November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याच रोल मॉडेल ! समाजभुषण आद. आयु.सयाजी वाघमारे

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याच रोल मॉडेल,
महाडचा सत्याग्रह!

दि .४ ऑगस्ट १९२३ रोजी समाजसुधारक राबबहादुर सीताराम केशव बोले यांनी फार मोठा क्रांतीकारक ठराव मुंबईच्या नव्या विधिमंडळात मांडला. अस्पृश्यना सार्वजनिक पाणवठे , धर्मशाळा , विद्यालय , न्यायालय हया सार्वजनिक ठिकाणी मुक्तद्वार असावे. असा त्यांच्या ठराववाचा आशय होता .
बोले यांचा उपरोक्त ठराव कृतीत आणण्यासाठी सरकारने एक परिपत्रक काढले. सर्वाजिल्हाधीपती , नगरसेवक , शिष्टमंडळे , मुंबईतील नगरपालिकेचे प्रमुख अधिकारी इंप्रूव्हमेंट ट्रस्टचे अध्यक्ष यांना तो ठराव कृतीत आणण्याविषयी आज्ञा दिली .

बोले ठरावाप्रमाणे सर्व संबंधित जिल्हामंडळे , संस्थांनी अस्पृश्यांची गाऱ्हाणी दूर करण्यासाठी टाळाटाळच केली होती . म्हणून ५ ऑगस्ट १९२६ रोजी बोले यांनी विधीमंडळात फिरुन असा ठराव मांडला की , ज्या नगरसंस्था , जिल्हामंडळेवर उल्लखिलेला ठराव अमंलात आणणार नाहीत . त्यांना सरकारी वर्षासण मिळणार नाही . त्यामुळे आता त्या प्रश्नास पुन्हा तोंड फुटले आणि त्याच दरम्यान महानगरपालिकेने आपल्या अधिकाराखाली असणारे चवदार तळे त्या ठरावानुसार अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले होते. परंतु स्पृश्य हिंदुच्या भीतीमुळे तेथील अस्पृश्यांनी त्या तलावाचे पाणी न्हेण्याचा हक्क बजावला नव्हता . अस्पृश्य वर्गाचे हक्क नि भवितव्य यांसबंधी घाट माथ्यावर परिषदांतून विचारविनिमय झाला होता . परंतु विचाराचे आता चळवळीत रुपांतर करण्याची वेळ आली आहे . असे समजून आंबेडकर आणि त्यांचे सहकारी हयांनी महाड येथे १ ९ व २० मार्च १९२७ हया दोन्ही दिवशी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद भरविण्याचे निश्चित केले .

सुरेंद्रनाथ तथा सुरबा टिपणीस , सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर , संभाजी तुकाराम गायकवाड , शिवराम गोपाळ जाधव , अनंतराव चित्रे , रामचंद मोरे इत्यादी पुढाऱ्यांनी परिषद यशस्वी करण्याकरता अविश्रांत परिश्रम केले . खेडया खेडयातून परिषदेचा प्रचार करण्यात – आला . त्यामुळे पंधरा वर्षाच्या युवकांचा पासून ते पंच्याहत्तर वर्षाच्या वृध्दांपर्यंत कोकण, घाट , मुंबई नि नागपूर हया विभागांतून सुमारे पाच हजार अस्पृश्य , पाठीवर भाकऱ्या बांधून , परिषदेसाठी आले . महाडच्या तळभागात चवदार तळयापासून सुमारे दोन फर्लांगावर बांबू नि झापांनी बांधलेल्या मंडपात ही परिषद भरली . परिषदेच्या वापरासाठी स्पृश्य हिंदूकडून पाणी मिळणे शक्य नसल्यामुळे, कार्यकर्त्यांना चाळीस रुपये खर्चून पाणी विकत घ्यावे लागले होते.

महाडातील पु.प्र. तथा बापूराव जोशी , धारिया , तुळजाराम मिबदी, सीताराम पंत शिवतरकर गंगाधरपंत नी . सहस्त्रबुध्दे , अनंतराव चित्रे , भा.कृ. गायकवाड , बाळाराम आंबेडकर , पा . नं . राजभोज , शांताराम अ . एश्याम , रामचंद्र मोरे , रामचंद्र शिर्के हया परिषदेसाठी आले होते . परिषदेस अस्पृश्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

स्वागताध्यक्ष संभाजी गायकवाड हयांच्या भाषणाने परिषदेच्या कार्यास आरंभ झाला . त्यानंतर आपल्या लोकांना उपदेश करताना बाबासाहेब म्हणाले . माझे असे मत आहे की , आम्ही सरकारला नेहमी अनुकूल असतो . म्हणूनच सरकार आमची नेहमी उपेक्षा करते . सरकार देईल ते घ्यायचे , सांगेल ते ऐकावयाचे , राहवील तसे रहावयाचे , अशी आमची दास्यवृती बनली आहे . लष्कार भरती वरील बंदी उठविण्याचा आटोकाट प्रयत्न करा . अस्पृयवर्गाची सुधारणा होण्यास दोन गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे . त्यांच्या मनावर जो जुन्या , खुळचट , अनिष्ट विचारांचा गंज चढला आहे . तो धुऊन निघाला पाहिजे . आचार विचार आणि उच्चार हयाची शुध्दी जोपर्यंत झाली नाही , तोपर्यंत अस्पृश्य समाजात जागृतीचे अथवा प्रगतीचे बीज कधीही रुजणार नाही . सद्य:स्थितीत त्यांच्या खडकाळ मनावर कसलेही नवे रोप उगवणार नाही . त्यांची मने अशा रितीने सुसंस्कृत होण्यास त्यांनी पांढरपेशाचा अवलंब केला पाहिजे . बाबासाहेबांचे अध्यक्षीय भाषण अत्यंत स्फूतिदायक , उद्बबोधक नि परिणामकारक झाले .

दुसऱ्या दिवशी सकाळी , सुरबा टिपणिसांच्या घरी आंबेडकर , टिपणीस , शिवतरकर सहस्त्रबुध्दे नि अनंतराव, चित्रे यांनी तो विचार कृतीत कसा आणावा हया विषयी योजना आखली . परिषदेत भाषणे घेवून कामकाज संपले , असे अध्यक्ष घोषित करणार इतक्यात पूर्वसंकेता प्रमाणे अनंतराव चित्रे ताडकन उठून म्हणाले , ” आपण महाड नगरपालिचा ठराव अंमलात आणू या “. ते ऐकून परिषदेचा मंडप टाळयांच्या कडकडाने दुमदुमून गेला. संपुर्ण परिषदेत उत्साह संचारला. क्षणार्धातच चारा चारांच्या तुकडया एकामागून एक धीरगंभीपणे व शिस्तीने चालू लागल्या .भारताच्या जीवनावर दूरगामी परिणाम करील अशी इतिहासातील एक युगप्रवर्तक घटना घडण्याचा तो क्षण होता .

आपल्या प्राणप्रिय नेत्याने , तळयातील पाणी ओजळीने प्राशन केल्याचे बघताच , त्या हजारो सत्याग्रहींनी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर गजबजून टाकला . त्याच बरोबर प्रत्येक सत्याग्रही तळ्याचे पाणी ओजळभर घेऊन आनंदीत झाला होता .

अस्पृश्य हिंदू चवदार तळयातील पाणी प्याल्याचे पाहताच महाडतील सनातनी वृतीच्या स्पृश्यांची माथी भडकली . वातावरण तप्त आणि स्फोटक झाले . पांच -सहा हजार अस्पृश्य लोक तळयावर पाणी पित असता तेथे जावून त्यांना अडविण्याची कुणाची छाती झाली नाही , काही विन्धसंतोषी सवर्ण हिंदूनी गावभर अशी कंडी पिकवली की , महारांनी तळे बाटविले . आता ते विरेश्वर मंदिरात प्रवेश करणार आहेत . त्यामुळे स्पृश्य हिंदू लाठया – काठ्या घेवून अस्पृश्य बांधवांच्यावर तुटून पडले . परगावाहून परिषदेला आलेले अस्पृश्य पाहुणे , दोन दोन , चार चार मिळून शहरात बाजार रहाटासाठी अथवा शहर पाहण्यासाठी हिंडत होते . काही घरी परतले . काही घरी जाण्याच्या घाईत होते . काहीजण परिषदेच्या मंडपात जेवत होते .

अशावेळी हे धर्मघातकी स्पृश्य हिंदू मंडपात शिरले . हर हर महादेवची शिवगर्जना करुन त्यांनी त्या निरपराधी गरीबांना घायाळ केले . स्त्रिया , मुले हयांनाही त्या क्रूरकर्म्यानी सोडले नाही . मंडपातील शिजलेल्या अन्नात त्या नराधमानी माती कालविली . भांडयाची मोडतोड केली आणि बाजारपेठेत जो जो अस्पृश्य दिसला त्याला त्याला त्या पिसाटांनी पिटले.

बाबासाहेब आंबेडकर उतारु बंगल्यावर उतरले होते . त्या भीषण हल्ल्याची बातमी त्यांना समजली . दोन – तीन अनुयायांसह ते बाहेर पडले वाटेत त्यांना स्पृश्य गुंडांनी गराडा घातला . देवळात प्रवेश करण्याचा आमचा इरादा नाही . असे बाबासाहेबांनी त्यांना शांतपणे सांगितले . मंडपात जाऊन त्यांनी वस्तुस्थिती पाहिली . घायाळ होवून बेशुध्द पडलेले आणि प्राणांतिक वेदनानी विव्हळत असलेले अनेक दलित बांधव पाहून त्यांचे रक्त सळसळले . तरीदेखील शांतता राखण्याविषयी त्यांनी आपल्या अनुयायांना आज्ञा केली . घायाळ होवून पडलेल्या वीस अनुयायांना बाबासाहेबांनी स्वतः दवाखान्यात नेले .

त्यानंतर बाबासाहेब डाक बंगल्यावर परतले . तेव्हा तेथे संतापाने अधिर झालेले सुमारे शंभर अस्पृश्य ज्यामध्ये बहूतेक मिलटरीतून सेवानिवृत्त झालेले होते . त्यांच्या डोळयातून जणू आगीच्या ठिणग्या बाहेर पडत होत्या . सुड घेण्यासाठी त्यांचे हात वळवळत होते . बाबसाहेबांनी नुसते हं म्हटले असते तर त्यांनी त्या स्पृश्य पिसाटांना पाणी पाजले असते . पण शांतता पाळण्याचा आपल्या एकमेव नेत्यांचा आदेश त्यांनी शिरसावंद्य मानला आणि त्या सर्वानी रात्री आपापल्या गांवी प्रयाण केले.

महाडच्या तळ्याचे पाणी प्राशन केले. परन्तु सनातनांनी सत्याग्रही अस्पृश्यांवर जीव घेणे हल्ले केले . म्हणजे पाणी पिण्याचा निसर्गदत्त हक्क नाकारला म्हणून अस्पृश्यबांधव निराश होऊ नये. हे लक्षात घेऊन २५ डिसेंबर १९२७ रोजी पुन्हा सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. तळे खाजगी मालकीचे असल्या विषयी दिवाणी न्यायाल्यात प्रकरण व त्याच नऊ लोकांनी दुसरा दावा महाड येथील दुय्यम न्यायालयात न्हेला. व १४ डिसेंबर १९२७ रोजी वैदय नामक न्यायाधीशाने , न्यायाल्याचे दुसरे आज्ञापत्र देईपर्यंत तळयावर जाण्यास मनाई केली , प्रकरण न्यायप्रविष्ट झाले म्हणून सत्याग्रही निराश होवू नये यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जमलेल्या सत्याग्रहींच्या उपस्थितीत परिषदेचे आयोजन केले . त्या सभेत डॉ . बाबा साहेबांनी केलेले भाषण म्हणजे शब्दांचे निखारे होते . त्या परिषदेत चवथ्या ठरावाप्रमाणे मनुस्मृतीचे दहन करावे असा ठराव झाल्यावर रात्री ९ वाजता परिषदेच्या समोर एका खडयात अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते मनुस्मृतीची होळी करण्यात आली .

२० मार्च १९२७ रोजी स्पृश्य हिंदूनी सत्याग्रहीना जी अमानुष मारहाण केली , त्या प्रकरणात ७ गुंडाना चार महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली . ते पाहून डॉ . बाबासाहेबांनी उदगार काढले न्यायालयातील मुख्याधिकारी स्पृश्य हिंदू असते तर आपल्याला कदाचित न्याय मिळाला नसता .

आपला लढा न्याय भूमिकेवर असला पाहिजे . पुरोगामी विचाराचे स्पृश्य हिंदू तुमच्या बाजूने उभे राहू शकतात . आपण अल्पसंख्याक असल्यामुळे हिसंक लढयाचा स्विकार करता कामा नये . बुध्दाने सुध्दा शांतीचा मार्ग सांगितला आहे . अभ्यासपूर्ण सनदाशिर मार्गाचा पाठपुरावा केल्यास न्याय मिळू शकतो . संघशक्ती हा वस्तूनिष्ठपाठ महाडच्या सत्याग्रहाने आपल्याला दिला आहे .

 

✍️ समाज भुषण आद. आयु.सयाजी वाघमारे
📲 98 92 06 69 67 , 70 39 48 34 38
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

संकलन , विलास पवार , रायगड
📲 91 37 66 2424
☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️