November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ४

भाग – ४

जातिव्यवस्थेचे निर्मूलन अनुवादाच्या निमित्ताने

अस्पृश्यता, भेदभाव, उच्च-नीच या भावना नष्ट करण्यासाठी त्यांची निर्मिती करणारे घटक व ती संस्कारित करणारी यंत्रणा आपल्याला नष्ट करावी लागेल, जातिव्यवस्थेचा हा पाया स्पष्ट करून तो उद्ध्वस्त करण्याची गरज त्यांनी येथे प्रतिपादन केली आहे.

केवळ सहभोजन, आंतरजातीय विवाह एवढ्यानेच जातिव्यवस्था नष्ट होणार नसल्याने

जातीची व भेदभावाची मानसिकता घडविणा-या, विषमतेचा पुरस्कार करणा-या धार्मिक

ग्रंथांना नकार हाच खरा जाती नष्ट करण्याचा मार्ग असल्याचा निष्कर्ष त्यांनी या भाषणाच्या

शेवटी केला आहे. हा मूळ गाभा जातिव्यवस्थेचे निर्मूलन करणारा असल्याचे आपले मत

त्यांनी अनेक पद्धतीने बौद्धिक पातळीवरून मांडून ते स्वीकारण्याचे आवाहन या परिषदेच्या

निमित्ताने केले आहे. तत्कालीन समाजसुधारकांपेक्षा हे मत अर्थातच मोठेच क्रांतिकारक

आहे. ज्यांना वेद हे प्राणापेक्षाही प्रिय आहेत आणि परंपरेवरच ज्यांची मदार आहे,

त्यांच्यासाठी ही सारीच मते स्फोटक न ठरली तरच नवल होते ! हे भाषण न होण्यामागे

जुनाट संस्कारांनी संस्कारित झालेली मनोवृत्तीच कारण आहे, हे स्पष्ट होते.

या भाषणाची पार्श्वभूमीही यानिमित्ताने विचारात घेण्यासारखी आहे. ही परिषद भरविणारी मंडळी ही आर्यसमाजाची आहेत. उत्तरेकडे स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेल्या हिंदू धर्म सुधारण्याचा हा एक मार्ग शोधला होता. पुढे विवेकानंदांमुळे त्याला काही अभ्यासक ‘नवहिंदुवाद’ म्हणून संबोधू लागले होते. स्त्री आणि शूद्रांना वेदपठणाचा व पौरोहित्य करण्याचा अधिकार नसणे ही बाब काळाशी सुसंगत नसल्याने आर्यसमाजाने स्त्री शूद्रांना हा अधिकार असल्याचे म्हटले व त्याची अंमलबजावणी आर्यसमाजाच्या धार्मिक विधीमध्ये करण्यास सुरूवात केली. त्यांचा हा मार्ग एका अर्थाने हिंदूधर्माच्या इतिहासाकडे बघितले तर मोठा क्रांतिकारक मार्ग होता असे म्हणावे लागेल. परंतु त्यात वेद हे अपौरुषेय आहेत व ते पवित्र आहेत. त्यांच्याप्रति श्रद्धा व निष्ठा व्यक्त करताना त्यांनी त्यातील विषमताप्रणीत विचाराचा जो भाग आहे त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे व्यवहारात अस्पृश्यता पाळायची नाही पण उच्चनीचतेचे समर्थन करणारे, अप्रत्यक्षरीतीने जातींचे समर्थन करणारे वेद हे पवित्र मानायचे, त्यांना पवित्र धर्मग्रंथाचा दर्जा द्यायचा, ते अपौरुषेय आहेत असे म्हणायचे. यात एक विसंगती होती; नव्हे तीव्र आंतरविरोध होता. ही विसंगती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि विलक्षण पद्धतीने दाखवून दिली. परंतु ही बाब वेदांना पवित्र मानणा-या आर्यसमाजी सुधारकांना पटणे शक्यच नव्हती. हे सर्व विवेचन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसने विज्ञानवादी, सर्वकष धर्मसुधारणावादी चळवळी कशा मोडून काढल्या, ते ऐतिहासिक आधार घेत सप्रमाण सिद्ध केले.

🔹 संकलन – नितीन संतोष पिंपळीसकर