July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्य बुद्धीने झटले पाहिजे.

” आपला समाज आज सर्वतोपरी मागासलेला आहे. द्रव्याने मागासलेला आहे. मनोधैर्याने मागासलेला आहे. ज्या समाजातील लोकांस राजकीय, सामाजिक व धार्मिक असमता व अन्याय यापासून पराकाष्ठेचा त्रास होत आहे, ज्यातील साऱ्या लोकांस गूढ अज्ञानाने व्यापले आहे, ज्यास विपत्तीपासून होणाऱ्या यातना सोसाव्या लागत आहेत व त्याच्या परिहारार्थ काय करावे समजत नाही, त्या लोकांची सर्वत्र चाललेल्या जीवनकार्यात अखेर गती काय होईल हे सांगता येणे फार कठीण आहे. यासाठी आपल्यापैकी ज्यांना ही स्थिती स्पष्टपणे कळत असेल व ज्याच्या मनात कर्तव्यबुद्धी व परोपकारबुद्धी पूर्णपणे जागृत झाली असेल, त्यांनी आपल्या समाजाचा जीवनार्थ कलहात टिकाव लागण्यासाठी रात्रदिवस निरपेक्ष बुद्धीने झटले पाहिजे.
अशा प्रकारचे विचार समजले असून ते जर स्वस्थ राहतील, तर त्यांच्या माथ्यावर आपल्या दडपून गेलेल्या बांधवास विपन्नावस्था आणिल्याची आणि त्यांचा नाश केल्याची भयंकर जबाबदारी येणार आहे. म्हणून सुशिक्षित बांधव हो! जर तुम्हास इतरांकडून व पुढील संततीकडून बरे म्हणून घ्यायचे असेल व तुमची आज जी स्थिती आहे ती दूर करून तुमच्या मुलांची व नातवंडांची स्थिती अधिक वाईट होऊ नये अशी तुम्हास वास्तविक इच्छा असेल तर ज्या दुर्गतांनी व दुराचांरानी आपल्या लोकांच्या बुद्धीचा, कीर्तीचा व परिस्थितीचा घात चालविला आहे, त्यांचे यथाशक्ति निर्मुलन करणे हे आपले कर्तव्य आहे.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-१, पान नं. २४)
मे १९२४,बार्शी, जिल्हा- सोलापूर येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.