November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

परकीयांच्या गुलामगिरीचा प्रसंग पुन्हा आला तर तो आत्मनाश ठरेल

“आता आपण एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवली पाहिजे की आपण आपल्या लोकांचे, आपल्या समाजाचे हित पाहत होतो ते तर पुढे चालू ठेवले पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य कसे राखून ठेवता येईल याचाही विचार केला पाहिजे. या देशाला पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पारतंत्र्यात पिचत पडावे लागले आहे. अगोदर मुसलमानांनी व नंतर इंग्रजांनी आपले स्वातंत्र्य आपल्यापासून हिरावून घेतले होते. स्वातंत्र्याची वरच्या वर्गाला जितकी जरुरी आहे तितकीच खालच्या वर्गालाही आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो आहोत. पण आता पुन्हा परकीयांच्या गुलामगिरीत पडण्याचा प्रसंग आपल्यावर आला तर ती अत्यंत दुर्दैवाची ठरेल. म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हेही प्रत्येकाने आपले परम कर्तव्य मानले पाहिजे.
देशरक्षणाची भावना मनात बाळगून भावी राजकारणातील शत्रूमित्रांचे नाते ओळखून, सत्व राखून आपण सावधतेने शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली पावले टाकली पाहिजेत. देशातील राजकीय पक्षांचे भवितव्य काय आहे हे आज कोणीच सांगू शकत नाही. निवडणुका होईपर्यंत राजकारणाला काय स्वरूप येईल हे निश्चित सांगता येत नाही. निवडणुका या पैशाच्या जोरावर लढवल्या जातात.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड- १८, भाग-३, पान नं. १९४)
बुधवार, दि.११ जानेवारी १९५०,रोजी मुंबई शहर उपनगर दलित फेडरेशनच्या विद्यमाने मुंबईतील नरेपार्क मैदानावर बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी दोन लाखाच्या वर उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.