१९४८ साली जिनिव्हा घोषणेत जागतिक आरोग्य संघटनेने “हिप्पोक्रॅटीक प्रतिज्ञा” जाहीर केली. आधुनिक वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यावर एक नैतिकता म्हणून ही प्रतिज्ञा घेतली जाते. या जागतिक प्रतिज्ञे ऐवजी “आचार्य चरक शपथ” घ्यायचा घाट सध्याचे आरोग्य मंत्रालय घालत आहे! मुळात हिप्पोक्रॅटीक प्रतिज्ञा बदलून, ऐतिहासिक किंवा पुरातत्त्वीय पुरावा नसलेले चरक यांची प्रतिज्ञा घेण्याची काहीही गरज नाही. चरक हे कसे आभासी पात्र आहे हे माझ्या एका मागील लेखात लिहिले आहेच!
भ.बुद्धांना भैषज्यगुरु, वैद्य अशा अनेक विशेषणांनी गौरविलेले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बुद्धांनी मनाच्या आरोग्या बरोबरच शरीराच्या आरोग्याविषयी देखील देशना दिली आहे. विनय पिटक तसेच अंगुत्तर निकाय आणि संयुत्त निकाय मधून बुद्धांनी आजाऱ्यांविषयी करुणा व्यक्त केली, आजाऱ्यांची सेवा करावी असे निक्षून सांगितले आहे. बुद्धांच्या या देशनेमुळे वैद्यकशास्त्र हे खूप विकसित झाले. त्याच काळात जे वैद्य होते ते एक प्रतिज्ञा घेत. “वेज्जवतपद” म्हणजेच वैद्याची प्रतिज्ञा. विनय पिटक, अंगुत्तर निकाय, संयुत्त निकाय आणि धम्मपद मधील काही सुत्तांचे संकलन या प्रतिज्ञेत आहे. केवळ ७ मुद्द्यांची ही प्रतिज्ञा, आजाऱ्याच्या प्रति वैद्याचे काय दायित्व असावे हे स्पष्ट करते. ही प्रतिज्ञा पालि भाषेत खालील प्रकारे आहे –
वुत्तानि हेतानि भगवता,“आरोग्यपरमा लाभा”ति चेव: “यो मम उपट्ठहेय्य सो गिलानं उपट्ठहेय्या”ति च
१. अहम्पि आरोग्यपरमा लाभा’ति मट्टामि, तथागतं उपट्ठातुकामोम्हि, तस्माहं मय्हं वेज्जकम्मेन आरोग्यभावं वड्ढेमि चेव गिलानं हिताय दयेन अनुकम्पाय उपट्ठहामि
२. पटिबलो भविसामि भेसज्जं संविधातुं
३. सप्पायासप्पायं जानिस्सामि, असप्पायं अपनामेस्सामि; सप्पायं उप्पनामेस्सामि, असप्पायं नापनामेस्सामि
४. मेत्ताचित्तो गिलानं उपट्ठाहिस्सामि नो आमिसन्तरो
५. अजेगुच्ची भविस्सामि, उच्चारं वा पस्सावं वा वन्तं वा खेलं वा नीहरितुं
६. पटिबलो भविस्सामि, गिलानं कालेन कालम, धम्मिया कथाय सन्दस्सेतुं समादपेतुं समुत्तेजेतुं संपहंसेतुं
७. सचे गिलानं सप्पायभोजनेहि वा सप्पायभेसज्जेहि वा सप्पायूपट्ठानेन वा न उट्ठाहेय्य, अहम्पि खो तस्स गिलानस्स अनुकम्पाय पटिरूपो उपट्ठको भविस्सामि’ति
वरील प्रतिज्ञेचा अर्थ असा आहे –
भगवान म्हणाले,”आरोग्य हे परम लाभदायक आहे”. ते पुढे म्हणाले,” ज्याला माझी सेवा करायची असेल, त्याने आजाऱ्याची सेवा करावी “.
१. मलाही वाटते कि आरोग्य हे परम लाभदायक आहे आणि मी बुद्धांची सेवा करीन. म्हणून मी माझे कौशल्य सर्व आजाऱ्यांच्या हितासाठी, दयेने, करुणेने आणि अनुकंपाने करीन.
२. मी योग्य औषधे बनवीन
३. मला माहितेय योग्य औषध कोणते आणि अयोग्य कोणते. मी फक्त योग्य औषध देईन, अयोग्य नाही.
४. मी आजाऱ्यांची सेवा मनोभावे प्रेमाने करीन, काही मिळविण्याच्या इच्छेने नाही.
५. मी अतिशय तटस्थपणे मल, मूत्र, वांती किंवा थुंकीचे परीक्षण करीन
६. वेळोवेळी मी आजाऱ्यांना धम्माच्या विचाराने मार्गदर्शन, प्रेरणा, प्रोत्साहन आणि आनंद देईन.
७. जरी मी एखाद्या मृत्युपंथाला लागलेल्या आजाऱ्याला योग्य भोजन, योग्य औषधे आणि योग्य शुश्रूषा देऊ शकलो नाही तरीही मी त्याची करुणेने सेवा करीन (म्हणजे जरी मी आजाऱ्याला वाचवू शकलो नाही, तरी शेवटपर्यंत मी त्याची सेवा करीन).
बुद्ध एके ठिकाणी म्हणतात,”अपि च गिलानुपट्ठाका बहूपकारा” (विनय पिटक, खंड १) म्हणजेच जे आजाऱ्यांची सेवा करतात ते सर्वांच्या उपयोगाचे असतात.
बुद्धकाळात वैद्यांना एक प्रतिष्ठा प्राप्त होती. मुख्य म्हणजे बुद्धांचे जे करुणेचे विचार होते त्याच कारुण्याने वैद्य रुग्णांची सेवा करीत. एवढेच काय तर “वेज्जवतपद” यातील शेवटची प्रतिज्ञा स्पष्ट सांगते कि जरी हा रुग्ण दगावणार हे माहित असले तरीही वैद्याने शेवट पर्यंत, अत्यंत करुणेने त्याची सेवा करावी!
या उलट, वैद्यांना सूचना देताना, सुश्रुत म्हणतात – जर एखादा आजारी व्यक्ती मृत्युपंथाला लागला असेल तर वैद्याने त्याला कुठलेही उपचार करू नये व तेथून निघून जावे, नाहीतर रोग्याच्या मृत्यूने त्या वैद्याच्या प्रतिष्ठेला डाग लागेल! (सुश्रुत संहिते; २७)
मग खऱ्या अर्थाने “वेज्जवतपद” ही प्रतिज्ञा योग्य आहे कि चरक, सुश्रुत सारखे मिथक पात्राच्या नावाची प्रतिज्ञा योग्य आहे?
अतुल भोसेकर
९५४५२७७४१०
More Stories
पुरातत्त्वीय दिवाळखोरी – बुद्ध लेणींचे रूपांतर…!
दक्षिण कोरियाचा बौद्ध धर्म Buddhism in South Korea
राजर्षी शाहू छञपतींचा आज स्मृतीदिन !