नागपूर: राज्य सेवा पूर्व परीक्षेची नियोजित २८ एप्रिलची परीक्षा रद्द करण्यात आल्याने सुधारित तारीख कधी घोषित होणार याबद्दल सातत्याने विचारणा करण्यात येत आहे. यावर आयोगाने प्रसिद्धी पत्रक जाहीर करून याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करीता २९ डिसेंबर, २०२३ रोजी विविध संवर्गातील एकूण २७४ पदांकरीता जाहिरात क्रमांक ४१४/२०२३ प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परीक्षा दिनांक २८ एप्रिल, २०२४ रोजी घेण्यात येणार होती. परंतु, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, २६ फेब्रुवारी, २०२४ अंमलात आल्याने सदर अधिनियमातील तरतुदी विचारात घेता आयोगाच्या २१ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच १९ मे, २०२४ रोजी नियोजित समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, २६ फेब्रुवारी, २०२४ मधील तरतुदीनुसार २६ फेब्रुवारी, २०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत/जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तथापि, निवड प्रक्रिया सुरु झालेली नाही, अशा प्रकरणी शासनाकडून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून घेणे गरजेचे आहे.
त्याप्रमाणे मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना कळविण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२४ करीता शासनाच्या महसूल व वन विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, ग्राम विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, उद्योग उर्जा व कामगार विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग इत्यादी विभागांकडून विविध गट-अ व गट-ब राजपत्रित संवर्गाकरीता प्राप्त मागणीपत्रामध्ये अराखीव पदांचा समावेश असल्याने, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण विचारात घेऊन सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या या संबंधित विभागास कळविण्यात आले आहे. तथापि, सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त होण्यास किती कालावधी लागेल याबाबत निश्चितता नसल्याने सध्या परिक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येत नाही.
प्रस्तुत परीक्षेतील सर्व संवर्गाकरीता प्रशासकीय विभागाकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर परीक्षेच्या पूर्व तयारीकरीता पुरेसा कालावधी देऊन तसेच संघ लोकसेवा आयोग व कर्मचारी चयन आयोग इत्यादींमार्फत आयोजित स्पर्धा परीक्षेचे दिनांक विचारात घेऊन परीक्षेचा सुधारित दिनांक आयोगामार्फत जाहीर करण्यात येईल असे आयोगाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
More Stories
New IRCTC Train Ticket Reservation Rules : भारतीय रेल्वेच्या नियमानुसार आताचार महिन्यांचा तिकीट बूक करण्याचा नियम रद्द
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई – नागपूर विशेष रेल्वेगाड्या
जपानमधील जगातील उंच ब्राँझ बुद्ध पुतळ्याची साफसफाई World’s Tallest Bronze Buddha Statue in Japan Undergoes Annual Cleaning