संभाजी महाराजांच्या राज्यातील सर्वांत उंच पुतळ्याचे अनावरण रत्नागिरी येथे करण्यात आले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी रात्री हा सोहळा पार पडला.
रत्नागिरी: ढोल, ताशा, झांज, हलगी, घुमके आणि तुतारीच्या निनादात शिवमय वातावरण फटाक्यांच्या आतषबाजीत आणि हजारोंच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा पुतळ्याचे अनावरण रत्नागिरी येथे करण्यात आले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी रात्री हा सोहळा पार पडला.
राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून त्याचे लोकार्पण केले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करून छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यातील सर्वात उंच पुतळ्याचे लोकार्पण केले. यावेळी विजेच्या दिव्यांचे झोत आणि फटाक्यांची आतषबाजी डोळे दिपवणारी ठरली. गायक स्वप्नील बांदोडकर आणि इशा पाटणकर यांच्या शिवगीताने वातावरण भारून गेले.
‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रत्नागिरीची भूमी आहे. हा पुतळा बसवताना मनस्वी आनंद होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. ‘स्टॅच्यू ऑफ सिटी’ करण्यात रत्नागिरीला यश आले आहे,’ असे मंत्री सामंत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या महापुरुषांचा अभ्यास करण्यास पुढच्या पिढीला यातून मदत होणार असल्याची प्रतिक्रिया सामंत यांनी दिली. दानशूर भागोजीशेठ कीर यांचा पुतळा उभारून चार महिन्यांत त्याचे लोकार्पण करण्याची घोषणाही त्यांनी केली.
या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार बाबर, बिपीन बंदरकर, राहुल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा संपन्न झाला
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.