भारतात लेणी स्थापत्य कोरण्याची सुरूवात प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक आणि त्यांचे नातू दशरथ यांच्यापासून झाली
आजीविक , जैन बौध्द आणि ईतर पंथांसाठी बिहार प्रांतातील गये जवळील बराबर आणि नागार्जुनी टेकडयांवर इ स पूर्व तिसर्या शतकात लेणी कोरयला सुरुवात झाली. लेण्यातील प्राप्त झालेल्या शिलालेखावरुन त्यांचा काळ ठरविण्यात आला आहे.
इ स पूर्व पाचव्या शतकात डायरस व त्यानंतरच्या अखमोनिय राजपुरूषांची थडगी पर्सिपोलीजवळ असलेल्या डोंगरात खोदलेली आहेत. परंतु ही प्रेरणाजरी विदेशी असली तरी तिचा सर्वांगीण विकास मात्र भारतातच झाला आणि खासकरून महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत.
भारतात १२०० लेण्या आहेत त्या पैकी जवळपास ९०० लेण्या या एकट्या महाराष्ट्रात आहेत. ९०० लेण्यांच्या पैकी ८०% लेणी बौध्द, १५ % जैन लेणी तर उर्वरीत ५ % शैव ( हिंदू ) लेणी आहेत.
बुध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याऱ्या भिक्खू संघाच्या पावसाळ्यातील चार महिन्यांच्या निवासाच्या गरजेतून “लेणी” वास्तू स्थापत्यकलेला भारतात सुरुवात झाली,भगवान बुध्दांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे भिक्खू संघ “वर्षावासाच्या” ( पावसाळ्यातील चार महिने भ्रमंती न करता एकाच ठिकाणी लेण्यात वास्तव्य करून प्रमुख भिक्खूंच्या मार्गदर्शनाखाली चिंतनमनन करत असत ) काळात एकाच ठिकाणी विहार करत असत.
बौध्द लेण्याचे दोन प्रकार पडतात. भिक्खूंच्या निवासाकरीता कोरलेली विहार लेणी आणि पूजा करण्यासाठी कोरलेली चैत्य लेणी. सुरूवातीच्या लेण्या या थेरवादी ( स्थविरवादी / हिनयान) पंथीय होत्या या लेण्या साधारण असून मुख्यत: निवासासाठीच निर्माण केल्या गेल्या होत्या. कालानुरूप मूर्तीकलेचा विकास हाऊ लागला, महायान पंथाच्या ( इ स पहिले शतक ) उदयामुळे स्वरुप बदलून गेले. अलंकरण विरहित लेण्या अलंकरणानं युक्त झाल्या.
भगवान बुध्दांची पुजा हीनयान (थेरवाद) पंथात प्रतिकात्मक स्वरुपात केली जात असे. महायान पंथात भगवान बुध्दांची मानवीय मूर्तीच्या स्वरुपात पूजा केली जाऊ लागली . थेरवादी पंथात चैत्यगृह प्रार्थना स्थळ म्हणून वापरले जात असे. भगवान बुध्दांच्या महापरिनिर्वाणाचे प्रतिक म्हणून स्तूप या प्रतिकाव्दारे बुध्द पूजा चैत्यगृहात केली जात असे. स्तूपात पवित्र अवशेष जतन करुन ठेवले जात असे. थेरवादी लेण्यात प्रतिकाव्दारे भगवान बुध्दांची पूजा केली जात असे. त्रिरत्न (बुध्द, धम्म आणि संघ यांचे प्रतिक ) धम्म चक्र (भगवान बुध्दांना प्राप्त झालेल्या सम्यक ज्ञानाचे प्रतीक ), बोधीवृक्ष ( बुध्दांना याच वृक्षाखाली “सम्बोधि” प्राप्त झाली म्हणून त्यांच्या ज्ञानप्राप्ती बद्दल आदर व्यक्त करणारं प्रतिक) घोडा (महाभिनिष्क्रमण/ पर्यायानं गृहत्यागाचे प्रतिक), महामाया (कुमार स्वामींच्या मते, गजलक्ष्मी भगवान बुध्दांची आई असावी. संपन्नतेचे /ऐश्वर्याचे, प्रतिक) पदचिन्ह ( बुध्दांच्या पावलांचे ठसे ) , वज्रासन ( ज्या आसनावर ध्यान करुन भगवान बुध्दांना सम्बोधि प्राप्त झाली ते बोधिवृक्षाखालील आसन) भिक्षापात्र (महापरिनिर्वाणापूर्वीचे गौतम बुध्दांचे पात्र) , कमळ (भगवान बुध्द, जन्म झालयावर सात पावले चाललीत व तेथे कमळे उगवलीत स्वागताचे प्रतिक), गंधकूटी ( महापरिनिर्वाणापूर्वी भगवानबुध्द या कूटीत वास्तव्य करीत त्याचे प्रतिक ) या प्रतिकाव्दारे भगवान बुध्दांच्या विषयी प्रतिकात्मक स्वरुपात अंकन करुन त्यांच्या विषयीची कृतज्ञतेची भावना प्रकट केली जाई पूजा केली जाई.
ऐनारी गावाजवळील “ऐनारी लेणी” देखील थेरवादी पंथातील एक बौध्द लेणी असून ती अतिशय दुर्गम आणि भग्नावशेषात तग धरून आपले शेवटचे श्वास मोजत शिल्लक आहे.
कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर ऐनारी बौध्द लेणी असून अंदाजे समुद्री सपाटीपासून ६०० मीटर उंचीवर आहेत.
चार किलोमीटरवर वेसरफ ( ता. गगनबावडा) ची हद्द सुरू होते. गगनबावडा येथून ६ किलोमीटरवर सध्या या ऐनारी लेणी आहेत.ऐनारी गाव कोकणातील वैभववाडी तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्या जवळ वसले आहे, वैभववाडी पासुन १७ किलोमीटरवर या लेण्या दुर्गम ठिकाणी निर्मित आहेत.
अतिशय दुर्गम आणि दाट जंगलात असलेल्या ऐनारी लेणीत पडझड झालेल्या भग्न स्वरूपातील पुरातत्त्वीय अवशेषानुसार एक बौध्द विहार लेणे असून बाजूलाच दोन पाण्याच्या पोढी सध्या पाहण्यास मिळतात.
लेणी पावसाच्या पाण्याच्या गळतीमूळे खूप खराब अवस्थेत आहे, विहार लेणीच्या हॉलमध्ये अष्टकोनी आकाराचे ८ स्तंभ आहेत त्यापैकी चार स्तंभ चांगल्या स्थितीत उभ्या अवस्थेत आहेत चार पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहेत लेआउटमध्ये काही खणलेले भाग आहेत दोन स्तंभ हॉलच्या दोन्ही बाजूला बाजूला उभे आहेत आणि चार स्तंभ पूर्व बाजूला उभे आहेत.
विहाराच्या सभामंडपाच्या तीनही आतील भिंतींवर संघाराम खोदकाम केल्याचे दिसुन येत आहेत हॉलच्या पूर्वेकडे तीन तर दक्षिण दिशेला एक अशा एकूण चार खोल्यांमध्ये एक एक बैठकीची/ झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हॉलच्या आतील मधल्या भागात मोठ्या आकाराचा अपूर्ण अवस्थेतील स्तूप कोरण्याच प्रयत्न करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
उपलब्ध पुरातत्वीय अवशेष हे प्राचीन थेरवादी बौध्द विहार असल्याचे पहिल्यांदा ऐनारी लेणीवर संशोधन करणार्या डॉ अंजय धनवाडे सर यांनी आपल्या शोध निबंधाद्वारे ( २०१२ ) सिध्द केले आहे.
ऐनारी लेणी अतिशय दाट जंगलात आणि दुर्गम भागात असल्याने प्रकाश झोता पासून दूर आहे. संवर्धन अभावी लेणीची खूप मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे तसेच लेणी पर्यंत पोहचण्यासाठी लेणी पाहण्यासाठी रस्ता नसणे हे देखील एक मुख्य कारण आहे.
सूरज रतन जगताप
मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली नवी मुंबई
९३२०२१३४१४
१३/२/२०२२
More Stories
बौद्ध भिक्खू महाबोधी मंदिरावर नियंत्रण मिळवू पाहणारे बौद्ध धर्माचा विनियोगाविरुद्धचा संघर्ष दर्शवतात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम महामानवास अभिवादनासाठी सुटा-बुटात निघाले भीमसैनिक
NYC ने 14 एप्रिलला त्यांच्या नावाने घोषित केल्यामुळे UN ने डॉ बीआर आंबेडकर यांचा सन्मान केला