांचा आजार नाहीसा झाला.
त्यांचे वार्धक्यही त्यांच्या मनुष्यत्वाचे द्योतक
त्यांच्या शरीरावर वार्धक्याचा परिणाम झाल्याची वर्णने देखील या संदर्भात महत्त्वाची आहेत. एकदा ते श्रावस्तीमध्ये असताना पूर्वारामात विहार करीत होते. संध्याकाळी ध्यानातून उठल्यानंतर पश्चिमेकडे पाठ करून ते पाठीवर ऊन्ह घेत होते. त्या वेळी आयुष्मान आनंद त्यांच्याजवळ गेले आणि त्यांचे शरीर चेपूलागले. ते त्यांना म्हणाले, ” भन्ते , तथागतांचे शरीर आता पूर्वीसारखे सुंदर आणि मजबूत राहिलेले नाही. सर्व गात्रांवर सुरकुत्या पडल्या असून ती शिथिल झाली आहेत. शरीर पुढे झुकले आहे. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही सर्व इंद्रिये कमजोर झाली आहेत, हे दिसून येत आहे. “आनंदांनी असे म्हटल्यानंतर तथागतांनी हा जराधम्म ( वार्धक्याचा गुणधर्म ) असल्याचे म्हटले. त्यानंतर त्यांनी हे सगळे जराधम्माने घडत असल्याचे अधिक विस्ताराने सांगून त्याचे वर्णन करणाऱ्या दोन गाथाही म्हटल्या. त्यांनी परिनिब्बानाच्या थोडे अगोदरही वार्धक्यामुळे आपली शारीरिक अवस्था कशी खालावलेली आहे ते आनंदांजवळ बोलून दाखविले होते. ते एकदा आनंदांना म्हणाले, “आनंदा, खरोखर मी आता जीर्ण, वृद्ध, म्हातारा झालो. माझी जीवनाची वाट चालून झाली. माझे वय झाले. माझे वय आता ऐंशी वर्षांचे आहे. आनंदा, एखादी जर्जर झालेली गाडी ज्याप्रमाणे डागडुजी करून कशीबशी चालते, त्याप्रमाणे तथागताचे शरीर डागडुजी करून चालले आहे, असे मला वाटते. “त्यांच्या शारीरिक मर्यादांचे वा मनुष्यत्वाचे हे वर्णन त्यांना कमीपणा आणणारे नसून सर्वसामान्य माणसांना आपल्या मनुष्यत्वाचा विकास करण्याची प्रेरणा देणारे आहे.
बुद्ध कोणी परके नाही. कोणत्याही अर्थाने परके नाही. वैरी तर नाहीच नाही. खरे तर ते आपल्याच अंत: शक्तींचे साकार रूप आहेत आपल्याच सर्वस्वाचे अस्सल सार आहेत. आपण पूर्णपणे फुलल्यावर जसे दिसू , अगदी तंतोतंत तसे बुद्ध आहेत. किंबहुना, आपण त्याचे अविकसित पूर्वरूप आहोत आणि ते आपले विकसित उत्तररूप आहेत.
(सदरील लेखात संदर्भ हे आ.ह.साळुंखे सर ह्यांच्या लेखातून घेतले आहेत त्यामुळे यामध्ये कोणतेही बदल करू नये )