November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – ११. प्रधान अमात्याद्वारा राजपुत्राची कान उघाडणी.

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड :  भाग पहिला  – जन्म ते प्रव्रज्या.

🌼 ११. प्रधान अमात्याद्वारा राजपुत्राची कान उघाडणी.  🌼

१. नवयौवना असफल झाल्या. राजपुत्राने यौवनात कोणतीही रुची दाखविली नाही याची उदायीला खात्री झाली.
२. नीतिकुशल उदायीने राजपुत्राशी स्वतःच वार्तालाप करण्याचा निश्चय केला.

३. एकांतात राजपुत्राची भेट घेऊन उदायी राजपुत्राला म्हणाला, ‘राजाने मला आपला योग्य मित्र म्हणून नियुक्त केले आहे मी तुमच्याशी मित्र हृदयाने बोलू इच्छितो.’ अशा प्रकारे उदायीने वार्तालाप आरंभ केला.

४. अहितकारी कृत्यापासून परावृत्त करणे, हितकारी कृत्यासाठी प्रवृत्त करणे आणि संकटकाळी साथ न सोडणे ही खऱ्या मित्राची लक्षणे होत.

५. “जर मी, आपला खरा मित्र असल्याचे अभिवचन दिल्यावरही, आपण पुरुषाच्या पुरुषार्थापासून विमुख होत असताना आपणास त्यापासून परावृत्त केले नाही तर मी माझ्या मैत्रीधर्मापासून च्युत झालो आहे असा त्याचा अर्थ होईल.

६. “छल कपटानेही स्त्रीला वश करणे योग्य आहे. त्या योगे संकोच दूर होतो व स्वतः आनंद उपभोगता येतो.

७. “स्त्रीचा आदर करून आणि त्यांच्या इच्छांची पूर्ती करूनच स्त्रीहृदय जिंकता येते. सद्‌गुण प्रेमास कारण आहेत यात शंकाच नाही. स्त्री आदराची चाहती आहे.

८. “हे विशालाक्ष, आपण सुंदर आहात. शालीन आहात. अनिच्छेने का होईना, आपण त्यांच्या प्रति शालीनतेचा व्यवहार करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयास करणार नाही काय ?

९. “दाक्षिण्य स्त्रीचा गुण आहे. दाक्षिण्य स्त्रीचा अलंकार आहे. स्त्री दाक्षिण्याची चाहती आहे. दाक्षिण्याशिवाय सौंदर्य म्हणजे जणू पुष्पविहीन वाटिकाच

१०. “परंतु फक्त दाक्षिण्याचा उपयोगच काय ? दाक्षिण्याचा हृदयीच्या भावनांशी मेळ झाला पाहिजे. ज्याची प्राप्ती कठीण आहे असे भौतिक सुख जेव्हा आपणास सहज प्राप्य आहे तेव्हा तुम्ही त्यांचा अव्हेर करणार नाही हे निश्चित.

११. “काम हाच पुरुषार्थ हे मानून प्राचीनकाळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहल्या हिला वश केले.

१२. “अशाच प्रकारे अगस्त्य ऋषीने सोमभार्या रोहिणीला वश केले. श्रुतीनुसार लोपामुद्रेसोबतही हेच घडले.

१३. “अशाच प्रकारे औतथ्यभार्या मरुतकन्या ममता हिचेशी महर्षी बृहस्पतीने सहवास केला आणि भारद्वाजाचा जन्म झाला

१४. ‘अर्घ्य अर्पण करीत असताना बृहस्पतीच्या भार्येला चंद्राने ग्रहण केले आणि दिव्य बुध प्रसवला.

१५. “अशाच प्रकारे कामपीडेने प्रेरित होऊन पाराशराने यमुनेकाठी वरुण पुत्राची पुत्री काली हिचेशी सहवास केला

१६. “कामज्वराने पीडित होऊन ऋषी वसिष्ठाने तिरस्कृत अशा कनिष्ठ जातीतील अक्षमाला नावाच्या स्त्रीशी सहवास केला आणि कपींजलाद नावाचा पुत्र जन्माला आला.

१७. “आणि राजर्षी ययातीने आपले यौवन ओसरले आहे याची जाणीव असतानाही, चैत्ररथवनात अप्सरा विश्वाची सोबत सहवास केला.

१८. “आणि कौरव राजा पंडू त्याला भार्येशी समागम केल्याने आपला मृत्यू अटळ आहे याची माहिती असतानाही तो आपली भार्या माद्री हिच्या रूपगुणावर मुग्ध झाला आणि तिच्याशी रममाण झाला

१९. “अशा प्रकारे या महान पुरुषांनी आपल्या कामभोगाची पूर्ती निंदनीय मार्गांनी सुद्धा केली. प्रशंसनीय मार्गांनी अशा इच्छांची पूर्ती होणार असेल तर त्यात दोष कोणता ?

२०. “आणि तरीही तुमच्यासारखा स्वस्थ, सौंदर्यवान, शक्तीसंपत्र पुरुष, ज्याचा सर्व सुखोपभोगावर अधिकार आहे, ज्यावर सर्व आहे, असा पुन्य कामयोगाची पेशा कातो याचे आर्य वाटते.”

The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म