“अस्पृश्यता निवारण्याची जी आज चळवळ चालू आहे त्या चळवळीवर अशी टीका करण्यात येते की, अस्पृश्य वर्गात ज्या निरनिराळ्या जातींचा समावेश झालेला आहे त्या जातीतही परस्परातील व्यवहारांमध्ये जातीभेद पाळण्यात येतो, नव्हे अस्पृश्यता पाळण्यात येते. परस्परात जातिभेद व अस्पृश्यता पाळणाऱ्या लोकांना वरच्या जाती कडून तुम्ही जातीभेद मोडा, अस्पृश्यता मानू नका, तसे म्हणण्याचा काय अधिकार आहे? असा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो. तुम्ही आपसातील जातिभेद व अस्पृश्यता नाहीशी करा मग आमच्याकडे दाद मागण्यास या असा साळसूदपणाचा सल्ला त्यांना देण्यात येत असतो.
जातिभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम अस्पृश्य लोकांपासून झालेला नाही. जातिभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंच्या हातून झालेला आहे. ही गोष्ट जर सत्य असेल तर जातिभेदाच्या व अस्पृश्यतेच्या रूढीची जबाबदारी स्पृश्य वर्गावर पडते. अस्पृश्य वर्गाचे लोक जातिभेद व अस्पृश्यता पाळताना वरच्या वर्गाच्या लोकांनी दिलेला धडा गिरवत आहेत. ज्या कारणामुळे जातिभेद व अस्पृश्यता ही आपल्यामध्ये शिरली त्या कारणाला आपण जरी जबाबदार नसलो, तथापि, आपल्यामध्ये जो जातिभेद व जी अस्पृश्यता नांदत आहे तिचा धिक्कार न करणे, ती आहे तशीच चालू देणे आपल्याला इष्ट नाही. अस्पृश्यतेचा व जातीभेदाचा शिरकाव करण्यास जरी आपण जबाबदार नसलो तरी ती घालविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
अर्थात ज्या धर्मात माणसाची घाण माणसाने मानली पाहिजे, अशी शिकवण देण्यात येते आहे त्या धर्मात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या मनातील जातीभेदाची भावना कदापि नष्ट होणार नाही. अस्पृश्यातील जातिभेद व अस्पृश्यता नाहीशी करावयाची असल्यास त्यांनी धर्मांतर करणे हा एकच रामबाण उपाय आहे.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड- १८, भाग- १,पान नं.५०८)
दि.२ जून १९३६,मुक्ती कोन पथे? या मुख्य भाषणानंतर मुंबई इलाखा अस्पृश्य संत समाजाची परिषद, राजकीय परिषद आणि मुंबई इलाखा मातंग परिषद यात बाबासाहेबांनी अस्पृश्यांना उद्देशुन दिलेले भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.
More Stories
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न काय होते ? ते पूर्ण झाले का ?
भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर की बी.एन. राव – ऐतिहासिक सत्याचे सखोल विश्लेषण Dr. Babasaheb Ambedkar or B.N. Rao – An in-depth analysis of historical truth
बौद्ध अतिरेकीपणाचा धोकादायक उदय: ‘निर्वाण प्राप्त करण्यासाठी वाट पाहावी लागू शकते