July 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ७

भाग – ७
जातिव्यवस्थेचे निर्मूलन : अनुवादाच्या निमित्ताने

परिणामी अमेरिकेत ‘दि जर्नल ऑफ दि सोशियोलॉजी’ या मासिकात या निबंधाची दखल घेतली. त्यावरून त्यांच्या बुद्धीचा आणि संशोधनाचा आवाका दिसून येतो. हा प्रबंध ९ मे १९१६ रोजी सादर केला गेला. त्यावेळी डॉ. आंबेडकरांचे वय अवघे २५ वर्षांचे होते. अमेरिकेत असताना त्यांनी सर्व सामाजिक (विशेषतः अर्थशास्त्र व समाजशास्त्र) शास्त्रांच्या मागे असणा-या तत्त्वावर आपला अधिकार सिद्ध केलेला होता असे म्हणता येईल, कारण अमेरिकेतील ‘जर्नल ऑफ दि सोशियोलॉजी’ या मासिकाने ‘आजचे नवे ज्ञान’ म्हणून या निबंधाची दखल घेऊन नोंद केली. तेथे भीमराव रामजी आंबेडकर एक स्कॉलर, एक जिनियस म्हणून मान्यता पावले, तोपर्यंत ते एक विद्वान आहेत हे भारताच्या गावीही नव्हते. दुसरा प्रसंग इंग्लंडच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पोलिटिकल सायन्स या संस्थेने डी. एस्सी. साठी ‘दि प्राब्लेम ऑफ दि रुपी’ हा प्रबंध प्रा. कॅनन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. या प्रबंधाच्या निमित्ताने ब्रिटिशांनी भारताची कशी लूट केली आहे हे सिद्ध केले. त्यामुळे विद्यापीठातील मंडळी चिंतेत पडली. प्रबंधाच्या निष्कर्षात काही बदल होतो का, याचा एक विचार पुढे आला. त्यासाठी खास तज्ज्ञांच्या समितीसमोर संशोधक विद्यार्थी भीमराव रामजी आंबेडकर यांनी आपली बाजू मांडली व त्यातील निष्कर्ष हे माझ्या अभ्यासातून पुढे आले आहेत. त्यात मी कुठलाही बदल करणार नाही’ हे निक्षून सांगितले. ‘पदवी नाही दिली तरी चालेल’ या बाणेदार उत्तराने ज्ञानावर निष्ठा असलेले आंबेडकर दिसले. त्यानंतर त्यांनी या शोधनिबंधासंबंधी भाषणही दिले. त्यातही त्यांच्या ज्ञाननिष्ठेबद्दलचा प्रत्यय आला आहे. पुढे ते बुद्धिमान असल्याचा शोध भारताला लागला. म्हणजे जगाच्या क्षितिजावर तळपल्याशिवाय त्यांची दखलच घ्यावयाची नाही, असे जणू भारतातील लोकांनी ठरवूनच टाकले होते ! जातिव्यवस्थेने नाकारलेले व त्यात होरपळून निघालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील एक उदाहरण म्हणून सांगता येईल.

हे भाषण वाचत असताना त्यांचा बहुश्रुतपणा नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. मानववंशशास्त्र, इतिहास, साहित्य, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, शरीरशास्त्र, मानसशास्त्र, संस्कृती व भाषा या सर्व ज्ञानशाखांचा त्यांचा अभ्यास अचंबा वाटण्यासारखा आहे. समाज म्हणजे काय, जातीचे स्वरूप आणि चारित्र्य कोणते, कोणत्या वंशाच्या मानवी शरीराची ठेवण कशी असते, जगभरातील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नेमका कसा आहे, लोकशाही समाजव्यवस्था म्हणजे कशी व्यवस्था, समाजाच्या घडणीत इतिहास आणि अर्थव्यवस्था यांचा वाटा कोणता असतो यासारख्या प्रश्नांची जेव्हा ते चर्चा करतात, तेव्हा अनेक ज्ञानशाखांमधील संदर्भ सहज प्रकट होत जातात. त्यांच्या लेखनाचे स्वरूप खंडन-मंडनपर असून आपली मते मांडून खंडनही तेवढ्याच बौद्धिक प्रामाणिकपणाने ते करतांना दिसतात.

🔹संकलन – नितीन संतोष पिंपळीसकर