असे म्हणतात ज्यांना इतिहास घडवायचा आहे त्यांनी आपला इतिहास विसरू नये.स्वसन्मान चळवळीतील २ मार्च काळाराम मन्दिर प्रवेश दिनानिमित्त या सत्याग्रहाची आठवण म्हणून संक्षिप्त लिहत आहे.
अमेरिकेन राज्य क्रांती १८ व्या शतकात झाली. तेथील विचारवंत थॉमस पेन,जेफर्सन यांच्या विचारातून मानवी स्वातंत्र्याच्या जाहिरनामा प्रसिद्ध झाला. जगातील नागरिकांना आपल्या हक्काची माहिती व अन्याया विरोधात लढण्याचा हक्क आहे याची जाणीव झाली परंतु भारतातील अस्पृश्य समाजाला या जागतिक घडामोडीची काही माहिती नव्हती. २० व्या शतकात भारतात ही जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करून देण्यासाठी चळवळ केली.हिंदू धर्मात अस्पृश्य जातींना स्पर्श करण्यासाठी मज्जाव होता आणि अस्पृश्य समाजाला हजारो वर्षांपासून मानवी हक्कांची जाणीव सुद्धा नव्हती, त्याला वाटायचे की ,सार्वजनिक ठिकाणी पाण्याला स्पर्श करण्याचा हक्क नाही किवा मंदिरात प्रवेश करण्याचा जो हक्क नाही तो आपणास जन्मतः नाही त्यावर आपला हक्क नाहीच कारण आपण अस्पृश्य आहोत अशी मानसिकता होती. त्या साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आधी ही जी मृतप्राय मानसिकता होती ती नष्ट करण्यासाठी जागृती करावी लागली, थोडक्यात मेलेल्या माणसाला जिवंत करावे लागले. क्रांतीची दिशा त्यांनीं निश्चित केली होती .त्या साठी सर्वात आधी त्यांनी दिनांक १९ व २० मार्च १९२० ला महाड येथे चवदार तळ्याचे आंदोलन केले, त्यावेळी डॉ. बाबासाहेब म्हणाले,” स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात ते स्व- सामर्थ्याने मिळवायचे असतात देणगी म्हणून लाभत नाही “
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाड येथिल अस्पृशांच्या पाण्याच्या स्पर्शाच्या आंदोलना नंतर मंदीर प्रवेश आंदोलनाचा दुसरा टप्पा होता.पुणे येथे १३ ऑक्टोबर १९२९ ला पर्वती मंदिर,अमरावतीत अंबादेवी मंदिर सत्याग्रह इत्यादी ठिकाणी सत्याग्रह झाले परंतु नाशिक येथील काळाराम मंदिर आंदोलन हे ऐतिहासिक ठरले.
नाशिक येथे सुप्रसिद्ध असे पंचवटी भागात काळाराम मंदिर आहे. वनवासात असतांना राम जेथे राहिले त्याच जाग्यावर हे मंदिर बांधले आहे ,अशी भाविकांची श्रद्धा आहे.येथे रामाची सोन्याची मूर्ती आहे. मंदिरात रथ आहे. दर रामनवमीला लाखो भाविक जमतात व रथ यात्रा शहरात काढली जाते.
१९२९ मध्ये मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेश आंदोलनाची योजना आखली .नाशिकच्या आंदोलनासाठी समिती स्थापन केली मंदिर प्रवेश समितीचे अध्यक्ष पतितपावनदास, सचिव कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि इतर १० सदस्य होते.
समितीने खेडोपाडी जाऊन महाराष्ट्रभर प्रचार केला होता.ठरल्याप्रमाणे २ मार्च १९३० ला कोकण,विदर्भ,मराठवाडा आणि कर्नाटकातील अस्पृश्य सुद्धा हजारो च्या संख्येने नाशिक मधे जमा झाले.
नाशिक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आर .जी. गार्डन यांनी आठ हजार महार लोक नाशिकच्या महारवाड्यात जमा झाल्याचे आपल्या वरिष्ठ आयुक्तांना कळविले होते.अस्पृशांनी काढलेली जंगी मिरवणूक शांततेने पार पडल्याचेही गार्डनने कळविले होते.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या पंच कमेटिला समितीने अर्ज देऊन मंदिर प्रवेशासाठी विनंती केली होती परंतु
पुजारयांनी विरोध दर्शविला .मंदिरांचे सर्व दरवाजे बंद करुन ठेवल्याने सत्याग्रही प्रवेश करू शकले नाही .म्हणून सुमारे १५ हजार अस्पृशांची जंगी जाहीर सभा झाली .सर्व म्हणजे १५ हजार स्त्याग्रहींना दररोज जेवणाची व्यवस्था आयोजक नाशिककर करीत असत.
पुढील रणनीती ठरविण्यात आली.
कलेक्टरने भादवी कलम १४४ लागू करून ३ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये व मंदिर प्रवेश करू नये असा हुकूम जारी केला होता.
कलेक्टर गार्डनने वरिष्ठांना कळविले की ,
‘डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तीनशे सत्याग्रह्यांचे पथक होते. जोपर्यंत देवळाचे दरवाजे बंद आहेत तोपर्यंत सत्याग्रही दरवाजाजवळ ठाण मांडून बसतील असे डॉ. आंबेडकरांनी मला सांगितले. कोणी दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न केला तर रांगेत जो पहिला त्याने आधी जावे. या नियमानुसार सत्याग्रही आपल्या आधी देवळात शिरू पाहणाऱ्या इसमास प्रतिबंध करतील आणि शांततापूर्ण रीतीने घुसतील असेही ते म्हणाले. इतरांना रोखणे आणि त्यांना मंदिरात जाऊ न देणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होत नाही काय असे मी म्हणताच तसे करणे म्हणजे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा करणे होय हे त्यांनी मान्य केले. मी भारतीय दंडसंहितेच्या १४४ कलमाखाली हुकूम दिला आणि महारांना तेथे बसण्यास मनाई केली तर काय कराल असे मी डॉ. आंबेडकरांना विचारले तेव्हा आपण व आपले सहकारी असा हुकूम पाळणार नाही असे ते म्हणाले.”
या वरून न्याय हक्का साठी कायद्याची भीती बाळगायची नाही असाच निर्धार दिसून येतो.
मंदिराच्या चारही दरवाजावर रात्री ११ वाजे पर्यन्त सुध्दा सत्याग्रही बसले होते.१२५ पुरुष व २५ स्त्रियां होत्या ते नियोजन डॉ. बाबासाहेबांनी करून दिले होते.जसाही दरवाजा उघडल्या जाईल तसाच प्रवेश करायचा असे त्यांना सांगण्यात आले होते.
दरवाजे उघडले जात नव्हते.अशातच एप्रिल १९३० ला रामनवमी आली. त्या दिवशी स्पृश्य व अस्पृश्य दोन्हीही बाजूचे लोक राम रथ शहरात ओढण्याची जुनी प्रथा होती .परंतु अस्पृशांना कळू नये अशा रीतीने रथ बाहेर काढण्यात आला .प्रथे प्रमाणे अस्पृशांनी रामरथास स्पर्श करताच विरोध झाला. जबर हाणामारी सुरू झाली. हाणामारीचे रुपांतर प्रचंड दंगलीत झाले. तेथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.दगडफेकीत त्यांना मार लागू नये म्हणून अस्पृश्य स्वयंसेवक छत्री घेऊन कडे करून होते.तरी त्यांनाही जखमा झाल्या.
हजारो आंदोलक होते.
रात्रीची रणनीती वेगळी होती.
मंदिराच्या चारही दरवाजावर रात्री सुध्दा सत्याग्रही बसले होते. पुरुष व स्त्रियां होत्या
दबा धरून संधी शोधत होते .दरवाजा उघडताच प्रवेश करायचा अशी योजना होती.
परंतुदरवाजे उघडले जात नव्हते
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन थांबवावे असे ब्रिटिश अधिकाऱ्यां कडून प्रयत्न सुरू होते परंतु त्यांनी आंदोलन मागे घेतले नाही. अशातच बाबासाहेबांना गोलमेज परिषदे साठी लंडनला जावे लागले. आंदोलनाची जबाबदारी नाशिकच्या दादासाहेब उर्फ भाऊराव गायकवाड आणि कार्यकर्त्यांनी सांभाळली.
गावोगावी सभा आयोजित केल्या होत्या.
२५ ऑक्टोबर १९३१ ला मुंबईत अस्पृश्य स्त्रियांची सभा झाली .त्या सभेला माता रमाबाई आंबेडकर हजर होत्या. नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाला सभेत पाठींबा देण्याचा ठराव मंजूर केला.३१ ऑक्टोबर १९३१ च्या जनता पत्रात ही बातमी प्रकाशित झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेल्यावर खुद्द रमाईने चळवळीत भाग घेतला .या वृत्तांने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्फुरण आले.दिनांक ६ नोव्हेंबर १९३१ ला अस्पृश्य सत्याग्रही सीताराम काळू हाटे यांनी अचानक मंदिरात प्रवेश केला व डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय चा जयजयकार करू लागले तोच सनातनी गडबडले.पोलिसांनी सीताराम हाटे यांना ताब्यात घेतले. दरवाजा उघडताच आंदोलक प्रवेश करायचे त्यांना पोलीस अटक करायचे. सत्याग्रहीना अटक करून नेले लोकांना १ महिना तुरुंगावासाची शिक्षा दिली.
काळाराम मन्दिर परिसराला पंचवटी म्हणतात तेथे रामकुंड आहे .तेथे भाविक पवित्र्यासाठी स्नान करतात परन्तु अस्पृशांना स्नान करण्यासाठी मनाई होती.सत्याग्रही अस्पृश्य स्नान करतील म्हणून कडेकोट बंदोबस्त होता परंतु शंकर श्रावण गायकवाड बेलमास्टर या आंदोलकांनी ,”डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय “म्हणत रामकुंडात उडी घेतली.सनातनी खवळले ,त्याला लाथा बुक्यांनी झोडपले. त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होते.सनातनी मारत होते. शंकर श्रावण गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली .न्यायालयाने त्यांना ७ दिवसाची तुरुंगाची शिक्षा दिली
या देशाच्या इतिहासात शेकडो वर्षांपासून पहिल्यांदा सीताराम हाटे या अस्पृश्य व्यक्तीने पहिल्यांदा मंदिर प्रवेश केला, शंकर श्रावण गायकवाड या अस्पृश्य व्यक्तीने शेकडो वर्षानंतर रामकुंडात उडी घेतली.
तेही स्पृश्य किंवा सनातनी लोकांचा कडवा विरोध पत्करून.
मन्दिर प्रवेश करून !
काळाराम मन्दिर आंदोलन सतत ५ वर्ष सुरू होते.शेकडो आंदोलकांना तुरुंगात ठेवले होते. त्यांना शिक्षा
झाली होती.(विस्तार भयासत्व अधिक लिहू शकत नाही)
५ वर्ष सत्याग्रह होता.
त्यावेळेस अस्पृश्यता पाळने या साठी अट्रोसिटी सारखा कायदा नव्हता.तो हक्क व संरक्षण शेवटी भारतीय स्वातंत्र्या नंतरच मिळाले तेही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून दिले .
मंदिरात प्रवेश मिळवून काही देव पावनार नव्हता तर माणुसकीचा हक्क प्राप्त करण्यासाठी
हा लढा होता.स्वसन्मान चळवळीचा महत्वाचा टप्पा होता.त्या काळात
आज जी स्वसन्मानाची जाणीव पूर्वाश्रमीच्या समाजाला झाली आहे,
हक्काची जाणीव निर्माण झाली. ती खस्ता खाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन तमाम कार्यकर्ते यांच्या त्याग किंवा समर्पणामुळे झाली आहे. म्हणूनच लाभार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. नाशिक येथिल काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्ताने
सर्व स्त्याग्रहींना विनम्र अभिवादन!
दैनिक बहूजन सौरभ, नागपूर मध्ये दिनांक १ मार्च २०२२ ला प्रकाशित लेख
काळाराम मंदिर सत्याग्रह.
आंदोलकांना अभिवादन!
अनिल वैद्य माजी न्यायाधीश
९६५७७५८५५५
More Stories
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न काय होते ? ते पूर्ण झाले का ?
भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर की बी.एन. राव – ऐतिहासिक सत्याचे सखोल विश्लेषण Dr. Babasaheb Ambedkar or B.N. Rao – An in-depth analysis of historical truth
बौद्ध अतिरेकीपणाचा धोकादायक उदय: ‘निर्वाण प्राप्त करण्यासाठी वाट पाहावी लागू शकते