January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचा आणि विचारांचा वारसा जपणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि पी.एल. लोखंडे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड यांची मैत्री सर्वश्रुत आहेच परंतु नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री गावचे भूमिपुत्र- बाबासाहेबांचे अंगरक्ष पी.एल. लोखंडे ही त्यांचे खंदे समर्थक- कार्यकर्ते होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींचा वारसा जपत असताना कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि सय्यद पिंपरी या गावचे भूमिपुत्र पी. एल.लोखंडे यांनी बाबासाहेबांच्या अस्थीचे जतन नाशिक जिल्ह्यातील, नाशिक तालुक्यातील, सय्यद पिंपरी या गावी केले. (नाशिक पासून १८ कि. मी.अंतरावर)
बाबासाहेबांच्या पवित्र अस्थीचे जतन करत असताना सय्यद पिंपरी या गावी धम्मवस्तीमध्ये स्थानिक गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने सुंदर असा स्तूप त्या ठिकाणी बांधण्यात आला आणि त्याच ठिकाणी बाबासाहेबांच्या पवित्र अस्थीचे रोपण ३० मे १९५८ रोजी करण्यात आले.
सदर स्तूपच्या लोकार्पण प्रसंगी बाबासाहेबांचे पुतणे मुकुंदराज आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि पी एल लोखंडे आणि गावातील ग्रामस्थ हजर होते. त्याप्रसंगी स्तूपच्या मागच्या बाजूला मुकुंदराज आंबेडकर यांच्या हस्ते एक बोधीवृक्ष लावण्यात आला होता आणि तो वृक्ष अजूनही अस्तित्वात आहे.
सय्यद पिंपरी या गावामध्ये दरवर्षी 30 मे वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
सदरची पवित्र वास्तू ही बऱ्याच वर्षापासून दुर्लक्षित राहिलेली होती. परंतु गेल्या १५ वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर पवित्र वस्तूचा प्रचार आणि प्रसार मोठया प्रमाणात झाला त्याचा परिणाम म्हणून १४ एप्रिल, ६ डिसेंबर या दिवशी मोठया प्रमाणात जनसमुदाय बाबासाहेबांच्या अस्थी असलेल्या स्तुपास मानवंदना देण्यासाठी जमा व्हायला लागला. ज्या समाजबंधवांना ६ डिसेंबर या दिवशी दादर चैत्यभूमी या ठिकाणी जायला जमत नाही ती मंडळी बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी सय्यद पिंपरी या गावी जरूर येतात. अलीकडच्या काळातील गर्दी लक्षात घेता या दिवशी सय्यद पिंपरी या गावातील समाज बांधव आणि नवतरुण मित्रमंडळच्या वतीने चोख व्यवस्था ठेवली जाते.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड, गावचे भूमिपुत्र पी. एल. लोखंडे आणि ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून साकारलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे स्तूप समाजासाठी एक प्रेरणास्थान बनले आहे.
तुमच्या कडून तर हे ठिकाण दुर्लक्षित राहिले नाही ना, तर मग चला ह्या ६ डिसेंबर ला नाशिक तालुक्यातील सय्यद पिंपरी या गावी बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी जाऊ या.

आपला धम्मबंधू, महेंद्र जयवंत निकम
अध्यक्ष- भारतीय बौद्ध महासभा, नाशिक तालुका
संपर्क :-७७४४८९८६२९

भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम
प्रल्हाद बी उघडे बौद्धाचार्य