November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बाबू हरिदास आवळे

आधुनिक बुद्ध बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे निकटचे सहकारी व समता सैनिक दलाचे अध्यक्ष व आरपीआय चे प्रमुख नेते परिनिर्वाणस्थ बोधिसत्व कर्मवीर बाबू ऍड. हरिदास आवळे यांना त्यांच्या 62 व्या परिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!* 👌👌👌💐💐
✍️ उमेश गजभिये. मो. 9326887326

बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला जी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धर्मदीक्षा घेतली. त्या कार्यक्रमाच्या करिता प्रचंड मेहनत घेणारे व त्यावेळेस नागपूर मधील अत्यंत स्फोटक परिस्थितीत समता सैनिक दलाचे गुप्तहेर सभोवताली पाठवून इन्त्यभूत माहिती गोळा करून बाबासाहेब आंबेडकरांना नागपूरला दगाफटका झाला नाही पाहिजे. याबाबत खबरदारी घेणारे परिनिर्वाणस्थ बोधिसत्व कर्मवीर बाबू ऍड. हरिदास आवळे यांना त्यांच्या 62 व्या परिनिर्वाणदिनी 2 मार्चला, समता सैनिक दल, आरपीआय व भारतीय बौद्ध महासभा या मातृसंघटना कडून विनम्र अभिवादन!

बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला केलेले बौद्ध धर्मांतरण व बौद्ध धर्मदीक्षा कार्यक्रम हा नागपूर हायकोर्टचे जस्टीस कोतवाल व गोखले यांनी फेब्रुवारी 1963 ला अनधिकृत ठरविला. याबाबतीत माहिती अशी, डॉ. डी. पी. मेश्राम नागपूर विधानसभा अनुसूचित जाती राखीव जागेवरून निवडून आलेले होते. त्याविरोधात पंजाबराव शंभरकर यांनी जिल्हा व सेशन कोर्ट नागपूर मध्ये निवडणूकी विरोधात केस घातली. त्याचा निर्णय 1962 ला न्यायमूर्तीनी दिला. या नागपूर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णया विरोधात मेश्राम हायकोर्टात अपील मध्ये गेले होते. हायकोर्टाने दिलेल्या निर्णया विरोधात पंजाबराव शंभरकर यांच्यावतीने सुप्रीमकोर्टात लढण्यासाठी कर्ज काढून लढा देणारे व काढून 1956 ची बौद्ध धर्मदीक्षा अधिकृत ठरवण्याची लढाई लढणारे, परिनिर्वानास्थ बोधिसत्व कर्मवीर हरिदास बाबू आवळे यांना 1 जुलै जयंती दिनी विनम्र अभिवादन!
परिनिर्वाणस्थ बोधिसत्व बाबू हरिदास आवळे यांचा जन्म एक जुलै 1916 रोजी नागपूर जवळील कामठी (छावणी) येथे झाला. दिनांक 2 मार्च 1971 ला नागपूर लोकसभा रिपब्लिकन पक्षाचे निवडणुकीत उमेदवार म्हणून भाषण देत असतांना ते कोसळले व त्यांचे परिनिर्वाण झाले. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळीतील आदर्श व धम्म आचरण व पंचशील तत्व स्वतः जीवनात राबवणारे बोधिसत्व आवळे बाबू हे आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनंतर एक महानायक आहेत.

बोधिसत्व हरिदास बाबू आवळे यांनी नागपूर येथील गव्हर्मेंट सायन्स कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले तर लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. सन 1940 ला समता सैनिक दलाचे सैनिक म्हणून त्यांनी आंबरडकरी चळवळीत व सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. ते एक उत्कृष्ट संघटक, संघटन कौशल्य असलेले नेतृत्व, उत्कृष्ट वक्तृत्व व नीतिमत्ता सर्वोच्च मानणारे त्यांचे गुण आजच्या पिढीला आदर्श दाखवणारे आहे. आवळे बाबूंची बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानावर अतूट निष्ठा होती. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचे ठरवले, त्या दिवसापासून ते पंचशील आचरण हे जीवनात तत्त्व मानून बौद्ध धर्मातील समर्पित सामाजिक उद्देश पूर्ती जी बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवुन दिलेली आहे. त्याकरिता स्वतःला झोकून देऊन जीव अर्पण करण्याची तयारी असणारे एक आदर्श नेतृत्व असणारे एक पुढारी होते. ते धार्मिक, सामाजिक व राजकीय हे तिन्ही अंग कुशलतेने चळवळी करिता सांभाळीत. परिनिर्वाणस्थ आवळे बाबू हे जिवंत असेपर्यंत समता सैनिक दलाचे अध्यक्ष होते.


बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनच्या सचिवपदी बोधिसत्व आवळे बाबू राहिलेले आहेत. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे 1969 ला ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. नागपूर येथील हायकोर्टाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धधर्म दीक्षाविधी ही अनधिकृत ठरवली व तसा आदेश देण्यात आलेला होता. त्यामुळे भारतातील धर्मांतरित बौद्ध व विशेषतः महाराष्ट्रातील धर्मांतरीत बौध्द जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या निकालाच्या आदेशात हायकोर्ट जस्टीस कोतवाल व गोखले म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर यांनी जी बौद्धधर्म दीक्षाविधी दिली होती ती धर्म दीक्षाविधी नाही. हा धर्म दीक्षाविधी नसून ती एक राजकीय सभा होती. नागपूर हायकोर्टचे मध्ये न्यायमूर्ती कोतवाल व गोखले यांच्या समक्ष आपल्या बयानात रिपब्लिकन पक्षाचे निवडुन आलेले डॉक्टर डी पी मेश्राम यांनी सांगितले की, “मी बौद्ध धर्मीय नाही तर महार आहे व हिंदू आहे.” नागपूरच्या हायकोर्ट बेंचचे न्यायमूर्ती कोतवाल व गोखले यांच्या निर्णय हा पुढील प्रमाणे होता. “आमच्या समोर आलेला सर्व धर्मविधी पुरावा मान्य करण्यासारखा आहे तरी हा धर्म दीक्षाविधी केल्याने एखादा मनुष्य व त्याचे कुटुंब पिढ्यानपिढ्या मनात असलेल्या धर्म सोडण्या करता विधिवत समर्थ आहे असे म्हणता येणार नाही. आम्हाला हे देखील समजू शकले नाही, कि ते मनुष्य धर्म कसा स्वीकारू शकतात?.. त्रिशरण पंचशील व 22 प्रतिज्ञा बद्दल बोलायचे झाल्यास आम्हाला असे वाटते कि ते फक्त या सामुदायिक सभेकरिता मुद्दाम बनविण्यात आले होते. आणि हे सर्व विधी महार जातीच्या लोकांच्या भावना उद्दीपित करण्याकरता म्हंटले गेले आहेत. डॉक्टर आंबेडकर सारख्या राजकीय पुढाऱ्यांकडून ही प्रेरणा दिली गेली होती. ही बाब लक्षात घेता आम्हाला असे वाटते की ही सभा धर्मदीक्षा समारंभ नव्हता”.

हायकोर्ट नागपूर बेंचने धर्मांतरित बौद्धांना बौद्ध म्हणणायस नाकारले होते. यावेळी निर्माण झालेल्या कठीण क्षणी “बोधिसत्व आवळे बाबूंनी” धर्मांतरित बौद्ध जनतेकडून एक एक रुपया जमवून व “स्वतःच्या राहत्या घरचे कौल आणि कौल विकला तरी चालेल” असे म्हणून दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात अपील केले. (सर्वोच्च न्यायालयाने) सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सी पी गजेंद्रगडकर, त्यांच्यासोबत के बी बांछु, एम हिदायतुल्ला, रघुवीर दलाल, मुधोळकर यांनी निर्णय दिला की, (1) दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वारे संपन्न झालेला समारंभ हा प्रामाणिक बौद्ध दीक्षा समारंभ होता. (2) एक उपासक म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षा देण्याचा अधिकार होता. कोणताही बौद्ध उपासक अबौद्ध माणसाला बौद्ध धर्माची दीक्षा देऊ शकतो व बौद्ध धर्म याला नाकारत नाही. (3) त्रिशरण पंचशील द्वारे बौद्धधर्म ग्रहण करण्याचे घोषणा सुद्धा धर्म परिवर्तन करण्यासाठी पर्याप्त आहे . डॉक्टर डी पी मेश्राम बौद्ध धर्मिय नाहीत व बौद्ध धर्म ही अनाधिकृत ठरवलेला हायकोर्टाने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला व बौद्ध धम्मदीक्षा विधी अधिकृत आहे असे ऑर्डर सुप्रीम कोर्टाने दिला.

जर बोधिसत्व आवळे बाबू सुप्रीम कोर्टात जाऊन लढले नसते तर आज आम्हीं धर्मांतरित बौद्ध हे अधिकृत बौद्ध म्हणून जीवन जगू शकत नव्हतो. त्यामुळे बोधिसत्व आवळे बाबूंचे भारतातील धर्मांतरित बौद्धांवर न फेडणारे हे ऋण आहे.
1970 साली रिपब्लिकन पक्षाच्या सरचिटणीस पदावरून बॅरिस्टर खोब्रागडे यांना बडतर्फ केले गेले होते. व रिपब्लिकन पक्षात फूट पडली होती. त्यावेळी आवळे बाबूंनी एकतेचा प्रयत्न चालविला होता. त्यावेळेस दादासाहेब गायकवाड विकलांग अवस्थेत होते व त त्यांना बरोबर बोलता येत नव्हते. त्यांच्या अवती भोवती असणारी मंडळी (म्हणजे गवई समर्थक) आवडे बाबूंचे समर्थन व नीतिमत्ता ओळखून होती. त्यांना वाटत होते की आवळे बाबूच्या प्रयत्नाला यश आले व रिपाई एक झाकी तर आपले यापुढे काही चालणार नाही. म्हणून दादासाहेब गायकवाड व आवळे बाबू यांना एकत्र येण्यास त्यांचा विरोध होता. ते आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष होते. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना पक्षातून काढल्यानंतर एकीकृत रिपाई होण्यासाठी बोधिसत्व आवळे बाबूंनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सोबत विचार विनिमय करून बोधिसत्व आवळे बाबूंनी बॅरिस्टर यांचे नेतृत्व मान्य केले व अध्यक्ष केले व स्वतः उपाध्यक्ष राहिले. राजकरण करतांना हा समजूतदार पणा यानंतर चळवळीत आजपर्यंत दिसलेला नाही. रिपब्लिकन पक्षात पडणाऱ्या फुटीला रोखण्यात काही अंशी बोधिसत्व आवळे बाबू सफल झाले होते. रिपब्लिकन पक्ष जनतेच्या पक्ष झाला पाहिजे यासाठीच आवळी बाबू आयुष्यभर राबत होते.

बाबू आवळे नागपूरच्या लोकसभेच्या निवडणुकीत उभे होते. त्यांनी प्रचारात स्वतःला झोकून दिले होते, त्यांची प्रकृती बरी नव्हती डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. परंतु बोधिसत्व आवळे बाबू म्हणत होते की “युद्ध सुरू असताना सेनापती घरी बसला तर सैन्याचे धैर्य खचते. मी रणांगण सोडून पडणारा सेनापती नाही आहे. त्यामुळे स्वतःची स्थिती गंभीर आजारी असताना बोधिसत्व प्रचार कार्यात लागले. पक्षाच्या उमेदवारांना जिकण्यासाठी झंझावती दौरे करू लागले. नागपूरला प्रचारसभेत बोलताना बोधिसत्व म्हणाले की, “लोक मला विचारतात की तुम्ही लोकसभेत गेल्यावर काय करणार? हे सांगण्यापेक्षा काय करणार नाही ते मी सांगतो. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर चळवळीला बेईमान होणार नाही. असे वाक्य उच्चारण करून ते भाषण देत असतानाच बोधिसत्व आवळे बाबू खाली कोसळले व कोमात गेले ते शेवटपर्यंत शुद्धीवर आले नाही. तो दिवस 2 मार्च 1971 हा होता. त्यांची प्रेतयात्रा न भूतो न भविष्यती अशी निघाली. यात्रेत बालकांपासून वृद्धांपर्यंत स्त्रिया पुरुष सर्व शांत होते. प्रेत यात्रा सुरू असताना नागपुरात धो धो पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही प्रेतयात्रा सोडून गेले नाही. बोधिसत्व परिनिर्वाणस्थ झालेले होते. अंतिम क्षणी बोधिसत्वला अग्नी देण्यास मुलाला बोलवा असे लोक म्हणाले त्यावेळेस बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे पुढे आले व बॅरिस्टर म्हणाले “की मी अग्नी देणार आहे” व कर्मवीर बोधिसत्व आवळे बाबूंना अग्नी बॅरिस्टर खोब्रागडे यांनी दिला. त्यावेळेस बौद्ध जनसमुदाय आवळे बाबूंचा जयजयकार करीत होती व म्हणत होती की बाबासाहेब आंबेडकर नंतर असा नेता झाला नाही व होणार नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत एक तत्वनिष्ठ कर्म करणारे, सिद्धांतवादी व पंचशील तत्व जीवनात उतरवून आयुष्य जगणारे व रिपब्लिकन पक्षाच्या भवितव्य उज्वल करू पाहणारे एक निर्भय सेनानी असे बोधिसत्व बाबू हरिदास आवळे यांचे आंबेडकरी बौद्ध चळवळीत महत्त्व होते व आहे.

14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षाभूमीच्या पवित्र जागेवर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म दीक्षा देऊन जी दीक्षा भूमी पवित्र केलेली होती. ती दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात यावी याकरता बोधिसत्व बाबू हरदास आवळे यांनी अतोनात प्रयत्न केले. ही पवित्र दीक्षाभूमी बौद्ध धर्माच्या धार्मिक कार्यासाठी मिळावे या हेतूने नागपूरच्या या दीक्षाभूमीवर दर पौर्णिमेला बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथाचे वाचन सुरू केले. सुरुवातीला स्थानिक पोलिस यंत्रणा या कार्यक्रमाची माहिती घेत होती. परंतु बुद्ध वंदना आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन होत आहे म्हणून पोलीस यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केले. 13 एप्रिल 1957 च्या रात्री तथागत भगवान बुद्ध यांची मूर्ती पवित्र दीक्षाभूमीवर बोधिसत्व हरिदास बाबू आवळे यांच्या नेतृत्वात बसवली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ही वार्ता नागपूर मधील सीताबर्डी पोलिस स्टेशनला कोणीतरी कळवली. पोलिसांनी आंबेडकरी चळवळीतील व रिपब्लिकन सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ नेत्यांना विचारले की, “दीक्षाभूमीवर बुद्धांची मूर्ती कोणी बसवली?” त्यावेळेस कोणत्याही पुढार्याने ही जी जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली नाही. पोलीस दीक्षाभूमीवरील स्थापित केलेली बुद्धांची मूर्ती जप्त करण्याच्या तयारीत असताना बोधिसत्व कर्मवीर बाबू हरिदास आवळे पोलिसांसमोर येऊन म्हणाले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध यांची ही मूर्ती दीक्षाभूमी येथे मी बसवली आहे. तुम्हाला जे काही कायदेशीर कार्यवाही करायची आहे ती माझ्यावर करा. व आवळे बाबूंनी बुद्धांची मूर्ती उचलू देण्यास विरोध केला. आवळे बाबू वर पोलिसांनी अतिक्रमणाची केस दाखल करून घेतली. त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य असताना बोधिसत्व आवळे बाबूनी विधान परिषदेत शासकीय ठराव आणून, दीक्षाभूमी बुद्धांच्या धार्मिक कार्यास देण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चार एकर जागा देण्याचे विधान परिषदेत जाहीर केले. विधान परिषदेचे चर्चा सुरू असतांना एका सदस्याने बोधिसत्व आवळे यांना एक प्रश्न केला की, “दीक्षाभूमि ची जमीन कोणाच्या नावे देण्यात येत आहे” त्यावर बोधिसत्व आवळे बाबूने सांगितली की, “ही पवित्र भूमी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया” (भारतीय बौद्ध महासभा) विद्यमान अध्यक्ष यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या संस्थेच्या नावे देण्यात यावे. यावर याला दादासाहेब भाऊराव गायकवाड यांनी त्या वेळेस मुख्यमंत्री यशवंत चव्हाण यांना बोलणी करून पाठिंबा दिलेला होता.

आधुनिक बुद्ध बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे निकटचे सहकारी व समता सैनिक दलाचे अध्यक्ष व आरपीआय चे प्रमुख नेते परिनिर्वाणस्थ बोधिसत्व कर्मवीर बाबू ऍड. हरिदास आवळे यांना त्यांच्या 62 व्या परिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!


दिनांक : 1 जुलै 2021 (संशोधित दिनांक 2 मार्च 2022)
उमेश गजभिये – समन्वयक प्रचारक

( समता सैनिक दल प्रणित “आंबेडकरी बौद्ध चळवळ”)
मो. 9326887326

 आ. उमेश गजभिये – समन्वयक प्रचारक* ( समता सैनिक दल प्रणित “आंबेडकरी बौद्ध चळवळ”) यांच्या फेसबुक पेजवरून – – –