February 20, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

‘सम्यक वाचा’ अनुसरा आणि गोड बोला Mindful Communication is Sweet talk

पंचशीलाचे दररोजच्या व्यवहारात पालन करणे आणि सकाळ-संध्याकाळ ध्यानसाधना करणे हे सध्याच्या जीवनशैलीत आवश्यक आहे. धम्माचे आकलन ज्याला झाले आहे तो साधक चित्त व शरीर यांचे प्रती जागृत राहून यथार्थ व कळेल असेच बोलतो. शील पालन केल्याने आणि साधनेच्याप्रती निष्ठावान राहिल्याने अनेक चांगल्या गोष्टी चित्त व शरीरधारेस बळकटी देतात. बाष्कळ बडबड बंद होते. ताणतणाव नष्ट होतात. वाणी आपोआप सुधारते. सर्वांप्रती प्रेम भावना वाढीस लागते. लोभ व द्वेष नष्ट होऊ लागतो. जे जे कार्य हाती घेतले जाते त्यात यश प्राप्त होते. संवाद सुधारतो. अशा अनेक महत्वपूर्ण चांगल्या बाबी घडून येतात.
वाणी सुधारण्याचे काम साधनेच्या अभ्यासानेच होते. आपली वाणी खालील चार बाबींनी युक्त असावी असे पालि भाषेतील गाथांमध्ये म्हटले आहे.
सुभाषित बोलावे – दुर्भाषित बोलू नये.
धर्मच बोलावे – अधर्म बोलू नये.
प्रिय बोलावे – अप्रिय बोलू नये.
सत्यच बोलावे – असत्य बोलू नये.
साधकाने अशी वाणी बोलावी की जिच्यामुळे आपल्यावर पश्चाताप करण्याची पाळी येत नाही व इतरांनाही त्रास होत नाही. अशी वाणी हीच खरी सुभाषित वाणी होय. मधुर वाणी होय. गोड वाणी होय. प्रत्येकाने आपण काय बोलतो याकडे जागृततेने लक्ष ठेवावे. निरर्थक गप्पागोष्टी, असंबद्ध बडबड नसावी. स्वतःचे शरीराप्रती होणाऱ्या संवेदनांना साक्षी राहून बोललेली वाणी ही धम्मवाणी होय. सत्यवादी झाल्याने लोकांच्या विश्वासास पात्र होता येते. म्हणून दुसऱ्यांना समजेल, उमजेल असे बोलावे. त्यामध्ये उपहास, निंदा, क्रोध नसावा. जी वाणी कानाला सुख देणारी आहे, प्रेमळ आहे, हृदयाला जाऊन भिडणारी आहे, सभ्य आहे, बहुजनांना मान्य आहे अशी गोड भाषा बोलणारा निश्चितच समाधी आणि प्रज्ञेत निपुण होतो. नुसते तिळाचे, गुळाचे पदार्थ खाऊन आपोआप गोड बोलता येत नाही. असो, आपण वाचाळ न होता विनयवादी व्हावे.
— संजय सावंत (नवी मुंबई)
संदर्भ:- सुत्तनिपात या पालि ग्रंथातील सुभासितसूत्त.
🏮🏮🏮