August 10, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

पितळखोरा लेणी आणि पांढर्‍या रंगातील चिवर घातलेले सम्यक समबुध्द…!

औरंगाबाद जिल्ह्यातील सातमाळ पर्वत रांगेतील कन्नड जवळील गौताळा अभयारण्यात आद्य लेणी असलेल्या “पितळखोरा लेणीच्या” विषयी अनेक वैशिष्ट्ये अनेक वेळा विशद केली आहेत त्याच्यात आणखी एक भर.
पितळखोरा लेणी अनेक अंगाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारणता इ स पूर्व दुसऱ्या शतकातील या लेणीवर इ स च्या पाचव्या सहाव्या शतकात महायान पंथाने भित्तीचित्रे तयार केली, यात सम्यक समबुध्द व बौध्दीसत्व यांनाच चितारण्यात आले आहे कदाचित ही भित्तीचित्रे अजिंठा लेणीत काढण्यात आलेल्या भित्तीचित्रांच्याही अगोदरची असण्याची शक्यता आहे.
कारण या भित्तीचित्रात मुख्य चैत्यगृहांच्या भिंतीवर स्तंभावर जातक कथांचे चित्रण न करता सम्यक समबुध्द व बौध्दिसत्व यांनाच चितारण्यात आले आहे तर जगाचे लक्ष आपल्या भित्तित्रांच्या मुळे वेधून घेणार्या अजिंठा लेणीत आपल्याला अनेक जातक कथांचे चित्रण पाहायला मिळते .
पितळखोरा लेणीत ज्या वैशिष्ट्य विषयी सांगत आहे ते म्हणजे “पांढर्या” रंगाचे चिवर परिधान केलेले सम्यक समबुध्द यांचे भित्तीचित्र.
लेणी क्रमांक तीन जे एक चैत्यगृह असून या लेणीत पुर्वी ३७ अष्टकोनी खांब होते आज त्यापैकी आता फक्त १२ खांब मूळ स्वरूपात शिल्लक आहेत त्यावर सुंदर असे सम्यक संबुध्दांचे चित्रण केलेले आहे भगव्या रंगाचे चिवर परिधान केलेले तथागत आपण इथे पाहु शकतो तर स्तूपाला वंदन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चंक्रमण अथवा प्रदक्षिणा पथाच्या डाव्या बाजुच्या भिंतीवर हे वैशिष्ट्यपूर्ण भित्तीचित्रे आपल्याला पहायला मिळते.
अष्टकोनी खांबांवर चित्रीत केलेली चित्रे थोडी प्राथमिक स्वरूपातील वाटतात तर प्रदक्षिणा पथावरील भित्तीचित्रे ही गंभीर स्वरूपाची वाटतात तसेच मानवीय वैशिष्ट्ये उत्कृष्टरित्या मांडण्यात कलाकारांने आपली कस पणाला लावल्याचे व कलेतील आपली ऊंची गाठल्याचे या चित्रातून प्रदर्शित होते तसेच चित्रातील रंगसंगती गडदपणा देखील या चित्रांना एक अती उच्च ऊंची प्रदान करते.
स्तंभावरची भित्तीचित्रे व बाजुच्या भिंतीवरील भित्तीचित्रे यांच्यात खूप मोठी तफावत दिसुन येते , स्तंभांवरील चित्रे जेवढी प्राथमिक स्वरूपाची दिसतात तेवढीच प्रगल्भ बाजुच्या भिंतीवरील भित्तीचित्रे दिसतात.
इथे असलेले बौध्दिसत्व देखील उत्कृष्ट चितारलेली आहेत बौध्दीसत्वांचे कुरळे केस व त्या केसांची चेहर्यावर आलेली एक बट आपले सर्वांचे लक्ष वेधून घेते.
या सर्व बाबी छोटे मोठे बारकावे पाहण्यासाठी आपल्याला एकदातरी पितळखोरा लेणीवर जावे लागेल.
किंवा आपल्या आसपासच्या एखाद्या लेणीवर जावे लागेल आता पावसाळा सुरू आहे इथला कातळ आता स्वच्छ व अधिक गडद होउन जाइल इथले धबधबे आता वाहू लागतील तसेच ओढे ही वाहू लागतील नवीन पालवी फुटलेली झाडे इथला वातावरण अगदी आल्हाददायक करून ठेवतील तेव्हा एक दिवस ठरवून लेणीच्या निसर्गाच्या सानिध्यात जा संपूर्ण वर्षभराची मरगळ दुर होऊन जाइल….!
मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली, नवी मुंबई
९३२०२१३४१४