November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

पौर्णिमा कशी साजरी करावी – आयु.मिलिंद बनसोडे

दिनांक 22 ऑगस्ट 2021 ( रविवार )वर्षावासातील 2 री पौर्णिमा श्रावण पौर्णिमा आहे

 पौर्णिमा कशी साजरी करावी

1)परिवरातील सर्व सदस्यांनी पहाटे लवकर उठून स्नान करावे व शुभ्रवस्त्रे परिधान करावे.

2)आपल्या घरातील हॉलमध्ये पुजास्थानाची मांडणी करावी.त्यावर तथागत भगवान बुध्द व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवावे. पुजास्थान आकर्षकरीत्या पुष्प, धुप व दिप लावून सजवावे. व पुजास्थाना समोर बसून 10 मिनिटे आनापान करावे.

3)पौर्णिमा असल्याने घरातील लहान मुले वगळून तरुण युवक युवती, पुरुष व स्त्रियांनी एकत्रीत त्रिसरणा सह अष्टशील एकाचवेळी सर्वानी ग्रहण करावे. जर त्रिसरण व अष्टशील पाठांतर नसेल तर बुध्द वंदनेच्या पुस्तकातून पाहून म्हणावे. त्यानंतर बुध्दपुजा, भिमस्मरण, भिमस्तुती, त्रिरत्न वंदना, संकल्पगाथा, परित्राणपाठ, धम्मपालनगाथा व सरणंत्तय घ्यावे.व नंतर सर्वाना मंगलमैत्री द्यावी.

4)सकाळचा चहा व नाश्ता सोबतच सर्वानी करून बुध्दविहारात जाण्याची तयारी करावी.त्यानंतर महिलांनी लगेचच भिक्खू संघासाठी शुद्ध व सात्विक प्रकारचे भोजन व आपल्या परिवरातील सर्वासाठी भोजन तयार करावे.बुध्द विहारात सकाळी 10 भोजनासह पुजेचे साहित्य, पुष्प, मेणबत्ती,अगरबत्ती, फळे सोबतच घेवून वेळेत पोहचावे.

5)बुध्द विहारात पोहचल्यावर सर्वप्रथम सर्वानी एकत्रित तथागत भगवान बुध्द व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक व्हावे. त्रिवार पंचाग प्रणाम करावा. नंतर उपस्थित भिक्खूला अश्याच प्रकारे अभिवादन करावे. व आपण भिक्खू संघासाठी आणलेल्या भोजनदानाचा स्विकारा करण्याची विनंती करावी.
6)भन्तेजीना बसन्यासाठी आसन टाकून द्यावे. भन्तेजीना जागेवरच हात धुन्यासाठी पाणी द्यावे. हात पुसन्यासाठी टॉवेल द्यावा. नंतर परिवारातील प्रसन्न भावनेने सर्वानी एकत्र गुडग्यावर बसून हातात भोजनाची प्लेट घेवून भन्तेजीच्या हाती द्यावी.त्यावेळी भन्तेजी भोजनदान गाथा म्हणतिल आपण मागे म्हणावी. नंतर पंचाग प्रणाम करावा. व शांतपणे भन्तेजीच्या समोर भन्तेजीचे भोजन होईपर्यंत बसून रहावे. परिवारातील फक्त एकाच सदस्याने भन्तेजीना भोजन वाढावे.भन्तेजीना वारंवार भोजन घेण्याचा आग्रह करू नये. त्यावेळी आपण मौन ठेवूनच जे संपले असेल व भन्तेजीना आवश्यक असेल ते देणे.

7)भन्तेजीचे भोजन झाल्यावर भन्तेजीसमोर बसून परिवाराने आशिर्वादपर धम्मदेसना श्रवण करावी.नंतर भन्तेजीना यथाशक्ती आर्थिकदान,फलाहारदान,अष्टपुरस्कारदान,औषधीदान व दैनंदिन वापरातील वस्तुचे दान करावे.नंतर बुध्द विहाराच्या दान पेटीत न विसरता दान टाकावे.

8)त्यानंतर आपण परिवारातील सर्व सदस्यांनी व बुध्द विहारात उपस्थित इतर धम्म बंधु भगिनी एकत्रीत भोजन करावे. भोजनानंतर बुध्दविहाराची साफसफाई करून स्वच्छता करणे.घरी गेल्यावर उद्या सकाळ पर्यंत आठशिलाचे कसोशिने पालन करणे. घरी निवासस्थानी पुन्हा सायंकाळी बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथ किंवा इतर धम्म ग्रंथाचे वाचन करणे.व आपल्या शेजारील लोकांना ख़िरदान करावे.

अश्या प्रकारे प्रत्येक बौध्द उपासक उपासिकांनी पौर्णिमे च्या दिवशी काया, वाचा व मनाने धम्म आचरण करणे अपेक्षित आहे.तरच प्रत्यक्ष धम्म आचरण करण्याचे सर्व लाभ आपल्या स्वतःला व परिवाराला मिळतील.प्रत्येक बौध्दराष्ट्रामध्ये अश्याच रीतीने प्रत्येक पौर्णिमेला ध्यानसाधना, बुध्द वंदना, भिक्खू संघाला भोजनदान, आर्थिकदान, चिवरदान करून पुण्यकर्म केले जाते. हीच खरी धम्मसंस्कृति आहे त्यामुळे आपण देखील या पौर्णिमेला वरील कुशलकर्म करण्याचा सम्यक संकल्प अवश्य करावा.

आयु.मिलिंद बनसोडे
(बौद्धाचार्य)
मो.9960320063