August 8, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

विस्तारित होत असलेला बौद्ध संस्कृतीचा इतिहास New finds are expanding Buddhist History

आशिया खंडात सर्वत्र सापडत असलेले बौद्ध संस्कृतीचे अवशेष पाहून अनेक इतिहासकार, स्कॉलर, अभ्यासक, कर्मठवादी, परंपरावादी चकित झाले असून एकेकाळी बौद्ध धम्म सर्वत्र व्यापलेला होता असे दिसून येत आहे. आता गेल्या एक-दोन वर्षातच बघा, किती तरी बौद्ध स्थळे उजेडात आली आहेत. यामुळे आशिया खंडातील बौद्ध इतिहासात भर पडत असून तो अजून विस्तारित होत चालला आहे. इ.स.पूर्व पाचव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत बौद्ध धर्माचा भरभराटीचा काळ हा या नवीन संशोधनामुळे उजेडात आला आहे. गेल्या दोन वर्षात सापडलेल्या बौद्ध संस्कृतीच्या पुरातन स्थळांची यादीच या निमित्ताने पाहू.
१) चीनमध्ये शा-सि प्रांतात ऊनगॅंग लेण्यांच्या परिसरातील उत्खननात मागील वर्षी रंगीत बुद्ध शिल्पे सापडली. चीनमध्ये पाहिले बुद्धविहार इ.स.पूर्व ६८ मध्ये उभारले गेले असे मानले जाते. एका धरणाचे बांधकाम करताना तेथे ६०० वर्षापूर्वीचे बुद्धशिल्प मिळाले. तसेच काही अस्थीकलश तेथे प्राप्त झाले.
२) उझबेकीस्तान देशात झालेल्या उत्खननात स्तूप, शिल्पे आणि विहारांचे अवशेष प्राप्त झाले. त्यामुळे बुध्दिझम तिथपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.
३) बिहार राज्यात नुकतेच लखीसराई भागातील टेकडीवर वज्रयान पंथ विहाराचे अवशेष प्राप्त झाले. मातीची पात्रे, शिल्प अवशेष, विटा आणि नाणी तेथील उत्खननात मिळाली.
४) ओरिसा राज्यात बौद्ध मॉनेस्ट्रीच्या अवाढव्य संकुलाचे अवशेष प्राप्त झाले आहेत. येथे ध्यान मार्ग व धम्म शिक्षणाचे मोठे केंद्र असावे असे इतिहासकारांना वाटत आहे.
५) अफगाणिस्तान या देशात तांब्याच्या खाणी जवळ बौद्ध मॉनेस्ट्रीचे अवशेष मिळाले आहेत.
६) पाकिस्तानमध्ये खैबर पुखतूनख्वा प्रांतांमध्ये जवळजवळ १५० बौद्ध पुरातन स्थळे मिळाली असून ती सर्व सम्राट अशोक राजाच्या कालकिर्दीतील म्हणजेच २३०० वर्षांपूर्वीची आहेत.
७) भारतात तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात उत्खननात बौद्ध संस्कृतीचे अवशेष प्राप्त होत असल्याने तेथे उत्खननच बंद ठेवले आहे. तरीही मागील वर्षी बौद्ध विहारांचे पुरातन अवशेष कल्लाकरूची जिल्ह्यात उजेडात आले आहेत.
८) केरळ राज्यात नुकतीच तेथील देवालयाच्या तलावांमधून बुद्धमूर्ती काढण्यात आली. त्याची व्हिडीओ क्लिप देखील व्हायरल झाली होती.
९) नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यांजवळ देखील याच वर्षी नवीन विहार उजेडात आले आहे.
१०) नेपाळमध्ये तिलौराकोट भागात उत्खनन चालू असून बौद्ध संस्कृतीचे अवशेष प्राप्त होत आहेत. तेथे सिद्धार्थ यांचे बालपण गेले होते असा ईतिहासकारांचे ठाम मत आहे.
११) बांगलादेशात मागील वर्षी दालीजहारा दिबी गावाजवळ जुन्या आमराईत उत्खनन झाले असता १२०० वर्षापूर्वीचे बौद्ध विहार उजेडात आले. येथे १८ निवास कक्ष, दोन ध्यान कक्ष, मातीची भांडी, नक्षीदार विटा आढळून आल्या.
१२) बांगलादेशातच नातेश्वर येथे एक हजार वर्षापूर्वीचे एक विहार उत्खननात सापडले. हे विहार आतिश दिपंकर या तिबेट-चीनमध्ये गेलेल्या भिक्खुचे असावे असा इतिहासकारांचा होरा आहे.
१३) चीनमधील ड्युनहँग्स या प्रसिद्ध बौद्ध लेण्यांमध्ये लेणे क्र. ४६५ मध्ये असलेला मजकूर हा संस्कृत असल्याचे उघडकीस आले आहे.
१४) जपानमध्ये क्योटो शहराजवळ एका पुरातन विहाराचे नूतनीकरणाचे काम चालू असताना दोन स्तंभावर आठ बौद्ध भिक्खूंच्या प्रतिमा प्राप्त झाल्या. जपानमधील हे सर्वात जुने पेंटिंग असावे असा संशोधकांचा कयास आहे.
१५) यावर्षी जानेवारीत झारखंड मध्ये हजारीबाग येथे झालेल्या उत्खननात मोठे बुद्ध विहार सापडले. येथे ध्यानस्थ बुद्ध प्रतिमा आणि तारा बोधिसत्वाच्या पाच प्रतिमा मिळाल्या.
१६) गुजरातमध्ये वडनगर येथे चैत्य आणि दोन स्तुपांचे अवशेष मागील वर्षी प्राप्त झाले. यामुळे चिनी प्रवासी भिक्खू हुएनत्संग यांनी आनंदपुरा ( वडनगरचे जुने नाव ) येथे १० मॉनेस्ट्री पाहिल्याचे लिहिले आहे ते तंतोतंत खरे असल्याचे दिसून येत आहे.
१७) तेलंगणा राज्यात सूर्यापेठजवळ फांगिरी येथे २०१९ मध्ये उत्खनन केले असता बौद्ध संस्कृतीचे अवशेष प्राप्त झाले. येथे मोठे बुद्ध शिल्प मिळाले असून पहिल्या शतकातील स्तूपकक्ष, ध्यानकक्ष, प्रार्थनाकक्ष आणि ब्राह्मी लिपीतील काही लेख आढळले आहेत.
१८) उत्तरप्रदेशात माऊ जिल्ह्यात पूर्वांचल हायवेचे बांधकाम करताना बुद्ध शिल्पाचे शीर, असंख्य नाणी, टेराकोटा आणि विटांचे तुकडे मागील वर्षी सापडले. तसेच अयोध्या येथे राममंदिराचे बांधकाम करताना सुद्धा बौद्ध संस्कृतीचे अवशेष प्राप्त झाले आहेत.
१९) आंध्रप्रदेशमध्ये किनारपट्टी भागातील शहर घंटाशाला येथे बौद्ध संस्कृतीचे अवशेष एका शेतात तसेच शाळेच्या पाठीमागील मोकळ्या भागात मिळाले. तेथील अवशेषांची संख्या खुपच जास्त असून तेथे छोटे संग्रहालय होऊ शकते.
२०) ओरिसामध्ये आठव्या ते दहाव्या शतकामध्ये भौमाकारा ही बौद्ध संस्कृतीची राजवट होती. पुरातत्व खात्याला अंगुल जिल्ह्यात नुकतेच स्तूप, शिल्पे, वालुकामय स्तंभ उत्खननात प्राप्त झाले. यापूर्वी येथे एक ताम्रपट मिळाला होता. त्यावर येथे दोनशे भिक्खू आणि भिक्खुणी येथील मॉनेस्ट्रीत असल्याचा उल्लेख आहे. दिल्ली युनिव्हर्सिटी, बुद्धिस्ट स्टडीजचे माजी प्रमुख ‘केटीएस सराव’ यांनी सांगितले की भारतात अशी असंख्य बौद्धस्थळे आहेत, ज्यांना आजही हिंदु देवळे समजली जातात. बुद्धांच्या मूर्ती महादेव म्हणून पुजल्या जातात आणि अशोक स्तंभ हे शिवलिंग म्हणून पूजले जाते. ( उदा. पलटादेवी मंदिर )
अशा तऱ्हेने आशिया खंडात मागील दोन वर्षात असंख्य बौद्ध संस्कृतीचे अवशेष उत्खननात प्राप्त झाले आहेत. यातील काही उजेडात येऊन त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. तर काहींची नुसतीच नोंद घेऊन त्यांना पडद्याआड ठेवले आहे. बौद्ध संस्कृतीचा इतिहास विस्तारित होत असून नव्या स्थळांची दिवसेंदिवस भर पडत आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी Hindustan Times च्या खालील लिंकवर जाऊन माहिती प्राप्त करावी.
— संजय सावंत ( नवी मुंबई ) www.sanjaysat.in