November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

ऐसा सम्राट होणे नाही!

आपल्या सर्वांना अशोक विजयादशमीच्या मनःपूर्वक सदिच्छा….(१५ ऑक्टोबर २०२१)
प्रचंड महत्वाकांक्षी स्वभावामुळे प्रचंड मोठी स्वप्ने आणि ती पुरी करण्यासाठी हवे तेवढे कष्ट उपसण्याची तयारी असेल तर एखादा “सिकंदर” होऊ शकतो. मात्र या सिकंदरालाही चीत करणाऱ्या मौर्य वंशाचा वारसदार आणि पृथ्वी असेपर्यंत स्वतःचा झेंडा फडकावत ठेवणारा एखादाच “सम्राट अशोक” होऊ शकतो! हजारों राजांच्या गर्दीत, केवळ राज्यकारभार करून, शौर्य आणि विलासी आयुष्य जगणं या सम्राटाला मान्यच नव्हते, म्हणूनच त्यांचं आयुष्य जेवढे रंजक होते तेवढेच अनाकलनीय देखील…
सिर्फ़ हंगामा खड़ा करना मिरा मक़्सद नहीं
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए
सत्तेच्या राजकारणात, मगधाच्या गादीपासून त्यांना लांब ठेवण्यासाठी विदीशाला पाठविण्यात आले. मात्र तेथील कारभारही अतिशय सुरळीत हाताळत, आपल्या अधिकाऱ्यांना संयमाने वागवीत प्रशासन कायम केले. मगधला परत येणार इतक्यात, तक्षशिला येथील प्रांतात बंडाळी मोडून काढण्यासाठी त्यांना पाठविण्यात आले. हेतू हाच कि मगध पासून त्यांना लांब ठेवावे, मात्र ज्याने आपले ध्येय आधीच निश्चित केले होते, त्याने ही बंडाळी देखील एक सुवर्णसंधी म्हणून पहिली आणि चेतावणी दिली …
मुश्किलों से कह दो उलझा ना करे हम से,
हर हालात में जीने का हुनर आता है हमें
पुढे मगधची गादी काबीज केल्यानंतर देखील त्यांना चार वर्षे राज्याभिषेकासाठी वाट पाहावी लागली. मात्र हे चार वर्षे त्यांनी साम्राज्य बळकट करण्यासाठी आणि स्वतःचे अधिकार रुजविण्यात व्यतीत केले. छोटी मोठी बंडाळी त्यांनी मोडून काढली. त्यांचे ध्येय त्यांना खुणावत होते…
अभी तो असली मंजिल पाना बाकी है,
इरादों का इम्तिहान बाकी है,
अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन,
तोलना आसमान बाकी है
राज्याच्या सुरक्षितेसाठी आणि संपूर्ण साम्राज्य भक्कम करण्यासाठी, कलिंगवर स्वारी करणे गरजेचे होते. हे मौर्य साम्राज्याच्या प्रति, एक राजा म्हणून त्यांचे दायित्व होते. मात्र झालेला नरसंहार क्लेशकारच नव्हे तर विभत्स देखील होता. कधीकाळी विदिशामध्ये असताना, देवीशी बोलताना बुद्धविचारांशी आलेला संबंध, हा युद्धविनाश पाहिल्यावर उफाळून आला आणि या बुद्धविचारांप्रती सम्राट नतमस्तक झाले…
उठो तो ऐसे उठो, फक्र हो बुलंदी को,
झुको तो ऐसे झुको, बन्दगी भी नाज करे
बुद्धविचारांना समर्पित होऊन, कधीही युद्ध न करण्याची घोषणा या सम्राटाने केली. तलवार म्यान केली पण साम्राज्याच्या सुरक्षेला कधी गालबोट लागू दिले नाही. संपूर्ण आयुष्य धम्माला समर्पित करीत आपल्या प्रजेला देखील हा मानवतेचा मार्ग दाखविला. कारण त्यांना माहित होते, आयुष्य हे एकदाच मिळते. या आयुष्यातील मानमरताब, हार-तुरे, सारे क्षणिक मात्र केलेल्या कार्याचा नेहमीच आदर केला जातो…
दुनिया में वही शख़्स है ताज़ीम के क़ाबिल
जिस शख़्स ने हालात का रुख़ मोड़ दिया हो
भ.बुद्धांच्या आयुष्याशी निगडित सर्व स्थळे त्यांनी शोधून काढली आणि तेथे योग्य असे स्मृतिस्थळे बनवली. कधी स्तूप, कधी स्तंभ तर कधी विहार बांधून काढली. लोकांना समजावे म्हणून सर्व घोषणा आणि लोककल्याणाची कामे सर्वात पहिल्यांदा दगडावर कोरली. श्रमणांसाठी दगडात लेणीं कोरून घेतली आणि ती दान दिली. मनुष्यांबरोबरच जनावरांसाठी देखील हा सम्राट राबला. सर्वसामान्यांपासून ते शेतकरी, व्यापारी, प्रवासी, श्रमण आणि इतर राजांसाठी ते आदर्श होते. लोककल्याणासाठी हा सम्राट इतका आतुर होता कि मी झोपलेलो असेल किंवा जेवत असेल तरी लोकांच्या तक्रारीसाठी मला भेटावे असा आदेश काढला…
आये हो निभाने को जब, किरदार ज़मीं पर,
कुछ ऐसा कर चलो कि ज़माना मिसाल दे
सम्राटांच्या या कार्यामुळे अनेक देशांचे राजे त्यांचे अनुकरण करू लागले. बुद्धविचार अबाधित राहावे म्हणून सम्राटांनी धम्मसंगिती भरविली. विनय न पाळणाऱ्या भिक्खूंना निष्कासित केले. धम्माच्या प्रसारासाठी स्वतःची मुले – महिन्द आणि संघमित्त यांना परदेशात पाठविले. मानवता हे ब्रीदवाक्य असणाऱ्या बुद्धविचारांचा लाभ, इतरांनाही मिळावा म्हणून सम्राट नेहमी दक्ष असे…
अंदाज़ कुछ अलग ही हे मेरे सोचने का,
सब को मंज़िल का शौक़ है, मुझे रास्ते का
सद्धम्माच्या वाटेवर चालताना, सम्राटांनी कधीही विरोध करणाऱ्यांची फिकीर केली नाही. जे चांगले आहे, सर्वांच्या हिताचे आहे, त्याचा स्वीकार केला. जे कुणाच्याही हिताचे नाही, त्याला नष्ट करायला ही मागेपुढे पहिले नाही.
परवाह नहीं चाहे जमाना कितना भी खिलाफ हो,
चलूँगा उसी राह पर जो सीधी और साफ हो
संपूर्ण साम्राज्यावर प्रचंड पकड असलेल्या सम्राटांची नजर सर्वत्र होती. लोककल्याणाची कामे करीत असताना, शेतकरी, व्यापारी, परदेशातून आवक जावक आणि त्यांचे कर संकलन यावर त्यांचे बारीक लक्ष होते. कलिंग युद्धानंतर सम्राटांना कधीही परत तलवार बाहेर काढावी लागली नाही. त्यांचा दरारा एवढा होता कि त्यांच्या मृत्युपरान्त देखील कोणी मगधावर हल्ला करावयास धजला नाही. कपटाने मगध राज्य बळकावणाऱ्या शुंगाने नंतर बौद्ध भिक्खूंना बराच त्रास दिला. सम्राटांनी केलेली सर्व कामे रदबदल करायला सुरुवात केली कारण शुंग वैदिक विचारांचा पुरस्कर्ता होता. ज्या सम्राटाने या देशाला लिखाणाची मातृलिपी असलेली धम्मलिपि दगडात कोरून अभ्यासासाठी ठेवली, ज्याने दगडामध्ये लेणीं कोरून नवीन स्थापत्यकला निर्माण केली, ज्याने आखीव रेखीव स्तंभ, स्तूप आणि विहारे बनवली व शिल्पाकृतींचे उत्कृष्ट मांडणी केली, ज्याने मनुष्यांबरोबरच जनावरांची देखील काळजी घेतली, त्यांच्या अद्वितीय कार्याचा विसर इथल्या राजांना, इतिहासकारांना पडावा? कदाचित सम्राटांना हे माहित होते…
मेरा यही अंदाज ज़माने को खलता है.. की
मेरा चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है
२०व्या शतकात जेम्स प्रिन्सेप नावाच्या अवलियाने सम्राटांना शोधून काढले ते त्यांच्या शिलालेखांचे वाचन करून! १७०० वर्षे इथल्या व्यवस्थेने ज्यांचा अनुल्लेख करून, त्यांच्या कार्याकडे डोळेझाकपणा केला, त्याच सम्राटांचा आज जगभर उदोउदो होत आहे! जगातील “सम्राटांचा सम्राट” म्हणून उल्लेख होत आहे!
ज़माना एक दिन मुझको इन्हीं लफ़्ज़ों में ढूँढेगा,
वो हर एहसास जो लफ़्ज़ों में ढाला, छोड़ जाऊँगा मैं
सम्राटांनी लिहिलेल्या शिलालेखांवरून प्राचीन भारतासह तत्कालीन इतर राज्यांचा देखील राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक इतिहास कळतो. आपल्या सदतीस वर्षांच्या राज्यकारभारातील प्रत्येक दिवस सम्राट परिपूर्ण जगले. आपल्या आयुष्याचे उदाहरण करीत, आयुष्य कसे जगावे याचा परिपाठ, आजही त्यांनी बांधलेल्या वास्तूत ‘जिवंत’ आहेत!
मुश्किल नही है कुछ दुनिया में,
तू जरा हिम्मत तो कर,
ख्वाब बदलेंगे हकीकत में,
तू जरा कोशिश तो कर
अशोक विजयादशमीच्या निमित्ताने, साम्राटांचा सम्राट यांना अभिवादन!
अतुल मुरलीधर भोसेकर
९५४५२७७४१०