November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

तुमची झोपडी जिवंत राहिली तर लोक तुमच्या आश्रयाला येतील.

“प्रत्येक माणसाने फेडरेशन मध्ये गटबाजी सुरू केली आहे. प्रत्येकाने आपापले लहान लहान गट निर्माण केले आहेत. एकाचे वर्चस्व दुसऱ्याच नको आहे. यामुळे आपले लोक अजून तरी राजकारणात पक्के मुरले नाहीत. राजकारण म्हणजे काय ह्याची त्यास पूर्णपणे जाणीव नाही. आपल्या समाजात आपापसात फार मतभेद असतात. ते मतभेद ताबडतोब नष्ट होत नाहीत. त्या मतभेदाची झाडे त्यांच्या पोटात वाढू लागतात. त्यांचे मतभेद त्यांच्या मुलांच्याही पोटात वाढतात. अशा रीतीने मतभेद हे वाढत जातात. हा गुणधर्म आपल्या लोकात जास्त प्रमाणात आहे.
माझ्या मताप्रमाणे जर कारभार चालला तरच मी संस्थेत राहील, अशी प्रवृत्ती फार वाईट. हम करे सो कायदा नको. संस्थेत कोण मोठा? डॉ. आंबेडकरांचे खालोखाल कोण? वगैरे मतभेद फार वाढले आहेत. मी मरण्याचे अगोदरच हा वाद निर्माण झाला आहे. म्हणजे मी लवकरच मरावे की जगावे असा प्रश्न माझ्यापुढे निर्माण होतो. बाकीच्यांची घरे मोडली तरी आपली झोपडी तशीच ठेवा. लोक तुमच्याच झोपडीच्या आश्रयाला येतील. तुमची झोपडी जिवंत राहिली तरच तुमचा जय आहे. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा किल्ला हा अस्पृश्य जनतेच्या भावनेवर उभारला आहे. तो मोडू देता कामा नये. आपणास ध्येय प्राप्ती होण्याकरता इतरांशी संबंध ठेवावे लागतील. कोणाशी संबंध ठेवायचे हे मी नंतर सांगणार आहे.”!!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड- १८, भाग-३, पान नं. ३९७)
दि.२६ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबई प्रदेश अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या अधिवेशनात कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.