November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध लेणीं संवर्धन चळवळ – अतुल भोसेकर

रुडाल्फ हेर्बेल, नील स्मेल्सर, जॉन विल्सन, ड्रेसलर व विलिस, हर्बर्ट ब्लूमर, टर्नर व किलियन, लुंडबर्ग, जे. आर. गसफील्ड, पॉल विल्किंन्सन, पार्थ मुखर्जी आणि इतर समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक चळवळीची अनेक प्रकारे व्याख्या केली आहे. त्यांच्या शब्दांची उसनवारी घेत चळवळीची व्याख्या अशी करता येईल – “चळवळ म्हणजे अनेक लोक एकत्र येऊन जाणीवपूर्वक व हेतुत: सामूहिक प्रयत्नांतून परिवर्तनाला प्रभावित करणारी एखादी कृती करतात”.

बुद्ध लेणीं संवर्धन चळवळीच्या बाबतीत मग ही व्याख्या अशा प्रकारे करावी लागेल – “बौद्ध संस्कृतीचा महत्त्वाचा वारसा असणाऱ्या बुद्ध लेणीं बद्दल आदर आणि उत्सुकतेपोटी अनेक लोक एकत्र येऊन जाणीवपूर्वक व हेतुत: सामूहिक प्रयत्नांतून बुद्ध लेणींचा अभ्यास, संशोधन, प्रचार-प्रसार, संरक्षण आणि संवर्धन यांवर वैधानिक दृष्टीने कृती करतात”.

याचाच अर्थ जर आपल्याला बुद्ध लेणीं ही एक वारसा चळवळ म्हणून राबवायची असेल तर सर्वात आधी बौद्ध संस्कृती आणि बुद्ध लेणींबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल. इतिहास आणि पुरातत्वशास्त्राच्या दृष्टिकोनातून बुद्ध लेणींची माहिती समजावून सांगितली पाहिजे. बुद्ध लेणीं मधील शिलालेख, शिल्प यांचे वर्णन आणि तौलनिक काळ समजावून सांगितला पाहिजे. आणि हे सर्व कुठलेही अभिनिवेश न आणता, भावनेचा अतिरेक न होता सांगितले पाहिजे.

चळवळी मध्ये अनेक जण येतात – काही उत्सुकतेपोटी, काही थ्रिल अनुभवण्यासाठी, काही नवीन मित्र जोडण्यासाठी तर काहीजण अभ्यास करण्यासाठी किंवा चळवळीचे पाईक होण्यासाठी. या सर्वांचेच स्वागत करणे गरजेचे आहे कारण चळवळ ही “पेरायची” असते! ती संकुचित होता कामा नये. तिचा विस्तार हा अपेक्षांनुसार करायचा असतो. बहुतेक वेळा मौजमस्ती करण्यासाठी आलेले, चळवळीचे गांभीर्य कळल्यानंतर, मात्र आपोपाप कमी होतात. जे नेहमी येतात त्यांचे सातत्य टिकवून ठेवणे किंवा जे अधूनमधून येतात त्यांचा सहभाग वाढविणे हे महत्त्वाचे.

सामाजिक किंवा राजकीय चळवळीत काही नियम गरजेचे असतात मात्र सांस्कृतिक चळवळीत तसे नसते. तुमची इच्छा, आवड हे महत्त्वाचे असते. त्यामुळे कालांतराने जेव्हा एखादी लेणीं संवर्धन संघटन नियम बनवते तेव्हा ही चळवळ “ऐच्छिक” न राहता, “नियमग्रस्त” होत जाते. त्यात असलेले एखादे कार्यकारी मंडळ मग “मालक” होण्याचा प्रयत्न करते किंबहुना तसे ते भासते आणि इथेच चळवळीची घसरण सुरु होते! जी गोष्ट लोकांना आवडीने करावीशी वाटते तिला जर नियमांचे कुंपण घातले कि मग ते संघटन, ती चळवळ अडचणीचे ठरते कारण लोकांना वाटते ही चळवळ आता मूठभर लोकांच्या ताब्यात गेली आहे!

लेणीं संवर्धन एक हसत खेळत मात्र गांभीर्यपूर्वक कार्य केले तर या चळवळीमध्ये लोकसहभाग वाढत जाईल. “लोकांना जोडल्याने चळवळ वाढते आणि लोकांना तोडल्याने, चळवळ थांबते हे लक्षात घ्या.”

मुळातच बुद्ध लेणीं संवर्धन चळवळ यशस्वीपणे राबवायची असेल तर तिचा हेतू अतिशय सरळ आणि संविधानिक असायला पाहिजे. म्हणजे मुख्य उद्देश असा हवा कि बुद्ध लेणींप्रती लोकांना आकृष्ट करता आले पाहिजे, जे येतायेत त्यांना सतत येण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. जे अधून मधून येतात, त्यांना समजून घेतले पाहिजे आणि त्यांना हवे तेव्हा येण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे….एकदा का कोणी जोडले गेले की त्याला कदापि काढता कामा नये, कारण चळवळीचा मूळ उद्देश बुद्ध लेणीं सर्वांपर्यंत पोहचविणे आणि लोकांना जोडणे हा आहे! मात्र जर कोणी अनैतिक वागत असेल तर त्याला दूर करायलाच हवे!

चळवळीमध्ये समंजसपणा हवा पण अहंकार नसावा. बुद्ध लेणीं ज्या विभागाच्या ताब्यात आहे तेथील अधिकारी वर्ग, सुरक्षा अथवा सफाई कामगार, कार्यशाळेला येणारे उत्सुक लोकं यांच्या बरोबर समंजसपणा हवा. लेणीं संवर्धनाच्या बाबतीत अधिकाऱ्यांशी करावा लागणारा पत्रव्यवहार किंवा संवाद हा अतिशय संयत आणि मुद्देसूद असावा. मात्र कधीतरी कठोर पावले देखील उचलावी लागतील हेही लक्षात ठेवले पाहिजे! तुमच्या वागण्यातून तुमची प्रगल्भता दिसते आणि म्हणूनच प्रत्येक लेणीं संवर्धकाने तसे प्रयत्न केले पाहिजे.

आजच्या “चमको युगा”मधे लेणीं चळवळ “दिखाऊ” तर होत नाही ना याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे आणि वेळीच सावध झाले पाहिजे. बुद्ध लेणीं चळवळ ही ध्येयनिष्ठ करण्यासाठी सर्वांचाच सहभाग गरजेचा आहे.

ज्यांना बुद्ध लेणीं संवर्धक व्हायचे असेल त्यांनी बुद्ध लेणींचा खूप अभ्यास करावा, इतर पुरातत्त्वविदांची पुस्तके, संशोधन वाचावे, स्वतःचे संशोधन करावे, इतरांना बुद्ध लेणीं समजावून सांगावी आणि आपापल्या परीने या बुद्ध लेणींचा प्रचार-प्रसार करावा.

कधी एके काळी, ज्या वास्तूंमध्ये अनेक शतके, बुद्धविचारांचा घोष होत होता, त्या बुद्ध लेणीं मधील आपले कार्य देखील असेच ठळक, शतकानुशतके चालले पाहिजे. नवीन येणाऱ्या लेणीं संवर्धकांना तुम्हीं तुमच्या वागण्यातून कोणता संदेश देताय हे अतिशय महत्त्वाचे. या बुद्ध लेणीं संवर्धन चळवळीत, मी एक महत्त्वाचा घटक आहे असे प्रत्येकाला वाटले पाहिजे आणि त्याच महत्त्वाने प्रत्येकाला वागविले पाहिजे. तरच बुद्ध लेणीं संवर्धन चळवळ ही खऱ्या अर्थाने “चळवळ” होऊ शकेल.

बुद्ध लेणीं संवर्धन चळवळ यशस्वीपणे चालविण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊ यात…

अतुल भोसेकर
954527741