August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

नाशिक त्रिरश्मी बुद्ध लेणीं समूहात आता नवीन 2 लेणींची भर !

1823 साली कप्तान जेम्स डेलामीन या ब्रिटिश सैन्य अधिकाऱ्याने सर्वात पहिल्यांदा नाशिक येथील ” त्रिरश्मी बुद्ध लेणीं”चे documentation केले आणि जगासमोर ही बुद्धलेणीं प्रकाशित केली.गेल्या दोनशे वर्षांत असंख्य इतिहास संशोधक, पुरातत्त्वविद, अभ्यासक आणि पर्यटक ही बुद्धलेणीं पाहून गेले, अभ्यासून गेले. अनेकांनी यावर PhD केली. आज 200 वर्षांनी, बुद्ध पौर्णिमेच्या एक आठवडा आधी, या त्रिरश्मी बुद्ध लेणीं समूहातील आणखीन दोन भिक्खू निवासगृहांचा शोध लागला आहे.गेल्या आठवड्यात, येथील नवीन रुजू झालेल्या Conservation Archaeologist, राकेश शेंडे सर यांच्याबरोबर मी आणि सुनील खरे यांनी येथील लेणींच्या बाबतीत संवर्धन आणि जतन करण्या संदर्भात चर्चा केली. त्यावेळेस लेणींच्या वर, डोंगरात असलेली नाली साफ करून लेणीच्या आतमध्ये पडणारे पाणी थांबविणे ही प्राथमिक गरज आहे हे सांगितल्यावर, शेंडे सरांनी देखील लगेच सुरुवात केली.त्यावेळेस कामगार नाली साफ करत असताना, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या वरिष्ठ कर्मचारी, आणि माझे मित्र, सलीम पटेल यांना एका घळीत, झाडांनी वेढलेले दोन भिक्खू निवासगृह दिसले. त्यांनी शेंडे सरांना कळवले. बातमी कळताच ट्रिबिल्स संस्थेचे अतुल भोसेकर, सुनील खरे आणि पुरातत्त्वविद मैत्रेयी भोसेकर तेथे पोहचले व या भिक्खू निवासगृहांचा पाहणी केली.अतिशय बिकट वाटेने, नुकत्याच झालेल्या पावसामुळे, घसरड्या डोंगराच्या उतारावरच्या मार्गावर, या दोन लेणीं कोरलेल्या दिसल्या. पुरातत्वीय निकषानुसार हे दोन्ही भिक्खूनिवासगृह इ.स.दुसऱ्या शतकातील असावीत. एका भिक्खू निवसगृहात दोन भिक्खू राहत असावेत तर दुसऱ्यात एकच भिक्खू राहत असावा असे दिसते. दोन्ही लेणींमध्ये व्हरांडा आहे. या लेणींत भिक्खुंसाठी वैशिष्ट्यपूर्ण दगडी चौथरा कोरला आहे तसेच ध्यान करण्यासाठी एक कोढी कोरण्यात आली आहे. या ध्यानकक्षा वरून नाशिकचे विहंगम दृश्य दिसते. ध्यान करण्यासाठी अशी विशेष व्यवस्था कान्हेरी आणि वाई येथील बुद्ध लेणींत पाहायला मिळते.या दोन्ही लेणींचे documentation मैत्रेयी आणि सुनील खरे यांनी केले असून लवकरच ते पुरातत्व विभागाला सोपविण्यात येईल. त्रिरश्मी बुद्ध लेणीं समूहात दोन लेणींची भर ही माझ्यासाठी खूप सुखावणारी घटना आहे…महाराष्ट्रात असलेल्या बुद्ध लेणीं समूहावर आणखीन लेणीं सापडण्याची शक्यता वाढली आहेच…फक्त आपण सर्वांनी आता मनापासून शोध घ्यायला हवाबुद्ध पौर्णिमेच्या एक आठवडा आधी सापडलेले हे भिक्खूनिवासगृह लेणीं येणाऱ्या काळातील सुवार्ताचे लक्षण आहे एवढे निश्चित! लेणींच्या अभ्यासाची काही क्षणचित्रे…

अतुल मुरलीधर भोसेकर 9545277410