मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या दृष्टीने सदाचारी अथवा सुसंस्कारीत समाज निर्माण करता येतो. सुसंस्कारीत समाजाची निर्मिती म्हणजे पर्यायाने मानवी उत्कर्ष होय. कारण त्या नीतीतत्वाची समाजातील व्यक्ती, व्यक्तीमधील व्यवहार सुखकर करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून त्या नीतीतत्वाची सर्व मानवी समाजाला ओळख होणे गरजेचे आहे. त्या तत्वाची ओळख झाली तरच मानवी समाज त्याचा स्वीकार करेल. त्याचा स्वीकार केल्याने समाजात सकारात्मक असा बदल आपणास दिसून येईल. सर्व मानव अकुशल कार्यापासून उदा. हिंसा, चोरी, व्यभिचार, खोटे बोलणे, मद्यपान इत्यादी पासून दूर राहतील. पर्यायाने सुसंस्कारीत मानवी समाज निर्माण होईल. तथागत बुद्धांनी तत्कालीन परिस्थितीचा विचार करून अशा प्रकारची नीतीतत्वे समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर बुद्धाला मानवी समाजाला नीतीतत्वे देण्याची अथवा त्यामध्ये रुजविण्याची गरज भासली. आजही त्या नीतीतत्वाची मानवी जीवनात आवश्यकता आहे. कारण की आज प्रत्येक मानव भौतिक सुखाच्या मागे धावत आहे. त्यामुळे अनेक अकुशल कार्ये तो करतो. त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी मैत्री भावनेसारख्या नीतीमूल्यांची गरज आहे. हे मूल्य समाजामध्ये रुजविणे आज काळाची गरज आहे. कारण सध्या अन्याय, अत्याचार, व्यभिचार, हिंसाचार, मद्यपान, भ्रष्टाचार, सांप्रदायिकता, प्रादेशिकवाद, दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याला पायबंद घालण्यासाठी मैत्री भावना उपयुक्त ठरते.
मानवी समाजात सद्भाव अथवा सलोखा निर्माण करणारी मेत्ताभावना आहे. मैत्री ही मानवाची एक मनोवृत्ती आहे. या मनोवृत्तीद्वारे समाजात बंधुता आणि जागतिक स्तरावर विश्वबंधुता प्रस्थापित करता येते. कारण मैत्रीभावामध्ये वैर आणि शत्रू नावाची गोष्ट नसते. म्हणजे व्यक्ती-व्यक्तीतील द्वेष भावना संपुष्टात आणून त्याठिकाणी मैत्रीभाव विकसित केला जातो अर्थात जर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती बरोबर सदाचरण आणि नम्रतापूर्वक आचरण केले तर मैत्रीभाव निर्माण होतो. हा मैत्रीभाव त्या व्यक्तीच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी अथवा उत्कर्षासाठी उपयुक्त ठरतो. अर्थात यावरून आपल्याला असे लक्षात येते की, मैत्रीचा उदय नम्रतायुक्त आचरणातून होतो. म्हणून नम्रता आणि मैत्रीचा संबंध अतूट आहे. जर व्यक्तीचे आचरण नम्रतायुक्त नसेल तर त्यामध्ये मैत्रीभाव निर्माण होणार नाही आणि मैत्रीभाव निर्माण झाला नाही तर बंधुता प्रस्थापित होणार नाही. अर्थात समाजात संघर्ष अथवा द्वेष भावनेचे वातावरण तयार होऊन त्याची फलश्रृती कलहामध्ये होईल, हा कलह समाजाच्या आणि देशाच्या विनाशाचे कारण ठरेल. म्हणून मैत्रीभाव किती महत्त्वाचा आहे, यावरून आपल्या लक्षात येते.
आज आपण सामाजिक परिस्थितीचे अवलोकन केले तर समाजात सांप्रदायिकता, अराजकता, जातीयता, वर्णभेद, वंशभेद प्रचंड प्रमाणात वाढला आहे. एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्माला कनिष्ठ समजतात, एका जातीचे लोक दुसऱ्या जातीला कनिष्ठ समजतात. अशी उच्च-कनिष्ठतेची भावना आज आधुनिक युगात समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जडत चालली आहे. याचे कारण की, समाजातील मैत्री भावना नष्ट झाली आहे. ही मैत्री भावना आज समाजात रुजविणे काळाची गरज बनली आहे. कारण की बुद्धकालीन सामाजिक परिस्थितीतसुद्धा अशाच प्रकारची अराजकता निर्माण झाली होती. म्हणून तर बुद्धांनी आपल्या उपदेशामधून मैत्री तत्व रुजविल्याचे आपणांस दिसून येते. एवढेच नव्हे तर मैत्री या नीतीतत्वाला बुद्धतत्वज्ञानातील चार ब्रह्मविहारात प्रथम स्थान दिले आहे. कारण मैत्री शिवाय करुणा आणि मुदिताचा उदय शक्य नाही. त्याचप्रमाणे जिथे मैत्री नाही तिथे उपेक्षाभावही नाही. त्यामुळे चार ब्रह्मविहारामध्ये मैत्रीला प्रथम स्थान अथवा अग्रस्थान दिले आहे.
कोणत्याही प्रकारे सर्व प्राणिमात्रांविषयी मनात आत्यंतिक आणि निस्सीम प्रेम उत्पन्न करणे हा या भावनेचा मुख्य मुद्दा आहे. ज्याला आपल्यापासूनच भावनेने सुरुवात केली असता मैत्री साधणे सुलभ जाते, त्याने तसे करावे. मात्र, ज्याने नुकताच मैत्रीला आरंभ केला असेल, त्याने एकदम शत्रूवर मैत्रीची भावना करू नये. त्याचप्रमाणे विसदृश्य व्यक्तीवर आणि मृतावर भावनेला आरंभ करू नये. आरंभी शत्रूवर प्रेम करण्याचा प्रयत्न केला असता चित्ताला आघात पोहचतो व शत्रूचे अपराध अधिकाधिक डोळ्यासमोर येऊ लागल्यामुळे मन उद्विग्न होऊन जाते. स्त्रीने पुरुषावर किंवा पुरुषाने स्त्रीवर मैत्री भावनेला आरंभ केला असता चित्तात कामविकार उत्पन्न होऊन समाधीला भयंकर विघ्न करतो. मृतावर मैत्री भावनेला आरंभ केला तर समाधी साध्यच होत नाही. तेव्हा अशा रीतीने आरंभ न करता प्रथमतः स्वतःवर किंवा सदृश्य दोस्त माणसांवर आरंभ करून मग शत्रूवरही मैत्री करण्यास शिकावे. नंतर या गावचे लोक सुखी होवोत, नंतर या देशातील, नंतर सर्व पृथ्वीवरील लोक सुखी होवोत, असा विचार करावा. नंतर सर्व स्त्री जाती सुखी होवो, नंतर सर्व पुरुष जाती सुखी होवो, आर्य सुखी होवोत, अनार्य सुखी होवोत, देव सुखी होवोत, दुर्गतीला गेलेले प्राणी सुखी होवोत, सर्व दिशांना सर्वत्र सर्व प्राणी सुखी होवोत, अशा पद्धतीने हळूहळू सर्व प्राणिमात्रांवर अगाध प्रेम करण्यास शिकावे. जेणेकरून चित्तातील कामक्रोध दबून जातात आणि मन एकाग्र होते, असे आचार्य धर्मानंद कोसंबी विभंग व विशुद्धमार्गाच्या आधारावर आपले मत व्यक्त करतात. अशा पद्धतीने मानवी मनात मैत्री भावना विकसित करता येते. त्या भावनेचा स्वतः व्यक्तीला, समाजाला आणि देशालाच नव्हे तर जगाला फायदा होतो म्हणून मैत्री भाव मानवी जीवन सुखकर बनविण्यासाठी फलदायी आहे, यात तिळमात्र शंका नाही.
मैत्रीभावापासून व्यक्तीला अनेक फायदे होतात. मैत्री भावना ही चित्ताला विमुक्त करणारी असून मैत्री भावनेच्या अनुकूल आचरण करणाऱ्याला फायदे होतात उदा.
१) सुखं सुपति (सुखाने झोपून उठतो)
२) न पापकं सुपिनं पस्सति (वाईट स्वप्ने पाहत नाही)
३) मनुस्सानं पियो होति (तो सर्व लोकांना आवडतो)
४) अमनुस्सानं पियो होति (मनुष्याशिवाय इतरांनाही प्रिय होतो)
५) देवता तं रक्खति (देवता त्याची रक्षा करतात)
६) नास्स अग्गि वा विसं वा सत्थं वा समाधियति (आग, विष आणि शस्त्र त्यावर परिणाम करीत नाहीत तो लवकर समाधीस्त होतो)
७) तुवट्ठं चित्तं समाधियति (त्याचे चित्त लवकरच एकाग्र होते)
८) मुख वण्णो विप्प सीयति (तो सर्वांगाने प्रसन्न राहतो))
९) असम्मूल्हो कालं करोति (भयभीत न होता तो मृत्यूला सामोरे जातो)
१०) उत्तरि अप्प हि विज्झन्तो ब्रह्म लोकूपगो होति (तो अर्हत पदापर्यंत जरी पोहचू शकला नाही, तरी ब्रह्मलोकांत तो अवश्य जन्म ग्रहण करतो)
ब्रह्मलोक म्हणजे चित्ताची सदोदित आनंदी अवस्था होय.
अशा प्रकारे मैत्री भावनेचे फायदे आपणांस दिसून येतात. जग बदलायचे असेल तर अगोदर आपण स्वतः बदलले पाहिजे, या विचाराप्रमाणे जर व्यक्तीने मैत्रीभावपूर्वक वर्तन केले तर समाजामध्ये नक्कीच कुशल असा बदल आपण घडवून आणू शकतो. म्हणून गरज आहे आपण बदलण्याची. आपल्यामध्ये मैत्री भावना निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कारण आज आपण एवढे गुरफटून गेलो की, एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा विसरलो. त्यामुळे समाजात संघर्ष, असहकार फार मोठ्या प्रमाणात जडत चालला आहे. एवढेच नव्हे तर संकटकाळी एकमेकांना मदत करा, असे सांगावे लागते. यावरून आज समाजात मैत्री भावनेचा किती ऱ्हास झाला ते दिसून येते. म्हणून मानवी उत्कर्ष साधण्यासाठी पाली साहित्यातील मैत्री नीतीतत्व समाजात रुजविणे काळाची गरज आहे. हे तत्व रुजविण्यासाठी पाली साहित्यातील चरियापिटक मधील सुवण्ण सामचरिया, एक राजचरिया सहाय्यभूत ठरते. तसेच जातक कथातील साम जातक आणि एकराज जातक आदींचा प्रचार-प्रसार करून समाजात मैत्री भावनेची मनोवृत्ती जागविता येईल. कारण चरियापिटकातील चरिया व जातक कथेतील जातक ह्या जरी काल्पनिक वाटत असल्या तरी त्यात सर्व प्राणिमात्रांविषयी व शत्रूविषयी मैत्रीभाव बाळगावा, हे सांगितले आहे. एक राज जातक कथेत बोधीसत्व मृगराजाला मारण्यासाठी आलेला वाराणसीचा राजा ज्यावेळी चिखलात फसतो, त्यावेळी बोधीसत्व मृगराज त्याला मदत करून चिखलातून बाहेर काढतो. अशी ही काल्पनिक कथा वाटत असली तरीसुद्धा मदत करावी. त्यामुळे मैत्री भावना वृद्धिंगत होते. अर्थात मृगराजाला मारण्यासाठी आलेल्या राजाविषयी कसल्याच प्रकारचा पूर्वग्रह दूषित न राहता मृगराजाने त्याला मैत्री भावनेतून मदत केल्याचे आपणांस दिसून येते.
आज समाजाचा विचार केला तर अनेक घटना घडत असताना दिसतात. परंतु पूर्वाग्रह दूषितपणातून मदत न करता त्याला आणखी संकटात ढकलण्याचे कार्य एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती बरोबर व्यवहार करते. त्यामुळे वैराने वैर वाढत जाऊन त्याचे रुपांतर हिंसेमध्ये होताना आपण पाहतो. म्हणून ही समाजातील वृत्ती बदलण्यासाठी एकराज जातक कथेची समाजाला ओळख करून द्यावी. त्यामुळे समाजात सलोख्याचे अथवा बंधुभावाचे संबंध प्रस्थापित होतील. तसेच शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होऊन विकासास हातभार लागेल. एवढेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय संबंध सुखकर होतील. पर्यायाने युद्धाला आळा बसेल. या सर्व बाबींसाठी मैत्री नीतीतत्वाचे महत्व आपणांस सांगता येते. त्याचबरोबर परिस्थितीमध्ये पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी मैत्री भावना उपयुक्त ठरते. कारण त्यातूनच करुणावृत्तीचा उदय होतो. त्यामुळे व्यक्ती पशुपक्षांविषयी अथवा प्राणिमात्रांविषयी दया बाळगतो. जे की, सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्यापूर्वी हंस पक्षाच्या शरीरात रुतलेला बाण काढून त्याची शुश्रुषा केली आणि त्यांनी आपला विचार लवादापुढे मांडून हंस पक्षावर मालकी हक्क प्राप्त केला. त्याला तंदुरुस्त करून जीवदान दिले. अर्थात या ठिकाणी सांगण्याचे तात्पर्य हे की, सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्यापूर्वीसुद्धा त्यांच्यामध्ये पशू-पक्ष्यांविषयी करुणावृत्ती इतकी होती की, आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्ष्याचा जीव वाचविणे त्यांनी अधिक पसंत केले. अशी करुणावृत्ती समाजात वृद्धिंगत झाली तर निश्चितच पर्यावरणाचे संतुलन साधले जाईल. अर्थातच मैत्री भावनेशिवाय करुणा निर्माण होत नाही आणि करुणावृत्ती शिवाय पर्यावरण संतुलन साधता येत नाही. म्हणून त्यासाठी मैत्री भावना महत्वाची आहे. थोडक्यात मैत्री भावनेचे महत्व अथवा फायदे असे आपणाला सांगता येतील की, सामाजिक सहकार्याची भावना निर्माण होऊन समाजात सद्भाव वृद्धिंगत होतो. त्याचबरोबर लोकशाहीचे प्राणतत्व बंधुता प्रस्थापित होऊन स्नेहभावना संपुष्टात येते व त्याठिकाणी मैत्री भावना विकास पावते. तसेच सतत मैत्री भावनेमुळे रक्तदाब किंवा ह्रदयविकार न होता शरीर नेहमी निरोगी राहते आणि निरोगी शरीरात करुणा आणि मुदिता वास करीत असते.
◼️◼️◼️
लेखक : डॉ. बालाजी गव्हाळे
(सौजन्य : दैनिक सम्राट मंगळवार, दि. २५ मे २०२१)
संकलन/टंकलेखक : ना. पां. जाधव
मो. ८७९३८३९४८८
More Stories
पुढील पिढी बौद्ध का घडत नाही ?
बुध्द विहार आचारसंहिता… Adv Shankar Sagore.
तथागताचे अंतिम भोजन – राहुल खरे