November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळानिश्चितीसाठी ‘या’ सदस्यांची समिती नियुक्त

दादरच्या इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये १०० फूट उंचीची पादपीठाची इमारत उभारण्यात येणार आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा बसविण्यात येणार आहे. स्मारकाच्या इमारतीचे ८० फुटांपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पुतळा उभारणीचे काम सुरु होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१५ मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. पण, प्रत्यक्षात फेब्रुवारी २०१८ मध्ये या स्मारकाच्या कामाला सुरवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राज्य सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे या स्मारकाच्या कामाला वेग देऊन पुतळ्याच्या मंजुरीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी आंबेडकर जनतेमधून होत होती. अखेर, राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा निश्चित करण्यासाठी समिती नेमली. या समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार पुतळाच्या प्रतिकृतीला मंजुरी देईल आणि त्यानंतर हे रखडलेले काम पूर्णत्वास येणार आहे.

यापूर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुतळ्यासंदर्भात काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आता सरकार जाताच नव्याने पुतळ्याच्या उंची आणि तो कसा असावा या संदर्भात नव्याने समिती स्थापन करण्यात आली आहे.

समितीत या सदस्यांचा समावेशः

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, सुलेखा कुंभारे यांच्यासह आमदार भाई गिरकर, यामिनी जाधव, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेन्द्र कवाडे, भारतीय बौद्ध महासभेचे भिमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजेंद्र गवई, बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत आणि सामाजिक कार्यकर्ता चंद्रकांत भिवा भंडारे यांचा या समितीत समावेश आहे.

दादर येथील इंदू मिलच्या १२ एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येत असून सुमारे ४५० फूट उंचीचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य-दिव्य असा पुतळा उभारला जाणार आहे. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राज्य सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे पुतळा निश्चितीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंदू मिल येथे एक बैठक नुकतीच घेण्यात आली होती. या बैठकीत लोकप्रतिनिधी तसेच समाजातील मान्यवर व्यक्ती यांनी पुतळ्याची प्रतिकृती पाहून पुतळा अंतिम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही समिती नेमण्यात आली.

Indumil Memorial Committee of Members Appointed | इंदूमिल स्मारक सदस्यांची समिती नियुक्त