September 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

चार आर्यसत्य

चार आर्यसत्य हा बौद्ध धम्माचा पाया होय. साधारणतः २५७५ वर्षापूर्वी बनारस जवळील सारनाथ (ईशान्य भारत) येथे बुद्धांनी पहिला धम्मसंदेश आपल्या पाच शिष्यास दिला होता. व त्यावेळी चार आर्यसत्य सांगितली होती —

  1. जगात दुःख आहे.
  2. त्या दुःखाला कारण आहे.
  3. हे कारण म्हणजे तृष्णा (वासना) होय.
  4. वासना नियंत्रित करणे हा दुःख निवारण्याचा उपाय / मार्ग आहे.

पहिले आर्यसत्य – दुःख

दुःख तथा विफलता दैनंदिन जीवनातील प्रश्नांशी निगडीत आहे. जन्म, वृद्धत्व, आजार, मृत्यू, क्लेष आणि सर्वप्रकारचे वैफल्य म्हणजे दुःख होय. अनावश्यक वस्तूची प्राप्ती तथा आवश्यक वस्तूची अप्राप्ती म्हणजे दुःख होय.

दुसरे आर्यसत्य – दुःखाचे मूळ

बुद्धांनी दुःखाच्या उगमस्थीनाविषयी सांगितले आहे की, प्रत्येक दुःखाच्या मूळाशी उत्कट इच्छा असते. त्याचा परिनाम म्हणजे अज्ञान व भ्रांती होय. उत्कट इच्छा आनंद प्राप्तीकरिता, अस्तित्वाकरिता किंवा आत्मनाशाकरिता असू शकते.

आपली तीव्र इच्छा ( तृष्णा, वासना, आवड, पसंती ) हिच दुःखाचे मूळ कारण होय. उदा. महेशला मोटारकार हवी आहे. तो त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो. १५, १६ तास अविशांत काम करतो, पैसा मिळवतो. अतिरिक्त श्रम केल्याने तो आजारी पडतो. त्याला दुःख होते. यावरून तीव्र इच्छा ही मूळ दुःखाचे कारण आहे. सामान्य माणसाने आहे त्यात आनंद मानून जीवन प्रवाह चालू ठेवावा. म्हणजे गरीबच राहावे असे नाही तर मध्यम मार्गाचा अवलंब करून संयमाने आपल्या उन्नती वा प्रगतीसाठी प्रयत्न करावे.

तिसरे आर्यसत्य – दुःख निवारण

बौद्ध धम्माचा मूळ उद्देश आहे तो दुःख निरोध वा दुःख निवारण. लोभ, द्वेष व भ्रम यांचा नाश करणे हा मूळ हेतू आहे. जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्वाण घेईल त्यावेळी शाश्वत आनंत प्राप्त होतो. लोभ, द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे व तो आचारणात आणला पाहिजे. अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास तृष्णा क्षीण होते व मनुष्यात दुःखापासून मूक्ती मिळते.

चौर्थ आर्यसत्य – दुःख निवारण्याचा मार्ग

बुद्ध धम्म जीवनाचा मार्ग दर्शवतो. धम्म म्हणजे नीति होय. नीतिचा विकास म्हणजे दुःख निरोध होय. नीति आचरणात आणल्यास मनुष्य निश्चित उद्धिस्टापर्यंत पोहचू शकतो. त्यालाच धम्म शिकवणूकीप्रमाणे अष्टांगिक मार्ग म्हणतात. अष्टांगिक मार्ग म्हणजे आठ घटकांचा मार्ग आहे. यास मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. तो पुढिलप्रमाणे —

  1. सम्यक दृष्टी
  2. सम्यक संकल्प
  3. सम्यक वाणी
  4. सम्यक कर्म
  5. सम्यक उपजीविका
  6. सम्यक व्यायाम
  7. सम्यक स्मृती
  8. सम्यक समाधी

 

जीवनाचा विजय

बौद्ध धर्म असे सांगतो की, कोणत्याही प्रश्नाची उकल शीलाचे पालन आवश्यक आहे. आत्मसंयम (नीति), समाधी (मनसंयम) व प्रज्ञा (ज्ञानवंत) आवश्यक आहेत. म्हणून प्रज्ञा, शील, समाधी ह्या तीन बाबींना धम्मात महत्त्वाचे स्थान आहे. ह्या तीन बाबींवर अष्टांगिक मार्ग आधारित आहे.

काम तृष्णा, भव तृष्णा व विभव तृष्णा ह्या दुःखाच्या मुळाशी असतात. याविषयीची जाणीव ठेवून तृष्णेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे जीवनाचा सर्वात मोठा विजय आहे.

 

  • संदर्भग्रंथ — बुद्धिझम फॉर यंग स्टूडन्स, लेखक – भंते डॉ. सी. फॅंगचॅंम ( थायलंड )