चीनमधून इ.स. 372 मध्ये कोरियात बौद्धधर्माचे आगमन झाल्यावर मन आणि निसर्ग नियमांना जाणणारा शास्ता म्हणून बुद्धांचा खूप प्रसार झाला. पाचव्या शतकात कोरियामध्ये तीन बौद्ध राजघराण्यांची सत्ता होती. इ.स. 678 साली तेथील शीला राजघराण्याने संपूर्ण कोरियाचे आपल्या अधिपत्याखाली एकीकरण केले आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण कोरियात झाला. त्या काळात सांस्कृतिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या बौद्ध धर्माचा खूप विकास झाला. बौद्ध धर्मामुळे विकसित झालेले कलाकौशल्य ही कोरियाच्या इतिहासातील एक अभिमानाची गोष्ट आजही समजली जाते. त्याकाळी बांधलेली बौद्ध विहारे, दगडांनी बांधलेले पॅगोडे आणि इतर कलात्मक वास्तू पाहता त्या काळातील कोरियातील बौद्ध कला उच्च कोटीला पोहोचली होती याची प्रचिती येते.
इ.स. 935 मध्ये शीला राजवट समाप्त झाली आणि त्या जागी कोर्यो ही बौद्ध राजवट आली. त्यांनी देखील असंख्य बौद्ध विहारे बांधली. पंधराव्या शतकातील सेजू राजाने कन्फुशियन लोकांचा विरोध असूनही बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. सोळाव्या शतकात कोरियावर आक्रमण झाले तेव्हा देशाच्या संरक्षणासाठी बौद्ध धर्म धावून आला. भिक्षुंच्या मदतीने संपूर्ण कोरियाने शौर्याने लढा दिला आणि आक्रमकांना परत पाठवले. यामुळे संपूर्ण देशात बौद्ध धर्माविषयी आदराची भावना वाढली. विद्वान कन्फुशीयस लोकांना जे करता आले नाही ते बौद्ध भिक्षूंनी करून दाखविले. मात्र सन1910 मध्ये जपानने कोरिया जिंकले आणि बौद्ध राजघराण्यांची राजवट समाप्त झाली. 1952-53 मध्ये कम्युनिस्ट झालेल्या उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमेरिका आणि ब्रिटिश सैन्य मदतीला धावून आले. आज बौद्ध धर्माने दक्षिण कोरियातील संस्कृती समृद्ध केली आहे हे जाणवते. संपूर्ण कोरियन लोक बौद्ध संस्कृतीचाच दृष्टिकोन ठेवतात. त्यांची विचारसरणी व तत्वज्ञान व्यावहारिक महायान पंथावर आधारलेले आहे. म्हणूनच त्रिपिटक कोरीयाना सारखा प्रकल्प त्यांनी पूर्णत्वास नेला. त्यांच्या लिखाणात विज्ञानवाद आणि तर्कशास्त्र ही प्रेरणास्थाने राहिली आहेत.
सन 1945 मध्ये कोरियाची नवीन घटना अस्तित्वात आली. तेव्हापासून आतापर्यंत सर्वसाधारण लोकांचे बौद्ध धर्माला जोरदार पाठबळ मिळाले आहे. नवीन जोमाने ज्योगे संप्रदायाचे विस्तारीकरण चालू आहे. दक्षिण कोरियातील बहुतेक बौद्ध विहारे त्यांचीच आहेत. या संप्रदायाची स्वतःची वर्तमानपत्रे आणि नियतकालिके आहेत. त्यातून ते धम्माचा सतत प्रचार करीत असतात. जगभर बौद्ध भिक्षू प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठविले जातात. त्यामुळे आज त्यांची विहारे अमेरिका, जपान, हॉंगकॉंग, आणि युरोपमध्ये देखील दिसून येतात. जपानी उद्योगधंद्यांचे तत्व Go and See (बुद्धांचे अर्थपूर्ण शब्द – एही पस्सीको) कोरियन देशाने देखील स्वीकारल्यामुळे आज कोरिया अनेक इलेक्ट्रॉनिक व ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योगामध्ये अग्रणी आहे. LG, Samsung, Hundai, Kia, Koryo ही नावे आज जगप्रसिद्ध झाली आहेत.
जपानला भेट देऊन दक्षिण कोरियात सेउल विमानतळावरून बाहेर आलो, तेव्हा जास्त फरक जाणवला नाही. गगनचुंबी इमारती, आखीव रेखीव रस्ते, हिरवीगार वनराई, मेट्रो, भुयारी मार्ग यांचे जाळे दिसले. तसेच टापटीप, स्वच्छता आणि शिस्त जाणवली. इथले नामी बेट मोठे प्रेक्षणीय स्थळ असून इथे स्तूप आणि प्राचीन शिल्पाकृती आहेत. ज्योगे या बौद्ध संप्रदायाचे विहार अत्यंत सुंदर असून Lantern Festival नुकताच पार पडून गेला असल्यामुळे तेथील कंदिलांची आरास पाहता आली. सेउल राजवाडा मोठे प्रेक्षणीय स्थळ आहे. तेथे गाठ पडलेल्या थायलंडच्या एका भिक्षूंबरोबर धम्मचर्चा करता आली. तरी पर्यटकांनी जपान बरोबर कोरियाचा देखील टूरमध्ये समावेश करावा. खर्च कमी होतो आणि बौद्ध संस्कृतीही अभ्यासता येते.
— संजय सावंत 9768991724
संदर्भ :- जगातील बुद्ध धम्माचा इतिहास – लेखक मा.श.मोरे
🏮🟧🏮🟧🏮🟧🏮🟧
More Stories
पुरातत्त्वीय दिवाळखोरी – बुद्ध लेणींचे रूपांतर…!
राजर्षी शाहू छञपतींचा आज स्मृतीदिन !
लिपिंचा शोधयात्री – जेम्स प्रिन्सेप