आयुष्यभर उन्हात उभे राहून ज्या प्रज्ञासूर्याने समाजासाठी सावलीचे अंथरुण दिले, आपल्या महत्प्रयासाने अनंत अडचणींवर मात करून आपल्याला भारतीय राज्यघटना देऊन रक्ताची शाई केली त्या सच्चा देशप्रेमी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने माझ्या सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेंबातून त्यांचे कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करुन त्रिवार अभिवादन करते. ज्यांच्या ज्ञानाची व्याप्ती जगातील कोणालाही मोजता आली नाही, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर… हे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने निवडलेल्या विद्वानांच्या यादीमध्ये जगातील पहिले विद्वान म्हणून विराजमान आहेत. ‘मी प्रथमतः भारतीय व माझ्या अंगातील शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी भारतीय आहे’ अशी गर्जना करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे उद्धारक आहेत.
‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’, अशी गर्जना करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी शिक्षण ही सुद्धा महत्त्वाची गरज मानत. शिक्षणाने माणसाला माणूसपण मिळते, त्यांच्या अस्तित्वाची त्याला ओळख पटते, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. हा महामानव एक महान ग्रंथप्रेमी होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथविषयक प्रेम अजोड होते. त्यांनी अनेक ग्रंथातील ज्ञान मिळवून ग्रंथ हेच गुरु मानले.
मुंबई येथील दादर विभागात ‘राजगृह’ नावाचे घर हे अनेक ग्रंथांचे भांडार आहे, जणू काय ग्रंथसंपत्तीच ! ही संपत्ती मिळविताना त्यांना अनेक कष्ट सोसावे लागले. प्रसंगी उपाशी पोटी राहावे लागले. पुस्तकांशिवाय अभ्यास कसा होणार म्हणून ते रोज ग्रंथालयात जात, असे ते ग्रंथावर प्रेम करणारे विद्याप्रेमी, विद्याव्यासंगी, तत्त्वचिंतक होते. आपल्या ग्रंथप्रेमातूनच त्यांनी राजगृहाची निर्मिती केली. त्यांच्या शब्दात म्हणता येईल, ‘माझे ग्रंथप्रेम महाभयंकर आहे, मजजवळ एकूण वीस हजार पुस्तके आहेत. विद्या व्यासंगाशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही. पुस्तकांवर प्रचंड प्रेम करा. ‘थाॅटस ऑन पाकिस्तान’, ‘द अन् टचेबलस्’, ‘द प्राॅब्लेम ऑफ रुपी’, इत्यादी प्रकारचे आर्थिक, राजकीय, सामाजिक विषयांवर त्यांनी ग्रंथ लिहिले. त्याचबरोबर आपल्या आयुष्याच्या अंतिम पर्वात त्यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ लिहून जगाला तारणारा बुद्धधम्म हाच तरणोपाय असल्याचे नमूद केले. त्यावर आधारित भारतीय संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ देशाला अर्पण करून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या महान तत्वांचा संदेश दिला.
त्यांचे बहुश्रुत लिखाण हे त्यांच्या ग्रंथप्रेम व व्यासंगाचेच उदाहरण आहे. ते म्हणत, ‘पुस्तके मला खऱ्या मित्रांप्रमाणे वाटतात, ती माझ्या सुख दु:खात माझी अखंड सोबत करतात’, भावी पिढ्यांना पुरुन उरेल इतके समग्र लिखाण त्यांनी केले आहे. त्यांनी ज्ञानाचा अथांग सागर निर्माण केला. त्यांचे लिखाण अत्यंत जबाबदारीने वापरावे लागेल. कारण त्यांच्या विचारांना लिखाणाला विचारांची स्वतंत्र तात्त्विक बैठक आहे. त्यांचे ग्रंथप्रेम हे कायम राहिले. ज्या ज्या ठिकाणी ते जात असत, त्या त्या ठिकाणी असलेल्या ग्रंथालयांना आवर्जून भेटी देत असत. धावपळीच्या काळातही नाशिक येथे १८४० मध्ये स्थापन झालेल्या सार्वजनिक ग्रंथालयाला भेट दिली तेव्हा ते म्हणाले, ‘मी मॅनेजिंग कमिटीचा आभारी आहे. त्यांनी मला ग्रंथालयाच्या प्रदर्शनासाठी निमंत्रित केले. मला असे सांगण्यात आले की, हे ग्रंथालय फार जुने असून यामध्ये बरेच ग्रंथ दुर्मिळ आणि मौल्यवान आहेत. मला खंत वाटते की, या संस्थेला व्यवस्थापनासाठी पुरेशी मदत मिळाली नाही, की जितकी तिला आवश्यक आहे. मिळणाऱ्या मदतीत मॅनेजिंग कमिटी या ग्रंथालयाचे संगोपन करण्यात समर्थ आहे. ज्यामुळे बरेच लोक त्यांच्या प्रयत्नात सफल होत आहेत. मी अशा लोकांच्या सफलतेची आशा करतो.’
सामाजिक चळवळीच्या काळात देखील अत्यंत व्यस्त असतानाही त्यांचे ग्रंथप्रेम कोठेही कमी पडले नाही. सातत्यपूर्ण वाचन, चिंतन हा त्यांचा पिंड होता. औरंगाबादच्या बळवंत वाचनालय, तसेच बुड्डीकोन भागातील डोंगरे यांच्या वाचनालयाला भेटी देऊन त्यांनी मार्गदर्शन केले. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ या न्यायानेच त्यांनी ग्रंथप्रेम केले. ते म्हणत, ‘गावोगावी स्वतंत्र ग्रंथालये उभी राहिली पाहिजेत. ग्रंथालये ही समाज व संस्कृतीच्या उन्नतीचे साधन आहेत. मला जगात ग्रंथाइतका परमस्नेही दुसरा कोणीही नाही. ते मला शिकवितात, नवी वाट दाखवितात, आनंदाचा लाभ करून देतात.’ हे त्यांचे विधान ग्रंथ आणि ग्रंथालयाचे महत्त्व स्पष्ट करणारे आहे. ग्रंथालये ही शिक्षणाची महत्वपूर्ण केंद्रे आहेत. त्यांच्या सानिध्यात व्यक्तीची परिपूर्ण जडणघडण होते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच ते श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ग्रंथप्रेमी होते.
लेखिका – प्रा. ज्योती धुतमल
More Stories
पुढील पिढी बौद्ध का घडत नाही ?
बुध्द विहार आचारसंहिता… Adv Shankar Sagore.
तथागताचे अंतिम भोजन – राहुल खरे