बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग पहिला – जन्म ते प्रव्रज्या.
🌼 २०. छन्न परत आला 🌼
१. जेव्हा त्याचा स्वामी त्याला सोडून गेला तेव्हा छन्न अतिशय दुःखी झाला परतीच्या वाटेवर आपला दुःखभार हलका करण्याचा त्याने हरप्रकारे प्रयत्न केला.
२. त्याचे हृदय दुःखाने एवढे व्याकुळ होते की, कन्थकासह जेवढे अंतर तो एका रात्रीत पूर्ण करीत असे तेवढे अंतर चालावयास त्याला आठ दिवस लागले. येताना वाटेत तो निरंतर आपल्या स्वामीच्या अनुपस्थितीचाच विचार करीत होता.
३. अश्व कन्थक सुद्धा आतापर्यंत धैर्याने चालत होता. शेवटी तो थकून गेला. त्याचे अवसानच गळाले. अलंकारानी अलंकृत असूनही स्वामीच्या अनुपस्थितीमुळे त्याचे सौंदर्यच लोप पावले.
४. ज्या दिशेने त्याच्या स्वामीने प्रयाण केले त्या दिशेकडे तोंड करून तो मोठ्याने खिकाळू लागला. वाटेत जरी तो भुकेने, तृष्णेने व्याकुळ झाला होता तरी त्याने गवत किंवा पाण्याला स्पर्शही केला नाही.
५. शेवटी ते दोघेही हळूहळू कपिलवस्तु नगरीत पोहोचले. गौतमाने नगरीचा त्याग केल्यानंतर ती वैराण वाटत होती. त्याची कलेवरे तर नगरीत पोहोचली पण त्यांचा जीव मात्र हरवला होता.
६. सरोवरे पद्याच्छादित होती. वृक्षवल्ली पुष्पांनी बहरल्या होत्या पण नागरिकांची हृदये मात्र अप्रसन्न होती.
७. जेव्हा ते दोघेही निस्तेज मुख आणि नयनात अश्रू घेऊन हळूहळू नगरीत प्रवेश करते झाले तेव्हा त्यांना संपूर्ण नगरीच अंधारात न्हाली आहे असे वाटले.
८. गलितगात्र होऊन ते दोघेही परत आल्याचे पाहून शाक्य वंशाच्या मानबिंदूशिवाय ते परत आले आहेत हे लोकांनी जाणले. लोकांच्या नयनात पुन्हा एकदा अश्रू उभे राहिले.
९. दुःखदग्ध होऊन विलाप करीत लोक छत्रापाठोपाठ जाऊ लागले आणि विचारू लागले की, ‘कोठे आहे राजाचा पुत्र ! कोठे आहे या राज्याचा आणि वंशाचा गौरव !’
१०. त्याच्याशिवाय ही नगरी म्हणजे वनच होय आणि तो जेथे आहे ते वनसुद्धा त्याच्या उपस्थितीने नगरी समानच होय. ज्या नगरात तो नाही त्या नगरीचे आम्हाला काही आकर्षण नाही.
११. दुसरीकडे स्त्रियांनी आपआपल्या घरांच्या खिडक्यासमोर रांगा लावल्या. एक दुसरीला मोठ्याने सांगू लागल्या की ‘राजपुत्र आला; राजपुत्र आला.’ पण जेव्हा त्यांना दिसले की अश्वाची पाठ मोकळीच आहे तेव्हा त्यांनी पटापट खिडक्यांची कपाटे बंद केली आणि त्या मोठमोठ्याने विलाप करू लागल्या.
More Stories
Buddha and his Dhamma बुद्ध आणि त्याचा धम्म
🌼 मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. 🌼 The lament of a warrior and the joy of a monk.
आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे आलोचक