April 30, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

Parbhani News : पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा, परभणी दंगलप्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कसा झाला ? 

Somnath Suryawanshi News In Marathi: महाराष्ट्रातील परभणीमध्ये अज्ञात व्यक्तीने संविधानाचा अवमान केल्याने हिंसाचार उसळला. या काळात अनेक भागांतून जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 40 जणांना अटक केली आहे. तर दुसरीकडे परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने राज्यात खळबळ उडाली होती. यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असा आरोप होता. मात्र आता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा पोलिसांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायिक समितीच्या देखरेखीखाली त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आता समोर आला.

10 डिसेंबर रोजी रोजी सायंकाळच्या वेळी परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी रोजी परभणी बंदची हाक देल्यानंतर शहरात दगडफेकची घटना घडली. या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि दगडफेक करणाऱ्यांना गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या छातीत कळ येत असल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना परभणीत घडली आहे. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन न्यायालयाच्या निगराणीत छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात करण्यात आलं आहे.

त्यानंतर आता संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये झालेल्या आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात पोलिस कोठडीत असताना परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. सोमनाथ यांची उत्तरीय तपासणी छत्रपती संभाजीनगरमधील घोटी रुग्णालयात आज सोमवारी दुपारी इन कॅमेरा करण्यात आली. प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आनंदराज आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने परभणी बंद आहे.

प्रकाश आंबेडकर आक्रमक :वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून भाष्य केले आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या मृत्यूचे कारण, शरीरावर अनेक जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सोमनाथ सुर्यवंशी – एक भीमसैनिक आणि वडार समाजातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता होते. ते परभणीतील एका महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होते. आम्ही त्यांच्यासाठी न्यायाची लढाई लढणार, असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सुषमा अंधारेंचा पोलिसांवर गंभीर आरोप : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला. परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. पण पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रमाणे खुणा दिसत होत्या. तो पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा बळी ठरला. पोलीस निरीक्षक शरद मरे, पोलीस उपनिरीक्षक तुरनर, स्थानिक गुन्हे शाखेचे गोरगांड या तीन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करुन स्वतंत्र चौकशी करावी. तसे केले नाही तर मला दोन दिवसांनी परभणीत येऊन बसावे लागेल, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला होता.