शांततेसाठी प्रशासनाला सहकार्याची सर्वांची भूमिका
परभणी, दि. 12 (जिमाका):- परभणी जिल्हयात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली.
दि. 10 डिसेंबर रोजी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या अवमानाच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी आयोजित या बैठकीस खासदार संजय जाधव, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींसह समितीचे सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वांनी जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी यांनी शांततेसाठी तत्परतेने प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे उपस्थितांनी अभिनंदनही केले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील शांतता अबाधित राहिल, याची आपण काळजी घेऊ, शांततेसाठी तुमच्या सर्वांचे सहकार्य प्रशासनाला राहिले आहे, यापुढेही तुमचे असेच सहकार्य अपेक्षित आहे. नुकसानग्रस्तांची पंचनामेची कारवाई सुरू करण्यात आली असून त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. दोषीवर अवश्य कारवाई केली जाईल. संपूर्ण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात असून सर्वत्र शांतता आहे. जिल्ह्यात सर्वांना शांतता व सौहार्दाचे वातावरण राखण्यास जिल्हाधिकारी यांनी यावेळी आवाहन केले आहे.
खासदार श्री. जाधव म्हणाले की, घटनेच्या सखोल चौकशीसाठी मी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र दिले आहे. कुणीही कायद्याचे उल्लंघन करू नये. दोषींवर कडक कारवाई करावी. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करून प्रशासनाने नुकसान भरपाई मिळवून द्यावी.
प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे म्हणाले की, जे खरे दोषी आहेत, त्यांच्या विरूद्ध कारवाई केली जाईल. अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी केली जाईल. त्याची नार्को टेस्टही केली जाईल. सोशल मीडियाचा काळजी पूर्वक वापर करा. अफवांवर विश्वास ठेऊ नका. शांततेसाठी सर्वांनी सहकार्य करावे.
प्रारंभी आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या समाजकंटकांवर अवश्य कारवाई करावी. मात्र निरपराधींवर गुन्हे दाखल करू नका. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई द्यावी. भविष्यामध्ये जिल्ह्यात अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे, असे मत उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले. अशी माहिती प्रशासनाने दिली.
***
More Stories
Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा परिवर्तनशील धाडशी निर्णय – ॲड. अनिल वैद्य
Chevening Scholarship म्हणजे काय ?
१ लाख धम्म सेवक–सेविका नोंदणी अभियान : धम्माच्या जागृतीसाठी ऐतिहासिक पाऊल