“बौद्ध साहित्य प्रसारक मंडळ” आज (१३ ऑक्टोबर) २० वर्षांची झाली!!
मंडळ स्थापन करण्यापूर्वी जवळपास पाच एक वर्ष नाशिक मधील बौद्ध धम्म प्रसाराच्या परिस्थितीचा अभ्यास चालू होता. बौद्ध संस्कृतीच्या प्रसारासाठी एखादी संस्था काम करते का आणि करत असल्यास त्या संस्थेमार्फत काम करावे असा विचार केला, मात्र तसे दिसत नसल्यामुळे, हे मंडळ १३ ऑक्टोबर २००१ रोजी आकारास आले. संस्था स्थापन करण्याची तारीख लक्षात घेता ती कशासाठी स्थापन झाली असावी हे लक्षात येते!
सुरुवातीच्या काळात नाशिक, पुणे, मुंबई येथील सर्वच मित्रांचे खूप सहकार्य लाभले आणि अनेक उपक्रम राबविण्यात आले. जसे जसे संस्थेचे कार्य वाढत गेले तसे तसे भारतातील अनेक मित्र जोडले गेले आणि आता तर अनेक देशांतील मित्रपरिवार हा संस्थेचा एक खंबीर सोबती झाला आहे.
या २० वर्षांचा लेखाजोखा –
१. मूळ बुद्ध विचार असलेल्या पालि भाषेचा अभ्यास व प्रसार करणे – संस्थेने उत्तर महाराष्ट्रातील पहिले “पालि भाषा वर्ग” हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पालि विभागाच्या साह्याने नाशिक मध्ये सुरु केला. आजपावेतो शेकडो विद्यार्थी पालि भाषा शिकले असून अनेक जण PhD झाले आहेत. संस्थेत शिकलेल्या काही विद्यार्थ्यांनी आज नाशिक तसेच पुणे व मुंबई मध्ये अनेक ठिकाणी पालि भाषेचे वर्ग सुरु केले व पालि भाषेचा प्रसार होऊ लागला. या मुळे संस्थेचे उद्दिष्ट सध्या होण्यास मदत होऊ लागली.
– आजही कोरोनाच्या काळात ऑनलाईन पालि भाषेचे वर्ग संस्था घेत असून, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
– सध्या गल्फ देशांत (दुबई, कतार, अबू धाबी, इत्यादी) देखील पालि भाषेचे वर्ग सुरू केले आहेत!
– सर्वसामान्यांना पालि भाषेचे आकर्षण निर्माण व्हावे म्हणून संस्थेने भारतातील पहिले पालि मराठी द्विसंवादातील नाटक सादर केले व सुत्त पिटकातील भ.बुद्धांचे विचार सर्वसमान्यांपर्यंत पालि भाषेत पोहचविण्याचे काम केले. या नाटकाचे प्रयोग अनेक शहरात झाले. या नाटकाची थीम घेऊन आज अनेक हौशी कलाकार असे नाटक करण्याचे प्रयत्न करतायेत हे संस्थेचे यश होय.
२. भारतात पहिल्यांदा सम्राट अशोकांनी ज्या लिपि मध्ये लेख लिहिले ती ब्राह्मी नसून “धम्मलिपि” आहे हे संस्थेने पुराव्यानिशी सिद्ध केले आणि अनेक परिसंवादातून आणि चर्चेतून मांडले. यासाठी अनेक लिपीतज्ञ, इतिहासकार, पुरातत्वविद यंच्याशी वादविवाद पण झाले मात्र संस्थेने मांडलेले ऐतिहाडीक आणि व्याकरणीक मुद्दे आजपर्यंत कोणी खोडू शकले नाही.
– धम्मालिपीचेच्या प्रसारासाठी नाशिकमध्ये कार्यशाळा घेतली व त्यायोगे नाशिक मधील २५०० विध्यार्थ्यांना ती शिकवली. या कार्यासाठी संस्थेने जो जागतिक विक्रम स्थापन केला त्यासाठी संस्थेला “लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स” चे मानांकन मिळाले.
– या लिपिच्या प्रसारासाठी “इयं धम्मलिपि” हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
– संस्थेच्या कार्यशाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी आज नाशिक, पुणे व मुंबई मध्ये वैयक्तिक रित्या धम्मलिपिचे वर्ग घेतायेत व संस्थेचे कार्य पुढे नेताना दिसतात.
– धम्मलिपि चे वर्ग आज अनेक राज्यांत, अनेक संस्था आणि मित्रांनी सुरू केले आहेत
– दोन वर्षांपूर्वी बालभारती पाठ्यपुस्तक महामंडळाच्या १२वीच्या पालि भाषा पुस्तकात धम्मलिपि वर्णमालेचा समावेश करण्यात आला. संस्थेने धम्मलिपि च्या प्रसारासाठी १० वर्षे घेतलेल्या कष्टाचे हे फळ म्हणावे लागेल!
– जेम्स प्रिन्सेप यांनी सर्वात पहिल्यांदा सम्राट अशोक यांच्या शिलालेखांचे लिप्यांतर केले. त्यांची जयंती ही “विश्व धम्मलिपि
गौरव दिवस” म्हणून साजरा करावा असे आवाहन संस्थेने याच वर्षी केले आणि त्याला संपूर्ण भारतातून प्रतिसाद मिळल्स.
– आजमितीला धम्मलिपि संपूर्ण भारतात आणि जगभरात पोहोचली आहे. येणाऱ्या काळात भारतात प्रत्येक विद्यापीठात धम्मालिपीचा अभ्यासक्रम सुरू होईल अशी आशा करू यात.
३. बुद्ध विचार असलेल्या काही प्राचीन ग्रंथ नेवारी, तिबेटी, सिंहली, थाई, बर्मिज, कंबोडियन, इत्यादी लिपि व भाषेंमध्ये असून ते ग्रंथ भारतीय भाषेमध्ये उपलब्ध नाही. संस्थेने नेवारी लिपिची कार्यशाळा घेऊन, ७व्या शतकातील “धारणीसंग्रह” ग्रंथ नागरी लिपीत लिप्यांतरित केला जो National Mission for Manuscripts (NMM) या केंद्रशासित संस्थेने प्रकाशित केला आहे.
– दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या लिपि कार्यशाळेत आमच्या विद्यार्थ्यांनी, ११व्या शतकातील दोन अप्रकाशित ग्रंथ – “कलापवृत्ती” आणि “काशिकावृत्ती” जे शारदा लिपि आणि संस्कृत भाषेत आहेत, ते नागरी लिपि मध्ये लिप्यांतरीत केले आहेत. लवकरच हे ग्रंथ राष्ट्रीय पाण्डुलिपि संस्थेच्या (NMM) वतीने प्रकाशित केले जाणार आहे.
४. बुद्धलेणीं या बौद्ध संस्कृतीचे अविभाज्य अंग असून त्यांच्या अभ्यासाने त्याकाळातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक व राजकीय इतिहास समजण्यास मदत होते म्हणून संस्थेने उत्तर महाराष्ट्रातील सर्वात पाहिलं “Buddhist Archaeology’ हा ६ महिन्यांचा डिप्लोमा कोर्स सुरु केला. आतापर्यंत हा विषय पुरातत्व विद्यालयात देखील शिकविला जात नव्हता. बुद्ध लेणी कशी पाहावी, त्यातील शिल्पांचा अभ्यास कसा करावा हा या अभ्यासक्रमाचा विषय होता.
– आज हा अभ्यासक्रम अनेक विद्यापीठांत सुरू झाला आहे हे संस्थेचे यश म्हणावे लागेल.
– संस्थेची सभासद, मैत्रेयी भोसेकर, पुरातत्वविद हिने दोन वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील एक प्राचीन बुद्धलेणी शोधून काढली. लौकरच तिचा हा शोधप्रबंध एका आंतरराष्ट्रीय पत्रिकेत प्रसिद्ध होत आहे. ही बुद्ध लेणीं दुसऱ्या शतकातील (म्हणजे १९०० वर्षांपूर्वीची) शतकातील आहे.
– बुद्ध लेणींची ओळख सर्वसामान्य लोकांनी व्हावी यासाठी महाराष्ट्रातील सर्व बुद्ध लेणींवर पुस्तकांची शृंखला प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यातील पहिले पुस्तक म्हणजे “त्रिरश्मी बुद्ध लेणी” ज्याला वाचकांनी भरपूर प्रसिद्धी दिली. ही सर्व शृंखला मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये लिहिली जाणार आहेत.
– नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणींच्या संवर्धासाठी संस्थेने विशेष पुढाकार घेतला व आज या लेणींचे चांगले संगोपन होत आहे.
– महाराष्ट्रातील अनेक लेणींचे संवर्धनासाठी संस्थेशी संलग्न असलेल्या अनेक युवा ग्रुप, संस्था आणि व्यक्ती कार्यरत आहेत व त्यांच्या माध्यमातून अनेक लेणींचे संवर्धनासाठी पाठपुरावा झाला आहे.
– प्रत्येक महिन्यातील एका रविवारी संस्थेतर्फे त्रिरश्मी बुद्ध लेणीवर किंवा महाराष्ट्रातील एखाद्या बुद्ध लेणींवर विनामूल्य कार्यशाळा आयोजित केली जाते.
५. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बुद्ध विचार प्रसार कारण्याहेतू संस्थेने गेल्या वीस वर्षात नाशिकसह महाराष्ट्र व परदेशातही प्रवचन, व्याख्यान व कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.
६. दर वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत अनेक मान्यवर विचारवंतांची व्याख्याने नाशिकमध्ये आयोजित केली आहेत.
– या वर्षी कोरोनाच्या काळात संस्थेने अनेक विद्वान मान्यवरांची व्याख्यानमाला आयोजित केली होती ज्याचे भारतातून आणि परदेशातील अनेक मित्रांनी स्वागत केले आहे.
७. देश आणि विदेश येथील अनेक बौद्ध भिक्खू, विचारवंत, साहित्यिक, बुद्ध विचाराचे तत्वज्ञ, इतिहासकार, शिक्षक, प्राध्यापक, पुरातत्त्वशास्त्रज्ञ, लिपीतज्ञ, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, राजकीय व्यक्ती, अनेक महापौर, जिल्हाधिकारी, आयुक्त, वर्तमानपत्र संपादक, पत्रकार यांनी संस्थेला वेळोवेळी त्यांच्या अनुभवाचे, विचारांचे सहकार्य केले आहे.
८. भ.बुद्धांच्या सहवास आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक स्थळांचा अभ्यासाहेतु संस्था दरवर्षी एक अभ्यास सहल आयोजित करीत असते.
९. संस्थेने “आदर्श श्रामणेर शिबीर” त्रिरश्मी बुद्ध लेणीच्या पायथ्याशी आयोजित केली. भ.बुद्धांच्या काळी असलेले सगळेच नियम या श्रामणेर शिबिरात ओआळण्यात आले. त्यावेळेस नाशिकच्या विशेषतः आडगांव, ओझर, ब्राह्मणगाव येथील तरुणांनी व त्यांच्या पालकांनी खूप साथ दिली.
हा संस्थेच्या थोडक्यात आढावा घेतला आहे. या वीस वर्षात अनेक लोकांनी विशेषतः नाशिककरांनी मनापासून साथ दिली. अनेक मान्यवरांनी संस्थेला गौरविलेले आहे.
या सर्व कामात संस्थेला कुठल्याही सरकारी अथवा निमसरकारी विभागाची आर्थिक मदत झाली नाही किंबहुना संस्थेने तसे प्रयत्न देखील केले नाहीत. काही मित्रांनी मात्र आर्थिक मदत केली आणि त्यांच्या भावनेचा मान राखत संस्थेने अतिशय विनम्रपूर्वक त्याचा स्वीकार केला आहे.
संस्थेला स्वतःची जागा नाही मात्र त्यामुळे कुठे काहीही अडले नाही. बहुतेक वेळा घरातून किंवा चहा टपरीवर चहाचे कप रिचवत अनेक कार्यक्रमांचे नियोजन संस्थेचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी केले आहे!
गेल्या वीस वर्षात आपण सर्वांनी संस्थेला भरभरून प्रेम दिले आहे, हवे तेव्हा सहकार्य केले आहे. हे प्रेम असेच अबाधित राहावे म्हणून ही उजळणी!
संस्थेचे कार्य आपल्या सर्वांच्या साथीने योग्य दिशेने चालले आहे. इथून पुढेही आपली साथ असणारच आहे….हे प्रेम असेच वृदिंगत व्हावे ही विनंती.
“बौद्ध साहित्य प्रसारक मंडळ” सर्व विश्वस्त, सहकारी, विद्यार्थी आणि मित्र परिवार
More Stories
बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र स्थळावर हिंदूंच्या ‘नियंत्रण’ विरोधात निषेधाचा भडका
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबईमध्ये शांतता रॅली संपन्न
सिक्कीम बौद्ध शिष्टमंडळ महाबोधी विहाराच्या नियंत्रणाच्या मागणीसाठी आंदोलनात सामील झाले