July 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

धम्म विनया माॅनेस्ट्री प्रोजेक्ट पुणे खडकवास Dhamma Vinaya Monastery Project Pune Khadakwas

महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि माजी मुख्य माहिती आयुक्त मा. रत्नाकर गायकवाड साहेब व बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्था पुणे यांच्या अथक प्रयत्नातून पुणे शहरजवळ खडकवासला परिसरात धम्म विनया माॅनेस्ट्री प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत एका विशाल स्तूपाचे आज उद्घाटन करण्यात आले.

2587 व्या बुद्ध जयंतीचे औचित्य साधून आज थायलंडचे बौद्ध महापंडित भदंत आर्यवंग्सो गुरुजी यांच्या हस्ते स्तूपामध्ये बुद्धाच्या अस्थीधातू प्रस्थापित करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे थायलंड येथून आलेले बौद्ध उपासक उपस्थित होते. धम्म विनया माॅनेस्ट्री प्रोजेक्ट हा जवळपास 100 एकर जागेत उभा राहत आहे.

यातील पहिल्या टप्प्यात सांचीच्या स्तूपाची प्रतिकृती असलेला विशाल स्तूप, त्यामध्ये भव्य असा विपश्यना हॉल, उपोसथ हाॅल, भिक्खू निवास, साधकांचे निवास गृह, एडमिनिस्ट्रेटिव्ह भवन या इमारतींचे आज लोकार्पण करण्यात आले. हे महान असे धम्मकार्य पूर्ण करण्यासाठी मा. रत्नाकर गायकवाड साहेब यांचे समर्पण, कष्ट आणि ध्यास प्रामुख्याने उल्लेखनीय आहेत. सोबतच बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्था पुणेचे अध्यक्ष मा. एम. टी. कांबळे साहेब, त्यांचे सहकारी, समर्पण वृत्तीने काम करणारे शेकडो धम्मउपासक, या धम्म कार्यासाठी कोट्यवधी रकमेचे दान देणारे धम्मानुयायी, धम्ममित्र यांचे महान योगदान यामुळेच हा प्रचंड मोठा धम्मप्रकल्प पूर्णत्वास जात आहे. या सर्वांना सॅल्युट, मानाचा जयभीम !!