March 31, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -४१

भारताच्या इतिहसातील पहिला टप्पा मगध राज्यांच्या ख्रिस्तपूर्व ६४२ मध्ये झालेला उदय हा आहे. मगध राज्याचा संस्थापक शिशुनाग हा होता.हा शिशूनाग अनार्य नाग वंशाचा होता.
या शिशुनाग घराण्याच्या कारकिर्दीत छोट्या मगध राज्याचा विस्तार खूप मोठा झाला .या घराण्यातील पाचवा राजा बिंबिसार याच्या कारकीर्दीत मगध राज्याचे रूपांतर साम्राज्यात झाले.त्याला ‘ मगध साम्राज्य ‘ असे नाव प्राप्त झाले. शिशूनाग घराण्याचे राज्य ख्रिस्तपूर्व ४१३ पर्यंत अस्तित्वात होते.या वर्षी शिषूनाग घराण्यातील राजा महानंद यास नंद नावाच्या एका साहशी तरुणाने ठार केले.नंदाने मगध साम्राज्य बळकावले व नंद घराण्याची सत्ता चालू केली.या नंद घराण्याची सत्ता ख्रिस्तपूर्व ३२२ पर्यंत होती.शेवटच्या नंद घराण्यातील राजाला चंद्रगुप्ताने पदच्युत केले व मौर्य घराण्याची सत्ता मगध राज्यावर स्थापन केली.चंद्रगुप्त हा शिशुनाग घराण्यातील शेवटच्या सम्राटाचा नातलागच होता.याचा अर्थ असा होतो की चंद्रगुप्ताने पुन्हा नाग घरण्याचीच सत्ता मगध साम्राज्यावर स्थापन केली.
मौर्य घराण्याने त्यांच्या विजयी मोहिमानी मगध साम्राज्याचा विस्तार प्रचंड प्रमाणात केला.अशोक सम्राटाच्या काळात हे मगध साम्राज्य इतके विस्तार पावले होते की,मगध साम्राज्याला अशोकाचे साम्राज्य असे मानले जाऊ लागले.
त्यावेळी प्रचारात असलेल्या धर्मापैकी बौद्ध धम्म असल्याने ब्राम्हणी धर्माचे स्वरूप टिकून राहिले नाही.अशोकाने बौद्ध धम्माला राजधर्म बनविले. ब्राम्हणी धर्माला हा फार मोठा धक्का होता.अशोकाच्या राज्याचा ब्राम्हणांना राजाचा आश्रयच राहिला नाही व त्यांची दुय्यम आणि दुर्लक्षित म्हणून गणना होऊ लागली.खरे तर ते दडपले गेले असेही म्हणता येईल.कारण अशोकाने ब्राम्हणी धर्माचे प्रमुख अंग असलेल्या सर्व प्रकारच्या प्राण्यांना यज्ञात बळी देण्याच्या पद्धतीवर बंदी घातली होती.ब्राम्हणांनी राजाश्रय तर गमावलाच : शिवाय त्यांच्या उपजीविकेचा धंदाही बंद झाला : कारण दक्षिणा घेऊन यज्ञाचे पौरोहित्य करणे हा त्यांचा मुळ पेशा होता.व दक्षिणा म्हणून त्यांना फार मोठी रक्कम मिळत असे. ते त्यांचे सर्वात मोठे उपजीविकेचे साधन होते.मौर्य साम्राज्य अस्तित्वात होते तितकी १४० वर्ष ब्राम्हण हे दडपलेले व पददलित वर्ग म्हणून जगले.त्यामुळे बौद्ध शासन विरुद्ध बंड करणे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग हाल अपेष्टा सोसणाऱ्या या ब्राम्हणांना राहिला नाही.पुष्यमित्रने मौर्य घरण्या विरूध्द बंड केले.त्याचे आणखी एक खास कारण होते.(पुष्यामित्राचे शुंग हे गोत्र होते ) शुंग हे सामवेदी ब्राम्हण होते,* शुंगाचा प्राणिमात्रांच्या आहुती वर सोमयज्ञावर विश्वास होता.सर्व मौर्य साम्राज्यात पशूंची आहुती देण्यावर बंदी होती.( अशोकाच्या स्मृतिशिलेवर ही बंदी कोरलेली होती ) त्याविरुद्ध शुंग गोत्री यांचा राग असणे स्वाभाविक होते.त्यामुळे बौद्ध समाज नष्ट करून ब्राम्हणांची अवनती टाळावी हे सामवेदी ब्राम्हण म्हणून पुष्यमित्र चे ध्येय होते यात नवल नाही.बौद्धांच्या राज्यातील ब्राम्हणांच्या होणाऱ्या हालातून ब्राम्हणांना मुक्त करणे , ब्राम्हणी धर्माचे पुनरुज्जीवन करणे हे पुष्यमित्रचे ध्येय होते.*

पुष्य मित्राने केलेल्या राजाहात्येचा उद्देश राजधर्म म्हणून बौद्ध धम्माचे स्थान नष्ट करणे आणि ब्राम्हणांना भारताचे सार्वभौम शास्ते बनवावयाचे हा होता.ब्राम्हणी धर्माचे मागे राजसत्ता उभी केली तर ब्राम्हणी धर्माला बौद्ध धर्मावर विजय प्राप्त करता येईल हा पुष्य मित्राचा विचार होता.त्याचे आणखी दोन पुरावे देता येईल.
क्रमशः
प्रस्तुती :  सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹