August 4, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

६ जुलै – चौदावे दलाई लामा जन्मदिन

जन्म – ६ जुलै १९३५ (चीन)

दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते असतात. ‘दलाई लामा’ याचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात.

आतापर्यंत १३ दलाई लामा होऊन गेले असून सध्याचे चौदावे दलाई लामा हे तेन्झिन ग्यात्सो आहेत. त्यांचा जन्म ताकत्सर, छिंगहाय, चीन मध्ये ६ जुलै १९३५ रोजी झाला. हे १४ वे नि विद्यमान दलाई लामा आहेत.

तिबेटी बौद्ध मतातील गेलुग्पा पंथाच्या प्रमुख आचार्यांना दलाई लामा अश्या संज्ञेने उल्लेखले जाते. १७ नोव्हेंबर १९५० रोजी चौदाव्या दलाई लामांनी पदाची सूत्रे हाती घेतली. या दलाई लामांनी तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी हयातभर कार्य केले असून १९८९ साली त्यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

त्यांचे आई-वडील शेतकरी होते. त्यांच्याकडे असलेल्या शेती व गाई, म्हशींवर ते आपला उदरनिर्वाह चालवायचे. हे कुटुंब १९३९ मध्ये दलाई लामांच्या चौथ्या वाढदिवसानंतर आपले छोटसे खेडेगाव सोडून ल्हासा येथे आले.

दलाई लामांच्या निवडीसाठी असलेल्या विविध कसोट्या यशस्वीरीत्या पार केल्यावर २२ फेब्रुवारी १९४० रोजी पो ताला प्रासादात एका विधिपूर्व समारंभात तेंझिन गियात्सो चौदावे दलाई लामा म्हणून आसनस्थ झाले. त्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. पुढे त्यांचा धर्मविषयक सखोल अभ्यास सुरू असताना १९५० मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले. आणि हा प्रदेश चीनचा भाग असल्याचे घोषित केले. त्याचवेळी तिबेटच्या राजकीय सत्तेची सर्व सूत्रे दलाई लामांच्या हातात आली. या काळात तिबेटवर चिनी राजवटीचा अनियंत्रित अंमल सुरू झाला. धाक, दडपशाही, जुलूम, जबरदस्ती, छळवणूक, पिळवणूक इत्यादी अत्याचार तिबेटच्या जनतेवर चिनी राज्यकर्तांकडून व लष्कराकडून होत होते.

भगवान गौतम बुद्धाच्या शांतताप्रिय देशात हिंसाचार, लाठीमार अश्रुधूर व गोळीबार या अत्याचारांनी परिसीमा गाठली. जनतेच्या सर्वप्रकारच्या स्वातंत्र्यावर र्निर्बंध लादले गेले. तिबेटीय कला, संस्कृती व परंपरा यांचा ऱ्हास केला गेला. चीनच्या वाढत्या जाचामुळे व अत्याचारामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दलाई लामांना त्याच्या कुटुंबीयांसह १९५९ मध्ये तिबेट सोडावे लागले. ते भारतात शरण आले. काही लोक नेपाळ, भूतान व इतरत्र शरण गेले.

जवाहरलाल नेहरू आणि लामा यांची १९५९ मध्ये मसूरी येथे भेट झाली. आज जगभरातील विविध देशांमध्ये तिबेटीय माणसे निर्वासितांचं आयुष्य कंठत आहे. त्यातील बहुतांश मात्र भारतात आहेत. हिमाचल प्रदेशातील धरमशालात दलाई लामा वास्तव्यास आहेत. येथे त्यांनी लोकशाही मूल्यांच्या तत्त्वावर तिबेटीय निर्वासितांची संसद स्थापन केली आहे. आज ही संसद किंवा निर्वासितांचे सरकार दलाई लामांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे.

दलाई लामा तिबेट मुक्तीसाठी विविध शांतताप्रिय मार्गानी झगडत आहेत, आंदोलने करीत आहेत व आपल्यावरील अन्यायाची गाथा जगासमोर हिरिरीने मांडीत आहेत. जागतिक स्तरावर तिबेटची बाजू मांडण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. याच कारणासाठी दलाई लामांच्या शांतताविषयक प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना १९८९ मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.

देश-विदेशांत धर्म, तत्त्वज्ञान, अहिंसा, जागतिक शांतता, करुणा, मानवी हक्क इत्यादी विषयांवर ते व्याख्याने देत असतात. देश-विदेशांतील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननिय डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविले आहे. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांना मानचिन्हे व गौरवपत्रे दिली आहेत. आतापर्यंत त्यांनी जगभरातील ६२ देशांना भेटी दिल्या असून ७२पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यापकी ‘फ्रीडम इन एक्झाईल’ व ‘माय लॅन्ड ॲन्ड माय पीपल’ ही दोन त्यांची आत्मचरित्रपर पुस्तके आहेत.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण      संदर्भ : विकिपीडिया