February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बौध्द सातवाहन सम्राटांची कर्मभूमी – आंध्र प्रदेश व तेलंगणा

पद्मावती, सुखावती, अमरावती ही नावे बौध्द संस्कृती व परंपरेशी संबंधीत आहे. हिमालयातील अमरनाथ गुहेजवळून वाहणारी अमरावती नदी आहे. विदर्भातील अमरावती हे प्राचिन बौध्द क्षेत्र आहे. येथे प्राचिन अंम्बाबाईचे मंदिर आहे. अंम्बा, पाली ही नावे बौध्द धम्माशी निगडीत आहेत. धम्म उपासिका आम्रपाली ही बौध्द पर्वातील प्रत्यक्ष तथागतांशी संवाद केलेली महत्वाची नाईका होती. तिच्या नावाचा अपभ्रंश होवून अम्ब, अंम्बा ही नावे प्रचलित झाली आहे.

दक्षिण भारतातील आंध्रपदेशमधील अमरावती हे सुध्दा असेच एक बौध्द संस्कृतीशी निगडीत प्राचिन केंद्र आहे. प्राचिन जंम्बुद्विपामध्ये दक्षिणेकडील राज्यांस नागमंडल असे म्हटले जात होते. बौध्द धम्मीय नागराजांची येथे सत्ता होती. मौर्यांचे दक्षिणेकडील सातवाहन हे मांडलीक राजे होते. मौर्याच्या ऱ्हासानंतर नागमंडलममध्ये आंध्र सातवाहन साम्राज्याची सत्ता होती. सातवाहन राज्याची राजधानी अमरावती होती. आंध्र सातवाहनांची सत्ता गेल्यानंतर याचे तीन भाग झाले. 1. चेर-केरळ 2. पांड्य-कर्नाटक 3. चोल-तामिळनाडू. आंध्र प्रदेशचे नुकतेच विभाजन झाले आहे. आंध्रप्रदेश व तेलंगना अशी दोन राज्ये निर्माण झाली आहेत.

आंध्रप्रदेश सरकारने आपल्या राज्याची राजधानीचे नाव अमरावती ठेवले आहे. आंध्रप्रदेश सरकारचे फार कौतुक वाटते की, त्यांनी प्राचिन बौध्द इतिहासाला उजाळा देत आपल्या राज्याच्या राजधानीचे नाव अमरावती ठेवले आहे. येथे जवळच कृष्णा नदीवर नागार्जून सागर नावाचे धरण आहे. नागार्जूनसागर जवळील बुध्दवनम किंवा सिरीपर्वत आराम सारखे हजारो कोटी रुपयांचे बौध्द पर्वाची ओळख निर्माण करणारे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देणारे प्रोजेक्ट उभे केले आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे काम होत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये बौध्द संस्कृती, परंपरा प्राचिन काळापासून रुजलेली आहे. पाषाणमध्ये कोरलेल्या हजारो लेण्या, कातळातील शेकडो, चैत्यगृहे, बांधलेली विटांची अनेक स्तूप अशी कित्येक प्राचिन बौध्द संस्कृती, परंपरा दर्शविणाऱ्या प्राचिन बौध्द वास्तू आहेत. परंतू, त्यांचे जतन, अभ्यास व संवर्धन होतांना दिसून येत नाही याची खंत वाटते.

तेलंगणा सरकार नागार्जूनसागर जवळ आशिया खंडातील सर्वात मोठे बुद्धा थीम पार्क उभारले आहे. ‘बुध्दवनम’ असे या प्रोजेक्टचे नाव ठेवण्यात आले असून त्याचे काही छायाचित्र बौद्ध इतिहास अभ्यासक अनिल जगताप यांनी काढलेले आहेत.
आंध्र- ज्या साम्राज्याची ओळख मातृसत्ताक होती. ज्या साम्राज्याचे घोडे तिनही समुद्राचे पाणी पित होते, ज्या साम्राज्याची सत्ता समुद्र व भूभाग यांचेवर होती, ज्या साम्राज्याने बौध्द धम्माच्या प्रसार व प्रचारासाठी दगडामध्ये हजारो लेण्या कोरुन तथागतांच्या धम्माची महती जनमानसामध्ये हजारो वर्षे राहिल याचा विचार करुन धम्म अमर, अमृत केला ते साम्राज्य म्हणजे आंध्र सातवाहन साम्राज्य होय. प्राचिन भारतातील उत्तरेकडील बलाढ्य मौर्य साम्राज्याचे मध्य व दक्षिण भारतातील मांडलिक राजे म्हणजे आंध्रचे सातवाहन होते. उत्तरेकडे मौर्याचा पाडाव झाल्यानंतर सातवाहनांनी दक्षिण प्रांतामध्ये आपले साम्राज्य वाढविले. मौर्याप्रमाणे त्यांनी बौध्द धम्मास राजाश्रय दिला.

आंध्र सातवाहन राज्यकर्ते हे बौध्दधम्मीय होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातपुडा, सातमाळा, अजंठा, सह्याद्रीच्या रांगांमध्ये बौध्द धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी बौध्द लेण्या, संघाराम उभारले. आंध्र प्रदेश मधील विषाखापट्टण, गुंटूर, अमरावती, जग्गयपेठ, अल्लरु, गुडीवाडा, घंटाशाला, गुटापेल्ली, भट्टीप्रोलू, नागार्जुनकौंडा, अनुपू, उंडावेल्ली, चंदावरम, नडालूरु, इरागूडी, श्रीकाकूलम, रामतिर्थम, कोट्टरु, शंकरम, बाव्हीकोंडा, दंतपूरम, गोपालपट्टणम अशाप्रकारे अनेक ठिकाणी बौध्द लेण्या, विटांचे व दगडांचे स्तूप, विहारे, संघाराम बांधून बौध्द धम्मास दक्षिणेकडे व दक्षिण पूर्व देशांमध्ये प्रचार व प्रचार करणेकरीता वाट मिळवून दिली आहे.

आंध्रचे सातवाहनांची सत्ता विंद्य पर्वतापासून दक्षिणेकडील तामिळनाडू पर्यत होती. दक्षिण भागावर त्यांचा एकछत्री अंमल होता. प्रतिष्ठाण म्हणजे आताचे पैठण, जून्नर या सुध्दा त्यांच्या प्रांतिक राजधान्या होत्या. नाशिक-त्रिरश्मी, जून्नर-कपिचीत, मावळ-कार्ला, भाजे तसेच औरंगाबाद येथील लेण्यांच्या निर्मितीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. व्यापाराच्या मार्गावर निरनिराळया ठिकाणी पर्वतराजीमध्ये खोदलेल्या लेणी गुंफाचा विदेशी व्यापारासाठी उपयोग होत होता. जमिन व पाण्यावरील वाहतुकीने चौफेर विदेशी व्यापारामुळे त्यांची समृध्दी वाढत होती. दक्षिणेतील सातवाहन काळापासून जावा, सुमात्रा, चंपा, फुनान, सयाम, कंम्बोडिया, बाली, व्हिएटनाम, लाओस, सिरीलंका येथपर्यत व्यापाराबरोबर बौध्द धम्म वाढला गेला. तेथील राजांचा व लोकांचा बौध्दधम्म राजधर्म झाला होता व आजही आहे.

आंध्र सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी हा प्रसिध्द बौध्द आचार्य, दार्शनिक, तर्कशास्त्रज्ञ नागार्जून याचा मित्र होता. येथे बौध्द धम्माचे मोठे केंद्र होते. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील बालाजी हे प्रसिध्द मंदीर हे सुध्दा गौतम बुध्दाचे मंदीर, विहार होते. तिरुपती म्हणजे भगवान गौतम बुध्द. थिरु म्हणजे थेर, भगवान गौतम बुध्दांना विष्णूचा अवतार मानून वैष्णवांनी राजांनी तेथे विष्णूची मूर्ती म्हणून पुजा सुरु केली आहे. भिक्खू, श्रमण संस्कृतीमध्ये फक्त डोक्यावरील केस काढण्याची पध्दत आहे. बौध्द धम्मामध्ये श्रामनेर, उपसंपदा या बौध्द संस्कार विधीमध्ये डोक्यावरील केस काढण्याची पध्दत आहे. बौध्द भिक्खू डोक्यावरील केस ठेवत नाही.

भिक्खू डोक्यावरील केस का कापतात या भिक्खू नागसेनच्या प्रश्नाचे उत्तर देतांना नागसेनचे गुरु स्थविर रोहन सांगतात की, डोक्यावर केस असल्याने सोळा प्रकारचे दोष निर्माण होतात.

1. केस शृंगारावे लागतात
2. तेल लावावे लागते
3. केस धुवावे लागतात
4. अत्तर लावावे लागते
5. सुगंधीत ठेवावे लागतात
6. हिरडा वापरावा लागतो
7. आवळ्याचे तेल लावावे लागते
८ . रंगवावे लागते
9. बांधावे लागातात
१0. कंगव्याने विंचरावे लागतात
11. वेळोवेळी कापावे लागतात
12. मोकळे करावे लागतात
13. केसात उवा पडतात.
14. सावरावे लागतात
15. केस झडू लागल्यानंतर वाईट वाटते.

शरीर सौदर्यासाठी केसाचे उपयोग होतो. दाढी, मिशा व डोक्यावरील केस काढणे हे शरीराबद्दल असत्ती नसल्याचे प्रतिक आहे. केस काढणे हे सुंदरता, त्यागाचे प्रतिक आहे. वैदिक संस्कारामध्ये पिंडदानाचे वेळी फक्त दाढी, मिशा व डोक्यावरील केस काढण्याची पध्दत आहे. तिरुमल भिक्खूच्या स्मरणार्थ बंधलेले ते एक विहार होते. बौध्दकाळी आंध्रप्रदेशात अमरावती, सिरी धान्यकटक, सिरीपर्वत, नागार्जून कोंडा हे बौध्द धम्माचे महत्वाचे केंद्र होते. आंध्रचे सातवाहन व विदर्भातील वाकाटक हे नाग बौध्द राजे होते. त्यांनी गुप्त राजांना साम्राज्य विस्तारासाठी मदत केली होती. नंतर त्यांनी वाकाटक राज्य निर्माण करुन त्यांची सत्ता मध्य भारतापासून आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्रापर्यत वाढविली होती. त्यांनी पाषाणात अनेक शैल्य, लेण्या, विहारे, चैत्य निर्माण केले होते.

भगवान बुध्दांच्या मूर्ती निर्माण होण्यापूर्वी भगवान बुध्दांचे अस्तित्व दाखविण्यासाठी धम्मचक्र, त्यांचे (वज्रासन) आसन, त्यांच्या पायाचे ठसे इत्यादी गोष्टींना भगवान बुध्दांचे प्रतीक समजून आदर दाखविला जात असे. अभय मूद्रेतील मोठी मूर्ती हैद्राबाद येथील लुंबिनी गार्डन, हुसेनसागर येथे मूर्ती उभी केली आहे. आंध्र प्रदेशात थेरवाद, महासांघिक, सर्वास्तिवाद, महीशासक, बहुश्रुतीय, आंध्रक, चैत्यक, शैलक, आणि सम्मितीय शाखांचे अस्तित्व होते. त्याचप्रमाणे महायान आणि त्याच्या सर्व शाखा वज्रायन, मंत्रायन, तंत्रयान इ. चे अस्तित्व होते. तिरुपती बालाजी एक प्राचिन बौध्द क्षेत्र या पुस्तकाचे लेखक डॉ. के. जमनादास यांनी तिरुपती बालाजी बौध्द क्षेत्र असल्याचे अनेक पुरावे दिले आहेत.

सिरीशैल्यम मंदीर – गुंटूर जिल्हा अमरावती येथे डोंगरामध्ये अनेक लेण्या, स्तूप आढळतात. सिरी धान्यकटक आणि सिरीपर्वत हे महान महायानी बौध्दभिक्खू बोधिसत्व नागार्जून याची ही कर्मभूमी आहे. सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी आणि यज्ञश्री यांनी त्यांच्यासाठी सिरीपर्वतात एक महाचैत्य आणि महाविहार बांधला होता. अनेक चिनी यात्रीकरुंनी त्यांचे प्रवासवर्णनामध्ये याचा उल्लेख केला आहे. भिक्खू नागार्जून यांनी महायानातील माध्यमिक तत्वज्ञान येथे लिहिले. भिक्खू नागार्जून यांना द्वितीय बुध्द असेही संबोधले जाते. प्रतित्यसमुत्पाद विषयीचा त्यांचा शुन्यवादाने येथेच जन्म घेतला.

शैल्य हा बौध्द वास्तू स्थापत्याचा एक प्रकार आहे. शैल्याचा वापर भिक्खू व उपासकांच्या ध्यान साधनेसाठी केला जात असे. येथील डोंगरावर हिनयानी पंथाच्या अनेक बौध्दलेण्या आढळून येतात. तेरा मिटर व्यासाचे एक भव्य स्तूप आहे. सिरीशैल्यम मंदिर हे भारतातील बारा ज्योर्तिलींगापैकी एक महत्वाचे मंदिर आहे. सिरीशैलम येथे छत्रपती शिवाजीमहाराज राहिल्याची इतिहासामध्ये नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तेथे मूर्ती व मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म प्राचिन बौध्द लेण्यांचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्हयातील जून्नर तालुक्यातील शिवनेर किल्ल्यावरील एका लेणीमध्ये झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर बौध्द धम्माचा प्रभाव होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनाचा अभ्यास केला असता त्यांच्या जीवनावर बौध्द धम्माचे संस्कार असल्याचे प्रकर्षाने जाणवते. सर्वाचे मंगल हो. कल्याण हो.

लेखक – अनिल जगताप (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Karmabhumi of Buddhist Satavahana Emperors – Andhra Pradesh and Telangana

Buddhist Bharat